सोलापुरात ढोबळी मिरची, गवार, भेंडीचे दर टिकून

सुदर्शन सुतार
Tuesday, 16 January 2018

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार, भेंडी, ढोबळी मिरचीची आवक कमी राहिली, पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार, भेंडी, ढोबळी मिरचीची आवक कमी राहिली, पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात ढोबळी मिरचीची आवक रोज ५०० ते ९०० किलोपर्यंत राहिली. गवार आणि भेंडीची प्रत्येकी १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक राहिली. फळभाज्यांची ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली; पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिले. गेल्या महिना-दीड महिन्यापासून त्यांच्या आवक आणि दराची ही स्थिती आहे. ढोबळी मिरचीला प्रति दहा किलोसाठी २०० ते ३०० रुपये, गवारीला २०० ते ३५० रुपये आणि भेंडीला २०० ते ३२५ रुपये असा दर आहे. त्याशिवाय वांगी, बटाटा, हिरव्या मिरचीला चांगली मागणी राहिली. पण त्यांची आवकही तुलनेने कमी राहिली. वांग्याची २० क्विंटलपर्यंत, हिरव्या मिरचीची १०० क्विंटल आणि बटाट्याची २०० क्विंटल आवक झाली. मागणी असूनही दरातील किचिंत चढ-उतार वगळता त्यांचे दरही स्थिर राहिले.  वांग्याला प्रति दहा किलोसाठी १०० ते २०० रुपये, बटाट्याला १५० ते २०० रुपये आणि हिरव्या मिरचीला १०० ते २५० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याच्या दरात मात्र पुन्हा चढ-उतार राहिला. त्यांची आवक ही सगळी स्थानिक भागातूनच झाली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी १०० ते २५० रुपये, मेथीला १५० ते ३०० रुपये आणि शेपूला २०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

कांद्याला मागणी टिकून
कांद्याला असलेली मागणी या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिली. आवक वाढूनही दर मात्र तेजीत राहिले. कांद्याची आवक जिल्ह्यातूनच सर्वाधिक झाली. रोज बाजारात २०० ते ४०० गाड्यांपर्यंत आवक होती. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ३८०० व सरासरी २२०० रुपये असा दर मिळाला. येत्या दिवसात कांद्याची हीच स्थिती राहिली. तर कांद्याच्या दरात तेजी राहील, असे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news soalpur capsicum