गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही पॅकेटमध्ये घरपोच

geeta-deshmukh
geeta-deshmukh

शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच नैसर्गिक पाणी पॅकेटमध्ये ग्राहकांना वर्षभर नियमितपणे उपलब्ध करण्याचा ध्यास पुणे येथील कणाद श्रीहरी देशमुख यांनी घेतला. त्यातून उभा राहिला एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण उद्योग. या उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक ती यंत्रे स्व प्रयत्नातून विकसित करून घेतली आहेत. 

मूळचे कोपरगाव येथील असलेल्या कणाद श्रीहरी देशमुख यांचे शिक्षण पुणे येथे रसायन अभियांत्रिकी आणि एमबीए (फायनान्स)पर्यंत झाले आहे. सुरुवातीला त्यांनी आखाती देशामध्ये नोकरी केली. त्यानंतर एक दोन कंपन्यांनंतर एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीमध्ये नोकरी करत होते. २००७ ते २०१३ या काळात नोकरी केल्यानंतर स्वतःची फायनान्स कन्सल्टन्सी सुरू केली. कन्सल्टन्सी व्यवसाय त्यांनी २०१९ पर्यंत सुरू ठेवला होता. कणाद (वय ३७) स्वतः मार्शल आर्ट खेळाडू असल्याने व्यायाम आणि शरीराचे योग्य पोषण याकडे बारकाईने लक्ष असायचे. सकाळी व्यायामानंतर शहाळ्याचे पाणी पिणे हा त्यांची दैनंदिनी. मात्र, अनेकवेळा शहाळे विक्रीची दुकाने सकाळी उघडी नसणे, तिथे नारळ कापण्यासाठी माणूस उपलब्ध नसणे यामुळे अडचणी येत. त्याच प्रमाणे शहाळ्याचे कठीण आवरणांची विल्हेवाट लावण्याची समस्या असल्याने अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांसाठी आणू दिले जात नाही. यावर मात करण्यासाठी पॅकेट स्वरूपामध्ये शहाळ्याचे पाणी कायम वर्षभर उपलब्ध करण्याची कल्पना सुचली. सध्या बाजारपेठेमध्ये असलेली दरी व त्यातील व्यावसायिक संधी लक्षात येताच कणाद यांनी जानेवारी २०१७ मध्ये प्रयोग व अभ्यासाला सुरुवात केली. प्रथम हडपसर येथील मित्राच्या कोल्ड स्टोरेजमध्ये शहाळे पाणी गोठवण्याचे व साठवण्याचे प्रयोग सुरू केले. हे पाणी सहा महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे टिकल्यानंतर त्याचा प्रयोगशाळेमध्ये सर्व चाचण्या करून घेत खात्री केली. 

पुढील अधिक उत्पादनासाठी अधिक प्रमाणात शहाळ्याची आवश्यकता होती. त्यासाठी मग केरळ, कर्नाटक,ओडिशा आणि गुजरात येथील शहाळे नारळ उत्पादक पट्ट्यामध्ये भेटी सुरू झाल्या. त्यांच्याकडून व अन्य स्रोतांतून शहाळ्याबाबत माहिती गोळा करत गेले. आपल्या व्यवसायासाठी आवश्यक जातींच्या शहाळ्याची उपलब्धता करण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याबरोबरच व्यापाऱ्यांशीही संपर्क वाढवला. दुसऱ्या बाजूला हाताचा स्पर्श न होता शहाळ्यातून पाणी बाहेर काढणे, त्याचे पॅकेजिंग करणे, ते अधिक काळ टिकवणे या तांत्रिक बाबींवर प्रयत्न सुरू होते. ट्रुवॉन या नावाने कंपनीची नोंदणी करण्यात आली. पुणे शहराजवळच असलेल्या शिवणे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये जागा बुक केली. 

