कसमादे पट्ट्यात रुजतेय गुजरातचे देशी रवय्या वांगे

brinjal-gujrat
brinjal-gujrat

नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यात डाळिंब, द्राक्ष व भाजीपाला पिकांची हजारो हेक्टरवर लागवड आहे. यात प्रामुख्याने मालेगाव, सटाणा, देवळा तालुक्यांचा समावेश होतो. गुजरातमधील बाजारात देशी वांग्याचे वाण येथील शेतकऱ्यांच्या पाहण्यात आले. त्यास गुजरातमध्ये ‘देशी रवय्या’ म्हणून ओळखले जाते. त्याला असलेली मागणी, दर व अर्थकारण लक्षात घेऊन कसमादे पट्ट्यातही त्याची लागवड होऊ लागली. रंग, आकार, चव व प्रतवारी चांगली असल्याने गुजरात राज्यात येथील वांग्यांनी वर्चस्व निर्माण करण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्रात सुरवातीला धुळे जिल्ह्यात फागणे परिसरात देशी रवय्या वांग्याची लागवड झाल्याचे शेतकरी सांगतात. या वाणाला गुजरात राज्यात अधिक चांगला दर मिळत असल्याचे कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांना अनुभवास आले. गुजरात मार्केटमध्ये येणारे शेतकरी व व्यापारी यांच्याकडे अधिक माहिती घेत २०१४ नंतर या पट्यातील शेतकरी प्रयोगाकडे वळले. सन २०१६ नंतर मालेगाव, सटाणा व देवळा तालुक्यांमध्ये क्षेत्र विस्तारले. सुमारे एकहजार हेक्टरवर त्याची लागवड असावी. 

देशी रवय्या वांग्याची वैशिष्ट्ये  
  गुजरात राज्यातील देशी वाण. मोठ्या प्रमाणावर सुरत, मांडवी या परिसरात उत्पादन
  ऐन पावसाळ्यात उत्पादन कमी 
  पौष्टिक, चवदार व कमी काटे असल्याने गुजराती ग्राहकांकडून मागणी
  जेवढा देठ लांब व हिरवा तेवढी जास्त मागणी 
  आकर्षक, आकाराने लहान
  गडद जांभळ्या रंगाचे लांब देठाचे फळ
  फळात मर्यादित बियाणे

  दर्जेदार उत्पादन
  पीक परिपक्व झाल्यानंतर सुरत, मांडवी परिसरांतील शेतकरी त्याचे बियाणे तयार करतात. पारंपरिक पद्धतीने बीज प्रक्रिया होते. दरवर्षी लागवडीसाठी बियाणे जपून ठेवले जाते. 
लागवडीविषयी 
 जमीन भूसभुशीत करून गादीवाफ्यावर रोपनिर्मिती.  सुमारे २१ दिवसांत रोप लागवडीयोग्य.  कसमादे पट्ट्यातील शेतकरी बियाणे गुजरात राज्यातून उपलब्ध करतात.  शंभर ग्रॅम बियाणाची किंमत २०० रु, तर प्रतिकिलो २००० रुपये दर. काही व्यापारीही बियाणे उपलब्ध करून देतात.  तणनियंत्रण व आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी मल्चिंगचा वापर.   पीक कालावधी- मे ते ऑगस्ट लागवड.  जैविक कीडनाशके व कामगंध सापळ्यांच्या वापरावर भर देण्यात येतो.  बाजाराच्या मागणीनुसार आकार तयार झाल्यानंतर तोडणी. 

उत्पादन व दर  
  एकरी होणारे तोडे (सुमारे) -४०
  एकरी उत्पादन : ३० टन
  दर- किमान २० ते कमाल 
७० रु. प्रति किलो 
अधिक मागणीचा काळ  
गुजरात राज्यातील लागवडी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होतात. काढणी दोन महिन्यांनंतर सुरू होऊन जास्तीत जास्त जुलैपर्यंत चालते.  स्थानिक आवक मंदावल्यानंतर कसमादे पट्ट्यातून जुलैपासून पुरवठा सुरू होतो. त्यामुळे जुलै ते डिसेंबरपर्यंत या भागातील वांग्याचा दबदबा असतो. त्यामुळे गुजरातमध्ये अधिक पुरवठा होतो. दरही किफायतशीर मिळतात. 

