सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात...

wardha district village
wardha district village

वर्धा जिल्ह्यात डोंगरकड्याच्या पायथ्याशी बोथली, हेटी, किन्हाळा आणि दानापूर ही चार गावे वसली आहेत. बोथली आणि हेटी यांचा कारभार गट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतो. दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या ११६४ आहे. सिंचनाच्या सोयी नसल्याने कापूस, सोयाबीन यांसारख्या कोरडवाहू पिकांचाच आधार शेतकऱ्यांना असतो. पण, या पिकांचेही वन्यप्राण्यांकडून नुकसान होते. त्यामुळे शेतकरी दुग्धोत्पादनासारख्या व्यवसायाकडे वळले. 

दुग्ध व्यवसायाला मिळाली चालना  
बोथली व हेटी गावांमध्ये मिळून सुमारे १८५० दुधाळ जनावरे आहेत. दुधाच्या विक्रीसाठी संकलन केंद्र किंवा शासनाकडून पर्याय नाही. दही, पनीर आदींचे उत्पादन व लगतच्या गावांमध्ये विक्री करण्यावर गावातील शेतकऱ्यांचा भर राहिला. विदर्भात दुग्ध व्यवसायाचे मॉडेल स्वहिमतीवर उभारू पाहणाऱ्या या गावाची मात्र शासनस्तरावरून सातत्याने उपेक्षा झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. 

स्थलांतर ठरलेलेच  
गावशिवारात काळा दगड, विहीर खोदल्यानंतरही पाणी लागत नाही. सिंचन प्रकल्प किंवा अन्य पर्यायही नाहीत. त्यामुळे उन्हाळ्याला सुरवात होताच तान्हुल्यांचे कपडे, खाण्यापिण्याचे साहित्य, जनावरे बांधण्यासाठी लागणारे दोर यांसह साहित्य घेऊन स्थलांतरासाठी लगबग सुरू होते. जानेवारीतच जलस्त्रोत कोरडे पडतात. माणसांनाच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही, तर जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय कुठून करणार, याच विवंचनेतून ही वेळ येते. दर वर्षीचा हा नेम झाला आहे. एखाद्या शेतकऱ्याला विनवणी करून त्याच्या शेतातच आसरा शोधला जातो. 

मागे उरतात केवळ  वृद्ध आणि नातवंडे   
गाव सोडणाऱ्या काहींची मुले शाळेत शिकत असतात. काहींच्या परीक्षा असतात. अशा वेळी घरी राहणारे आजी-आजोबाच त्यांचे आधार होऊन जातात. बोथली, हेटी, दानापूर ही अशीच उजाड पडलेली गावे दिसून येतात. बोथलीच्या शांताबाई चौकोने यांच्याकडे दहा जनावरे. मुलगा आणि सून यांनी गाव सोडल्यानंतर शांताबाई सहावीत शिकणारी पल्लवी आणि प्रज्वल या नातवंडांसमवेत राहतात. गुणवंत झांबरे यांचा तिसरीत शिकणारा मुलगा आणि अंगणवाडीत असलेली चिमुकली राजश्री यांच्यावरही तीच वेळ आली. कांचन मारोतराव घाटोळ हिचे आई-वडील जानेवारीतच स्थलांतरित झाले. बारावीचे पेपर देण्याबरोबर घर सांभाळण्याची जबाबदारीही तिच्यावर आली.   

घरांना कुलुपे 
समाधान चायरे किंवा ज्यांच्या घरात वृद्ध मंडळीदेखील नसतील अशांचे अस्तित्व केवळ ‘कुलूपबंद’ म्हणूनच मागे उरते.   

दानापूरचीही तीच स्थिती   
आर्वी तालुक्‍यातीलच दानापूर येथील पुरुषोत्तम अवथडे यांची चिमुकली आचलदेखील आजीसोबत राहते. भास्कर रामाजी महाजन, सुनील आसटकर यांच्यासह अनेकांच्या घराला कुलपे दिसतात. ‘मदर डेअरी’ कंपनीने गावात संकलन केंद्र सुरू केले आहे. पण, गावात माणसांचे अस्तित्वच असल्याने दूधपुरवठा होणार कुठून, हाच प्रश्न आहे. 

गावांची ही परिस्थिती पाहून कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या दोन अोळी आठवतात. 

पाय चालून थकले तरी सरली ना वाट
सारं कसं सामसूम तरंग नाही तलावात!
- कवी विठ्ठल वाघ


शासनाकडून कसलीच दखल नाही 
विदर्भातील शेतीतले नैराश्‍य दूर करण्यासाठी पूरक व्यवसायाचा सल्ला शासनाकडून दिला जातो. परंतु, त्यासाठी बळ देण्याचे कोणतेच प्रयत्न होत नाहीत. ही खंत गावातील देवानंद बलवीर व प्रमोद कोरडे यांनी व्यक्‍त केली. जानेवारी ते मे या चार महिन्यांच्या कालावधीत चारा छावण्या व पाण्याचा प्रश्‍न शासनस्तरावरून सुटला तरी गावातील स्थलांतर थांबू शकते. या संदर्भाने केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापासून सर्वच स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. परंतु शासन, प्रशासनाकडून कसलीच दखल घेतली नाही, असे विषन्न मनाने कोरडे सांगतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी योजना-आराखडे बनविले जातात. प्रत्यक्षात स्वबळावर आर्थिक उत्कर्षाची वाट धरणाऱ्या गावांकडे शासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याची व्यथा ग्रामस्थ मांडतात. 
 

- मधुकर चौकोने, ९८२३४९७१५८  माजी सरपंच, बोथली, ग्रामपंचायत, जि. वर्धा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com