हस्त स्पर्शविरहीत पाणी मिळवण्यासाठी...
शहाळ्याच्या कठीण कवचातून कोणत्याही हस्तस्पर्शाशिवाय पाणी वेगळे करणे आवश्यक होते. सांगली येथील एका यंत्र उत्पादकाकडून नारळ धारदार व जाड पात्याच्या साह्याने फोडून त्यातील पाणी मिळवणारे यंत्र तयार करून घेतले. मात्र, पाण्याला किंचित तुरटपणा येत असल्याचे जाणवले. त्यानंतर विचार केला असला नारळ फोडताना त्यातील कवचाच्या भागातील रसामुळे असे होत असल्याचे स्पष्ट झाले. मग हे यंत्र मागे पडले. मात्र, यंत्रासाठी खर्च तर झाला होता. पुढे गुरुत्वाकर्षणाने पाणी खाली पडणे  (ग्रॅव्हिटेशनल फॉल) आणि पाइपमध्ये हवारहित स्थिती निर्माण करून खेचून घेणे (व्हॅक्युम सकिंग) अशा दोन पद्धती आहेत. त्यातील गुरुत्वाकर्षणावर आधारीत वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे तयार करून पाहिली. त्यात सुधारणा करत एक यंत्र स्थिर केले. ही सोपी पद्धत आहे.  व्हॅक्युम सकिंग पद्धतीची यंत्रे ही तुलनेने महागडी आहेत. त्यांच्या अधिक किमतीमुळे मोठ्या संख्येमध्ये शहाळे पाणी व पॅकेट्स तयार करण्यासाठी परवडू शकते. विविध कल्पना राबवून असे यंत्रही बनवून घेतले आहे.  सध्या लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यावसायिक, आइस्क्रीम उत्पादक यांच्याकडून मागणी राहिलेली नाही. सध्या केवळ गुरुत्वाकर्षणावर आधारीत पद्धतीचा करून अर्ध्यापेक्षाही कमी क्षमतेवर कारखाना चालवला जात आहे. या दोन्ही पद्धतीमध्ये कोणत्या हस्त स्पर्शाशिवाय शहाळ्याचे पाणी पॅकेटमध्ये भरले जाते. प्रत्येक बॅचच्या पाण्याची गोडी ( ५ अंश ब्रिक्स), सामू (४.५ ते ६.५) तपासून घेतले जाते. 

असे आहे नावीन्यपूर्ण गोठवण तंत्र
साधारण ७ ते ८ महिने वयाच्या शहाळ्यातील पाणी हे अत्यंत पोषक मानले जाते. ते गोडी आणि अन्नद्रव्यांनी भरपूर असते. मानवी शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह प्रक्रियेमुळे तयार होणाऱ्या मुक्त कणांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. ते अॅण्टीऑक्सिडेंट म्हणून काम करते. शहाळ्याचे कठीण कवच फोडल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या पाण्यामध्ये कार्यरत विकर (एंझाइम्स) असतात. हे एंझाईम्स चयापचयाची क्रिया आणि पचनासाठी मदत करतात. हे पाणी अधिक काळ टिकवण्याच्या दोन पद्धती असल्याचे समोर आले. त्यातील पहिल्या पद्धतीमध्ये पाणी गरम करून, त्यात परिरक्षक (प्रीझर्वेटिव्ह) मिसळणे. मात्र, अन्य घटक किंवा कोणतेही परिरक्षक (प्रीझर्वेटिव्ह) मिसळल्यास त्याची नैसर्गिकता, मूळ चव, गोडी धोक्यात येऊ शकते. त्याच प्रमाणे अन्य पदार्थांप्रमाणे याला उष्णता प्रक्रियाही करता येत नाही. या दोन्ही प्रक्रियांमुळे त्यातील अन्नद्रव्ये, पोषक घटक आणि अॅण्टीऑक्सिडेंटची पातळी बदलू शकते. 

दुसरी पद्धती पाणी थंड करून बर्फाच्या स्वरूपामध्ये साठवणे. मात्र, नारळपाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असून, त्यात सोडिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असे अनेक घटक असतात. त्यामुळेही शहाळे पाणी गोठवण्यामध्ये अडचणी येतात. साध्या पाण्याचा शून्य ते वजा चार अंश सेल्सिअस तापमानाला बर्फ होतो. शहाळ्याच्या पाण्याचा बर्फ वजा १८ अंश सेल्सिअसला होतो. मग आणखी आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध सुरू झाला. पदार्थ गोठवण्यासाठी सामान्यतः प्लेट फ्रिझिंग आणि ब्लास्ट फ्रिझिंग या दोन तंत्राचा वापर केला जातो. 

