एकीतून साधले जलसंधारण; गाडेगावने हटवले जलसंकट 

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

गाडेगाव (जि. जळगाव) गावावर असलेले अनेक वर्षांपासूनचे जलसंकट दूर करण्यासाठी सर्व ग्रामस्थ सरसावले. संस्थांचे सहकार्य घेत चार किलोमीटरपर्यंत नाल्याचे खोलीकरण झाले. सत्तावीस हेक्‍टर क्षेत्रावरील दोन टेकड्यांवर खोल सलग समतल आडवे चर तयार केले. आज गावशिवारात पाणी खेळू लागले आहे. सेंद्रिय शेती, गट उभारणी, जलशुद्धीकरण यंत्रणा, सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते, महिलांसाठी शौचालय आदी कामांमधूनही गाडेगावने आपली स्वतंत्र अोळख तयार केली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील गाडेगाव (ता. जामनेर) गाव पाणी समस्येत अडकले होते. एकतर पावसाचा भरवसा नव्हता. पाऊस जोरदार जरी झाला तरी तो साठवला जात नव्हता. पाणी वाहून जायचे. 

जमीन हलकी, मुरमाड असल्याने पाणी भूगर्भात फारसे न जिरता नाले, ओढ्यांमधून वाहून जायचे. मग हिवाळ्यात पाण्याची समस्या निर्माण व्हायची. रब्बी हंगाम घेताना नाकीनऊ यायचे. जानेवारीत विहिरी, कूपनलिकांचे पाणी आटू लागायचे. गावात कुठली प्रमुख नदीही नाही. अशी संकटांवर संकटे उभी होती. एकत्र येऊन काम केल्याशिवाय समस्या दूर होणार नाही हे त्यांना उमगले. 

लोकसहभागातून कामांना सुरवात 
सुरवातीला गावच्या पूर्व भागातील नाल्याचे खोली व रुंदीकरणाचे काम करण्याचे ठरविले. सर्वांनीच या उपक्रमात हिरीरिने सहभाग घेतला. त्यात तत्कालीन सरपंच किशोर पाटील, ग्रामस्थांमध्ये सुधाकर नारखेडे, पोलीस पाटील, भीमसिंग परदेशी, लीलाधर वराडे, राहुल पाटील, रेखा पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे सुधाकर टोके, डॉ.अनिल खडके, डॉ. रंजना बोरसे, श्‍यामकांत चिंचोले, सोमनाथ सोनवणे (पुणे) यांनी पुढाकार घेतला. सन २०१३ मध्ये हे काम पूर्ण केले. चार किलोमीटर एवढ्या अंतराच्या नाल्याचे एक मीटर खोलीकरण व १० फूट रुंदीकरणाचे काम झाले. त्यात सिमेंट नाला बांधही तयार केले.

कामाचे मिळाले फळ  
पूर्वी हिवाळ्याच्या अखेरीस शिवारातील विहिरी, कूपनलिका आटू लागायच्या. मात्र नाला खोलीकरणाच्या कामाचा गावशिवारातील ५० ते ६० विहिरी व कूपनलिकांना लाभ झाला. त्यावर अनेकजण भाजीपाला उत्पादन घेऊ लागले आहेत. 

आदर्श गाव योजनेत सहभाग 
गाडेगावमधील ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामानंतर प्रेरक उपक्रमांवर भर देत नैसर्गिक संपत्ती विकास व उपजीविका विकास हे सूत्र बांधले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावाचा कायापालट करण्याचे ठरविले. शेतकऱ्यांचा विकास साधत असतानाच ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनाही विकासाच्या प्रवाहात कसे आणता येईल यावर विचार केला. अशातच गावाची आदर्श गाव योजनेत २०१३-१४ या वर्षी निवड झाली. एक कोटी ८२ लाख रुपये निधी त्या अंतर्गत मंजूर झाला.  