व्यापारी व शेतकरी समन्वय 
कसमादे पट्ट्यात रवय्या वांग्याच्या खरेदीची सुरवात शेतकऱ्यांनीच केली. यातूनच काही शेतकरी व्यापारी म्हणून तयार झाले. येथील माल चांगल्या गुणवत्तेचा असल्याने बाजारात त्याची ओळख निर्माण झाली आहे. व्यापारी शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात मदत करतात. सातत्याने व्यापारी व वांगी उत्पादकांचा संपर्क येत असल्याने बाजारपेठ, उत्पादन याबाबत सातत्याने चर्चा होत असल्याचे आघार येथील नंदराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

वाढला रोजगार, उंचावले अर्थकारण  
गुजरात राज्याच्या तुलनेत गुणवत्तापूर्ण मालाचे उत्पादन येथे होते. त्यामुळे पहिली पसंती मिळून दोन पैसे अधिक मिळतात. शेतकरी नर्सरीमधून रोपे तयार घेतात. त्यामुळे या व्यवसायाला संधी प्राप्त होत आहे. अनेक तरुण व्यावसायिक नर्सरी क्षेत्रात पुढे येत आहेत. त्यातून मजूर व महिलांना हाताला कामे मिळत आहे. परिसरात कृषिनिविष्ठा विक्रेत्यांनाही खात्रीशीर ग्राहक मिळाला आहे. वाहतूक करणाऱ्या साधनांची संख्याही वाढली आहे. स्थानिक शेतकरी वाहतूकदार देखील झाले आहेत. पैसा खेळता राहिल्याने अर्थकारण उंचावले आहे.

दररोज मोठ्या  प्रमाणात पुरवठा
कसमादे भाग गुजरात राज्याला लागून आहे. त्यामुळे वाहतुकीस सोपे होते. काढणीनंतर हाताळणी व प्रतवारी होऊन वांगी क्रेटमध्ये रचून भरली जातात. त्यामुळे दर चांगला मिळतो. कसमादे पट्ट्यातून दररोज ५००० क्रेटपर्यंत पुरवठा होत असावा असे वाहतूकदार योगेश जाधव म्हणाले. अनेक व्यापारी जागेवर येऊन देखील खरेदी करतात. व्यवहार रोखीने होत असल्याने पैसे रोख किंवा ऑनलाइन सुविधेद्वारे तत्काळ मिळतात.

बाजारपेठ विस्तार संधी 
गुजरातमध्ये सुरत, व्यारा, बारडोली, बडोदा, अहमदाबाद, पादरा, गांधीनगर या बाजारात या वांग्याला मोठी मागणी. महाराष्ट्रातही पुणे, मुंबई, ठाणे या शहरांत गुजराती बांधव मोठ्या प्रमाणावर असल्याने येथेही येणाऱ्या काळात बाजारपेठ मिळेल अशी अपेक्षा. 

पूर्वी सूरत बाजारात विक्रीसाठी जाणे व्हायचे. त्यातूनच या वांग्याबद्दल अधिक माहिती मिळाली. हंगाम व पद्धती समजावून घेतली. दरवर्षी तीन एकरांत लागवड करतो. नियोजनपूर्वक पीक घेतल्यास आर्थिक गणित चांगले बसते.
  जगदीश जिभाऊ गांगुर्डे, ९९७०४६३१९१, चिंचावड, ता. मालेगाव

तीन वर्षांपासून या वाणाची लागवड करतो आहे. रासायनिक निविष्ठांचा मर्यादित वापर केल्याने गुणवत्ता चांगली ठेवली आहे. शेताला ‘शिवकरी’ नाव दिले आहे. या नावानेच सुरत मार्केटमध्ये मालाची ओळख तयार केली आहे. 
  विष्णू वाघ, ९७६५६५९५०१  हरणशिकार, ता. मालेगाव

या वांग्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळवून दिली. अनेकांनी पीकपद्धतीत बदल केले. त्यातून पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर लागवड वाढली. वांग्याने मोठी बाजारपेठ मिळविली. 
  नंदराज सूर्यवंशी, ९८६०७४८०९० निर्यातदार, मालेगाव

सुरवातीला या परिसरात डाळिंब मोठ्या प्रमाणावर होते. आता हा भाग देशी रवय्या वांग्याचा मुख्य उत्पादक पट्टा झाला आहे. या वाणाचे बियाणे उपलब्ध करून विक्री करतो. ते खात्रीशीर देशी पद्धतीचे आहे.
  योगेश पवार, ९६५७७४५२५३ कृषी निविष्ठा विक्रेता, लखमापूर, ता. सटाणा

रंग, आकार, चव याबाबत हे वांगे सरस आहे. त्यामुळे त्यास चांगला दर मिळतो. 
  प्रताप चौधरी, ९९१३६३६५४२   भाजीपाला व्यापारी, सरदार मार्केट, सुरत

या वांग्याची मुख्य बाजारपेठ गुजरात राज्यात असल्याने येथून दररोज शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल पाठवितात. त्यामुळे रोजगार वाढला आहे. 
  योगेश जाधव, वाहतूकदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com