प्लेट फ्रिझिंग मध्ये अत्यंत थंड ( वजन ३० ते ४० अंश सेल्सिअस) तापमानाच्या प्लेट्समधून पाणी पुढे पाठवले जाते. यात पाण्याचा प्लेटशी संपर्क येऊन त्याचे बर्फात रूपांतर होते. 

ब्लास्ट फ्रिझिंग मध्ये हवेचे तापमान अचानक वजा ३० अंश सेल्सिअस पर्यंत कमी केले जाते. त्यातून पाण्याचे कण पुढे पाठवले जातात. त्यामुळे कोणत्याही बाह्य घटकांना स्पर्श न होता पाण्याच्या कणाचे बर्फात रूपांतर होते. 

या दोन्ही तंत्राचे फायदे तोटे आहेत. कणाद यांनी आपल्या इंजिनिअरिंग ज्ञानाचा वापर करून या दोन्ही तंत्राच्या एकत्रीकरण केले आहे. त्यासाठी विकत घेतलेल्या यंत्रामध्ये योग्य त्या सुधारणा केल्या. चुका आणि दुरुस्ती करा या तंत्राने प्रयोग करत गेल्याने खर्चामध्ये बरीच वाढ झाल्याचे कणाद यांनी सांगितले. 

 पॅकेजिंगसाठी यंत्रणा...
यंत्राबाबत सर्व प्रयोग एका बाजूला सुरू असताना शहाळ्याचे पाणी दीर्घकाळ टिकण्यामध्ये महत्त्वाचे असलेल्या पॅकेजिंगवर काम सुरू होते. प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत जाणारे पॅकेजिंग हे आकर्षकही असले पाहिजे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये टेट्रा पॅकेजिंगचा विचार केला. पण ते महागडे ठरत होते. दुसऱ्या नियमित प्लॅस्टिकच्या पॅकेजिंगवर प्रयोग सुरू झाले. मात्र, वजा ४० अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आणि आत बर्फ तयार झाल्यानंतर त्याला चिरा किंवा भेगा पडू लागल्या. मग तेलाच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकवर काम सुरू केले. त्यात योग्य प्रमाणात नायलॉन मिसळून तीन थरांचे खास प्लॅस्टिक तयार करून घेतले. हे खास तयार करून घेत असल्याने त्याची ऑर्डर ही टनावर द्यावी लागते. यामुळे भांडवली खर्च वाढला, तरी एका वेळी १ लाख व त्यापेक्षा अधिक पॅकेट्स घेतल्याने प्रती पॅकेट खर्च कमी राहिला. हे पॅकेट साधारणपणे २.२० रुपयाला पडते, असे कणाद यांनी सांगितले.   ही पॅकेट्स वजा १८ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गोठवली जाते. या गोठवलेल्या अवस्थेमध्ये सुमारे तीन महिन्यापर्यंत टिकते. यंत्रासह एकूण उद्योगाच्या उभारणीसाठी एकूण ७५ लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक करावी लागली. त्यात स्व भांडवल २० लाख रु. मित्र, नातेवाइकांकडून १९ लाख रु., तर बॅंकेकडून ३६ लाख रुपये कर्जाऊ घेतले आहेत. 

पॅकेट्सचा वापर करताना 
गोठवलेल्या स्वरूपातील पॅकेट ग्राहकांच्या फ्रिजरमध्ये सुमारे ३ महिने टिकते. पॅकेटमधील गोठवलेले पाणी द्रव स्वरूपामध्ये आणण्याच्या दोन पद्धती आहेत. 

सावकाश वितळवणे ः आपल्याला दुसऱ्या दिवशी नारळपाणी हवे असल्यास पॅकेट आदल्या दिवशी (किमान १० तास आधी) ते फ्रिजरमधून नेहमीच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे. ते गोठवलेल्या अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत येते. हे पाणी आपण पिऊ शकतो. रेफ्रिजरेटरमध्ये न फोडलेले पॅकेट हे सामान्यतः आठ तासापर्यंत चांगले राहते.

वेगाने वितळवणे ः जर त्यापेक्षा आधी आपल्याला नारळ पाणी हवे असेल, तर गोठवलेले पॅकेट सामान्य तापमानाचे पाणी असलेल्या भांड्यामध्ये ठेवावे. वातावरणातील तापमानानुसार साधारणतः १० ते १५ मिनिटांमध्ये द्रव स्थितीमध्ये येते. मात्र, या पद्धतीने मिळवलेले पाणी त्वरित पिणे आवश्यक आहे. ते अधिक काळ टिकू शकत नाही.

