फ्युएल सेल, सौर ऊर्जेपासून फिरत्या ट्रॉलीवर वीजनिर्मिती

फ्युएल सेल, सौर ऊर्जेपासून फिरत्या ट्रॉलीवर वीजनिर्मिती

ग्रामीण भाग तसेच पाणी पंपासाठी विजेची टंचाई लक्षात घेऊन पुण्यातील एच २ इ पॉवर सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीने सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचे एकत्रित वापर असलेले स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फिरत्या ट्रॉलीवर ही वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे शेतातील पंपासाठी वीजपुरवठा असो किंवा घरगुती वापरासाठी चोवीस तास विजेची उपलब्धता या तंत्रज्ञानाच्या मार्फत होते, अशी माहिती कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मयूर यांनी दिली. 

या तंत्रज्ञानाबाबत सिद्धार्थ मयूर म्हणाले की, सध्या ग्रामीण भागात विजेच्या उपलब्धतेसाठी विविध प्रकारे संशोधन होत आहे. यातून जैव ऊर्जा, सौर ऊर्जेचा वापर वाढतो आहे. परंतु, यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन आम्ही सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचा एकत्रित वापर करून गरजेनुसार शेतीपंप तसेच घरगुती वापरासाठी वीज निर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आम्हाला जर्मनीमधील फ्राउहोफर इन्स्टिट्यूटची मदत झाली आहे. याचे आम्ही पेटंट घेतले आहे. हे तंत्रज्ञान पर्यावरण पूरक, व्यवस्थापन खर्चात बचत करणारे आणि २४ तास विजेची गरजेनुसार उपलब्धता करून देणारे आहे. यामध्ये जैव इंधन म्हणून इथेनॉल, बायोगॅस किंवा सीएनजीचा वापर करता येतो. याचबरोबरीने या तंत्रज्ञानामध्ये सोलर पॅनलची जोड देण्यात आली आहे. जेव्हा चांगला सूर्यप्रकाश असेल तेव्हा ही यंत्रणा सोलर पॅनेलद्वारे वीज निर्मिती करते. जेव्हा पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध नसेल तेव्हा सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल तंत्रज्ञानावर वीज निर्मिती केली जाते. या तंत्रामध्ये रासायनिक ऊर्जा ही विद्युत ऊर्जेत बदलली जाते. 

कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अमरनाथ चक्रदेव म्हणाले की, आम्ही ग्रामीण भाग आणि शेतीपंपासाठी विजेची गरज लक्षात घेऊन अर्धा एपी ते पाच एची पंप चालू शकेल एेवढी ऊर्जा निर्मिती करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानमध्ये आम्ही ५०० वॉट फ्यूएल सेल आणि ६०० वॉट सोलर सिस्टिम बसविलेली आहे. या माध्यमातून १० ते ११ युनिट वीज प्रति दिन तयार होते. आपल्या गरजेनुसार तंत्रज्ञानामध्ये बदल करून याची वीजनिर्मिती क्षमता वाढविता येते. सध्या आम्ही यामध्ये बायोगॅस सिलिंडरमध्ये भरून फ्यूएल सेलला जोडलेला आहे. त्यातून रासायनिक प्रक्रिया होऊन त्यापासून वीजनिर्मिती होते. ‘मायक्रो कंबाईन हिट आणि पॉवर सिस्टिम` असे तंत्रज्ञानाचे स्वरूप आहे. 

यंत्रणेच्या वापराबाबत माहिती देताना सिद्धार्थ मयूर म्हणाले की, आम्ही विकसित केलेली यंत्रणा एका लहान ट्रॉलीवर बसविली आहे. त्यामुळे शेतात गरज असेल तेथे लहान ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोठेही हालविता येते. या तंत्रज्ञानामुळे शेती पंप, घर, डेअरी, कुक्कुटपालन शेड, लहानसे साठवणगृह यांना लागणाऱ्या विजेचा प्रश्न  सोडविणे शक्य आहे.तसेच भाडेतत्त्वावरदेखील ही यंत्रणा आपण परिसरातील शेतकऱ्यांना देऊ शकतो.  यंत्रणेमध्ये आम्ही माहिती तंत्रज्ञानाचा देखील वापर केला आहे. या युनिटमध्ये आम्ही टॅब बसविलेला आहे. या माध्यमातून इंटरनेटद्वारे शेतकऱ्यांना दररोजचा हवामान अंदाज, बाजारपेठ इत्यादी माहिती मिळू शकते. या यंत्रणेचा व्यवस्थापन खर्च कमी आहे. सध्या राज्यातील निवडक  संशोधन प्रक्षेत्रावर याच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या पूर्ण होताच ग्रामीण भागासाठी आम्ही हे तंत्रज्ञान उपलब्ध करू देणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com