बीई, एमबीए तरुणाची ‘हायटेक’ शेती

बीई, एमबीए तरुणाची ‘हायटेक’ शेती

धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक तंत्रांचाही वापर करीत वेळ, मजुरी, श्रम यांच्यात बचत करून शेती अधिकाधिक फायदेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

अमरावती जिल्ह्यात धामनगाव रेल्वे येथील राम मुंदडा या बीई मेकॅनिकल एमबीए तरुणाने आपल्या १२५ संयुक्त कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी पेलली आहे. ‘हायटेक शेती’ हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. धामनगावपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील कामनापूर घुसळी येथे त्यांची ५६ एकर तर ढाकुलगाव येथे उर्वरित शेती आहे. 

मुंबईतील व्यवसाय  सोडून शेती 
पूर्वी राम यांचे काका अशोक व त्यानंतर वडील सतीश शेती पाहायचे. त्या वेळी राम मुंबई येथे बांधकाम व्यवसाय पाहायचे. वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरची व शेतीची जबाबदारी पाहण्यासाठी त्यांना गावी परतावे लागले. शेतीतील मजुरी, वाढलेले खर्च, शेतीमालाला मिळत नसलेले मनासारखे दर आदी समस्या त्यांनी जाणल्या. मग त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने शेतीत बदल सुरू केले.

उत्पादन कलिंगडाचे आत्तापर्यंत एकच 
उत्पादन घेतले असून एकरी २७ टन, तर खरबुजाचे एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. पाच व दहा किलो बॉक्‍समधून दिल्ली बाजारपेठेत माल पाठविला. संत्रा १९ एकरांत असून, त्यातील पंधराशे झाडे उत्पादनक्षम आहेत. त्यातून सुमारे १५० टन उत्पादन घेतले. केळीचीही प्रतिझाड कमाल ३३ किलोपर्यंत रास घेतली. रमजान काळात असलेली मागणी ओळखत टरबूज, पपईवर भर दिला आहे.  
संत्रा झाड दत्तक योजना
एमबीएच्या शिक्षणात राम यांनी ‘मॅनेजमेंट’चे धडे गिरविले. त्याचा शेती व्यवस्थापनात चांगला उपयोग केला आहे. एखाद्या ग्राहकाने बागेतील झाड प्रतिझाड तीन हजार रुपये दराने दत्तक घ्यायचे. त्याची फळे त्या ग्राहकानेच घ्यायची अशी ही योजना आहे. ‘वेबसाइट’वर याविषयी माहिती उपलब्ध केल्याने ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना शेती करणे शक्य होत नाही. पण शेतातील ताजी फळे त्यांना थेट हवी असतात. त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध केला आहे. मागील वर्षी सुमारे २० लाख रुपयांच्या संत्रा फळांची विक्री बांगला देशात व्यापाऱ्यांद्वारे केली.  

शेतीत कुशल होण्याचे प्रयत्न 
अलीकडेच शेतीची सूत्रे हाती घेणाऱ्या राम यांनी शेतीत प्रावीण्य मिळविण्यास सुरवात केली आहे. काका अशोक, आई तिलोत्तमा आणि पत्नी सौ. स्नेहल यांची मोठी मदत यांनी होत आहे. 

शेतीत आणले तंत्रज्ञान
ड्रिप ऑटोमेशन- राम यांनी सर्वांत महत्त्वाचा केलेला बदल म्हणजे आपल्या ५६ एकरांतील सलग क्षेत्रात शंभर टक्के ड्रिप ॲटोमेशन केले आहे. त्याचबरोबर फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड सिस्टिम’चा वापर केला आहे. या क्षेत्रात संत्र्याची सुमारे ४५०० झाडे आहेत. केळी, खरबूज, कलिंगड अशी पिके आहेत. आपल्या १२५ एकरांतील उर्वरित ढाकुलगाव क्षेत्रातही ठिबक आहेच. तेथे कापूस, हळद व कलिंगड, खरबूज अशी पिके आहेत. २०१७ मध्ये बसविलेल्या या यंत्रणेच्या माध्यमातून ५६ एकरांतील शिवारातील पाण्याचे व्यवस्थापन एकाच ठिकाणावरून करणे शक्‍य होते. फर्टिगेशनसाठी एक हजार लिटर क्षमतेचे सहा टॅंक बसविले आहेत. खते पाण्यात विरघळावीत यासाठी ब्लोअरची यंत्रणा आहे. ऑटोमेशन, पाइपलाइन, खोदाई व संंबंधित कामांसाठी मिळून एकूण ४० लाख रुपये खर्च झाला आहे. 

  ऑटोमेशन यंत्रणेच्या शेडला असलेल्या दरवाजासाठीही स्वयंचलित यंत्रणा बसविली आहे. येथील दरवाजे केवळ अधिकृत व्यक्‍तीच उघडू शकतात. इतरांनी प्रयत्न केल्यास सायरन वाजतो. यावर सुमारे ११ हजार रुपयांचा खर्च झाला. 

  संपूर्ण शेती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांखाली आहे. यात सात कॅमेरे तसेच फिरणारा ड्रोन कॅमेरादेखील आहे.

  शेतीला सौर कुंपण केले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास कमी झाल्याचा अनुभव आहे. 

  विदर्भात तापमान जास्त राहते. खरबूज पीक नाजूक असल्याने उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी क्रॉप कव्हरचा वापर केला आहे. त्यामुळे झाडांचा दर्जा व पुढे फळांची गुणवत्ताही चांगली मिळते.

  पाण्याची सोय व्हावी, यासाठी चार विहिरी आहेत. उन्हाळ्यात पाणी कमी होत असल्याचा धोका राम यांच्या वडिलांनी ओळखत शेतापासून काही अंतरावरील नाल्याच्या काठावर विहीर खरेदी केली. तेथून पाणी आणून त्याचे पुनर्भरण केले जाते.

वेबसाइटची निर्मिती 
राम यांच्या पत्नी सौ. स्नेहल कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. त्यांनी मुंदडा फार्मस डॉट कॉम नावाने आपल्या शेतीची ‘वेबसाइट’ तयार केली आहे. आपल्या शेतीमालाच्या उत्तम दर्जाशिवाय त्या अनुषांगिक माहिती त्यावर वेळोवेळी अपलोड केली जाते. त्यामुळे ग्राहक किंवा खरेदीदारांना मालाच्या गुणवत्तेविषयी खातरजमा करणे शक्‍य होते.

 राम मुंदडा,७५८८०८४५९५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com