विक्रीसाठी वापरले वेगवेगळे मार्ग
डिसेंबर २०१९ मध्ये उत्पादनाला सुरुवात झाली, तेव्हा महिन्याला १००० पॅकेट्स तयार होत असत. आता हे प्रमाण १५ हजार पॅकेट्सवर पोचले आहे. 

पुणे येथील ८ आणि मुंबई येथील ४ मोठ्या हॉस्पिटल्सपर्यंत पॅकेट्स पुरवठा केला जातो. अन्य काही हॉस्पिटलसोबत संपर्क झाला असून, उत्पादन मंजूरही झाले आहे. त्याच प्रमाणे भारतातील १२ विमानतळांकडूनही उत्पादनाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना बंद ठेवावा लागल्याने पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही.    

२०० मिली पॅकेट्सप्रमाणे काही व्यावसायिकांकडून सुट्या शहाळे पाण्याचीही मागणी होते. ते पुढे बाटल्यांमध्ये रिपॅकींग करून विकतात. त्यांच्यासाठी ४ लीटर वेगळे पॅकेट तयार करण्यात आले आहे. 

सध्या केवळ पुण्यामध्ये घरपोच शहाळे पाणी पॅकेट्स पोचवण्यात येत आहेत. १४०० रुपयामध्ये ३० पॅकेट महिन्यातून दोन वेळा पोचवतात. घरपोच पाण्यासाठी अहमदाबाद, नागपूर, दिल्ली, मुंबई येथील डिस्ट्रिब्युटरशी बोलणी झालेली असून, ते काम प्रगतिपथावर आहे.  

पुणे, मुंबई परिसरातील सुमारे सहा मॅरेथॉनसाठी हायड्रेशन भागीदार म्हणून प्रमोशन केले. त्याचा आरोग्याविषयी अतिजागरुक असलेल्या खेळाडू, लोकांपर्यंत पोचण्यासाठी फायदा झाला. विविध सामाजिक माध्यमांचा विक्रीसाठी वापर केला जातो. लोकांपर्यंत पोचण्यासाठी विशेषतः घरपोच मागणी नोंदवण्यासाठी कणाद यांनी कंपनीची वेबसाइट तयार केली आहे. 

या उत्पादनातील उपपदार्थ असलेल्या मलईलाही चांगली मागणी असल्याचे पुढे लक्षात आले. त्याची विक्री तीन मोठ्या डिस्ट्रिब्युटरद्वारे केली जाते. 

उत्पादन प्रक्रिया 
तीन वर्षापासून उत्पादन सुरू आहे.  शहाळ्याचे नारळ हे पोलाची (केरळ), मदूर (कर्नाटक) येथून मागवले जातात.  एका ट्रकमध्ये आकारानुसार ५ ते ८ हजार शहाळे बसतात. २०० मिली पॅकेट किरकोळ विक्री किंमत ६० रुपये इतकी ठेवली आहे. 

गुलाबी रंग आलेले शहाळे पाणी चांगले असते का?
सामान्यतः शहाळे पाणी पाण्यासारखे रंगहीन असते. मात्र, अनेकवेळा त्याला फिक्कट गुलाबी रंग येतो. अमेरिकेमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार नारळपाण्याला हा रंग प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर त्यातील अॅण्टीऑक्सिडेंट घटकांमध्ये नैसर्गिक प्रक्रियेमुळे प्राप्त होतो. नारळामध्ये नैसर्गिकरीत्या या अॅण्टीऑक्सिडेंट आणि पॉलीफिनॉलिक घटकांचे प्रमाण पातळी कमी अधिक असू शकते. म्हणूनच पॅकेटमध्ये भरतेवेळी स्वच्छ आणि रंगहीन असलेल्या पाणी प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर गुलाबी होऊ शकते. ते शुद्ध, पूर्वीइतकेच नैसर्गिक आणि पिण्यायोग्य असल्याची खात्री बाळगावी. अनेकजण हा रंग लपवण्यासाठी त्यात अन्य घटकांचे मिश्रण करतात. ते योग्य नाही.