टेकड्यांवर चर खोदून पाणी जिरविले  
गावानजीकच्या लकट खोरे व बामन खोऱ्यातील २७ हेक्‍टरवरील टोन टेकड्यांवर खोल समतल सलग आडवे चर खोदण्यात आले. हे चर एक बाय एक मीटर आकाराचे अाहेत. जेसीबी यंत्राच्या सहाय्याने हे काम मागील वर्षी झाले. सहा हजार मीटर अशी एक टेकडीवरील चरांची लांबी आहे. एका टेकडीवर पाच चर खोदले अाहेत. यंदा त्यात सव्वा क्विंटलपर्यंत कडूनींब व इतर वृक्षांचे बियाणे रूजवण्यात आले आहे. चर खोदल्याने टेकडीवरून वाहून येणारे पाणी त्यात साठते. पूर्वी पाणी टेकडीवरून थेट नजिकच्या शेतांमध्ये वाहत होते. त्यामुळे माती वाहून जात असे. पिकांचेही नुकसान व्हायचे. ही समस्या यंदा दूर झाली. आदर्श गाव योजनेंतर्गत हे काम श्री छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाले. यात सरपंच सुलभा भारंबे, ग्रामस्थांमध्ये प्रल्हाद भारंबे, गणेश माळी, भागवत पवार, प्रदीप भारंबे, पुष्पा नारखेडे, शारदा चौधरी, सुनंदा सपकाळे, रेखा पाटील, चंद्रकांत भारंबे आदींनी हिरीरिने सहभाग घेतला. या कामाद्वारे सहा हजार ४८० घनमीटर पाणी चरांमध्ये साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे. यंदा त्याचा लाभ कोरडवाहू पिकांना होत असून काही ठिकाणी पाझरही फुटले आहेत असे  ग्रामकार्यकर्ता मारूती भिरूड यांनी सांगितले. 

पोपटराव पवार यांची भेट 
आदर्श गाव योजनेत गावाची निवड करण्यासंबंधी जिल्हा प्रशासन, संबंधित समिती व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीतील पदाधिकारी, सदस्यांशी संवाद साधून कामासंबंधीचा उत्साह वाढविला. आतापर्यंत तीनदा पवार यांनी गावाला भेट दिली. पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील भास्करराव पेरेपाटील यांनीही गावाला भेट दिली.  

शुद्ध पाणी
यंदा चौदाव्या वित्त आयोगाद्वारे जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली. पन्नास पैसे प्रतिलिटर दराने पाणी दिले जाते. त्यासाठी साडेसात लाख रुपये निधी खर्च झाला. जलशुद्धीकरण केंद्रानजीकच्या ‘वॉटर एटीएम’वर ‘कार्ड स्वाइप’ करून हवे तेवढे पाणी घेता येते. जलशुद्धीकरण यंत्रणा ताशी एक हजार लिटर शुद्ध पाणी तयार करते. कार्ड नसलेले रोखीने पैसे देऊन पाणी घेऊ शकतात.

गावातील विकासकामे
शेती संपन्न करीत असताना शेती नाही अशाही महिलांचे बचत गट स्थापन
सुमारे ३१ गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली.
काही गटांचा जिल्हास्तरावरील मुक्ताई सरस व राज्यातील प्रदर्शनांमध्ये भाग
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ४५ शेतकऱ्यांचा गट. यातील काहींचे पुणे येथे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रशिक्षण. सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे काम सुरू. गांडूळ खताचे युनिटही शेतकरी वापरतात.
मनोज बोंडे यांचे पॉलिहाऊस तर भागवत कुरकुरे यांनी शेडनेटचा लाभ घेतला. पीक पद्धतीत बदल होत आहे.
पंधरा शेततळी साकारली असून वॉटर बॅंकेचे काम उत्साहाने झाले.  
आधुनिक व्यायाम शाळा, वाचनालयात ९६८ पुस्तके. मान्यवर, संस्थांनी पुस्तके देऊन ग्रंथसंपदा वाढविण्यास मदत केली आहे. 
प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण. महिलांसाठी शौचालयाची सुविधा. 

पाण्याची समस्या लक्षात घेता ग्रामस्थ एकत्र आले. नाला खोलीकरण व टेकड्यांवर समतल चरांचे काम त्यातून झाले. याचा लाभ दिसू लागला असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू लागले आहे. 
- मारुती रामजी भिरूड

गाडेगावला जलसंधारणाचे काम करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली. ग्रामस्थांनीही हिरीरिने सहभाग घेऊन कामे यशस्वी केली.
- रामचंद्र झगडे,  हिंद स्वराज ट्रस्ट, राळेगणसिद्धी (अहमदनगर)

गाडेगावच्या ग्रामस्थांची धडपडी वृत्ती मोठी आहे. याच जिद्द व उत्साहातून गावाची निवड आदर्श योजनेसाठी झाली. आम्ही गावात योजनांचे अभिसरण केले. त्यात शेततळी, बचत गट, सेंद्रिय भाजीपाला प्रशिक्षण आदी उपक्रम राबवू शकलो. 
- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक

शेती व पर्यावरणपूरक उपक्रम राबवित असताना गाडेगावला नाला खोलीकरण कामात सहभाग घेण्याची संधी मिळाली. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे कामे झाली.  
- सागर धनाड, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान, जळगाव

 रामचंद्र झगडे, ९८८१०७०८९८
 सागर धनाड, ९१५८०४५२८५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news water farmer village