शहाळे उपलब्धतेविषयी...
खास शहाळे पाण्यासाठीच्या सुमारे ३५ जाती आहेत. त्यातील गावरान जात श्रीकल्प, बुटक्या जातीमध्ये सीओडी, चौघाट, ऑरेंज डॉर्फ अशा जातींची कणाद यांनी विविध निकष लावून निवड केली आहे. या दोन्ही जातींपासून संकरित (हायब्रीड) अशा काही जाती आहेत. हंगामनिहाय शहाळ्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त होते. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असून, गोडी व मलई जास्त असते. तर पावसाळ्यात पाणी जास्त मिळत असले तरी पाणी चवीला तुरट राहते. मलईचे प्रमाण कमी मिळते. गावरान झाडे उंच असून, पावसाळ्यामध्ये नारळ काढणे तुलनेने धोकादायक ठरते. पावसाळ्यामध्ये अधिक पाऊस, शेतापर्यंत वाहतूक व्यवस्था न पोचू शकणे, अशा कारणांमुळे शहाळ्याचा पुरवठा तुलनेने कमी होतो. म्हणून या काळात पाणी अधिक असूनही कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यात अनेक अडचणी येतात. उन्हाळा आणि ऑक्टोबर हिटच्या काळात पॅकेट्सची मागणी वाढते. त्या अनुषंगाने हिवाळा उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याचे गीताताई देशमुख (वय ५९ वर्षे) यांनी सांगितले. त्या उत्पादन प्रमुख आणि भागीदार असून, संपूर्ण उत्पादन प्रक्रियेची जबाबदारी सांभाळतात.  

उपपदार्थ
शहाळ्याचे पाणी आणि मलई व्यतिरिक्त त्याचे तंतू आणि कोकोपीट हेही उपयुक्त आहेत. शहाळ्याचे तंतू हे तुलनेने कमी प्रतीचे मानले जात असले तरी त्याचे अनेक उपयोग आहेत. त्याचे ओले वजन नारळाच्या सुमारे ३० टक्के भरते. त्यातून ओले कोकोपीट हे ७० टक्क्यांपर्यंत मिळू शकते. 

खर्च वाचवण्यासाठी...
सुरुवातीला स्वतःचे शीतगृह उभारणीचे नियोजन होते. मात्र, त्यामुळे खर्चामध्ये १० ते १५ लाख रुपयांनी वाढ झाली असती. कणाद यांनी साठवणीसाठी डीप फ्रिजरचा वापर केला आहे. आज त्यांच्याकडे ३४०० लीटर साठवण क्षमता आहे. आवश्यकता भासल्यास शीतगृह तात्पुरते भाड्याने घेतले जाते. त्याला प्रती किलो २.५ ते ३ रुपये इतका खर्च येत असला तरी ते परवडते.  

पदार्थ गोठवण अवस्थेत ठेवण्यासाठी सातत्याने विजेची उपलब्धता असावी लागते. सर्व यंत्रणा सलग सुरू राहण्यासाठी सुरुवातीला जनरेटर विकत घेण्याचा विचार होता. मात्र, आर्थिक विचार करत तात्पुरत्या स्वरूपामध्ये भाड्याने घेतला. पुढे त्याचीही काही आवश्यकता नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता जनरेटर वापरत नाही. औद्योगिक वसाहत असल्याने फारशी वीज जात नाही. अगदीच गरज वाटली तर शीतगृहाचा आधार घेतला जातो, असे कणाद यांनी सांगितले. 

व्यावसायिक वाढीसाठी...
सुरुवातीचे संपूर्ण संशोधन, यंत्राचा विकास, व्यवसायाची उभारणी आता पूर्ण झाली आहे. नियमित ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा वेळी व्यवसायामध्ये वाढ करण्याचे नियोजन केले आहे. नारळाच्या सुमारे २४ उत्पादनांची संपूर्ण रेंज बाजारपेठेत उतरवण्याचा विचार आहे. यासाठी या टप्प्यावर पूर्णपणे कार्यरत भागीदार म्हणून महेश गव्हाणे यांना सोबत घेतल्याचे कणाद यांनी सांगितले. 

कणाद देशमुख (संचालक), ८६०५०१९९३०  गीताताई देशमुख (अध्यक्षा) , ९१३०३६१०६९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com