अल्पभूधारकांच्या आयुष्यात गुलाबाची टवटवी 

गोपाल हागे
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर नक्कीच उत्पन्नात सातत्य राहते. कुटुंबाचा एकाच पिकावर असलेला आर्थिक भार अन्य पिकांवर विभागता येतो. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी याच पीक पद्धतीतून शेतीत चैतन्य निर्माण केले आहे. 

अलीकडील काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसताहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावची परिस्थिती वेगळी नाही. परंतु खचून न जाता त्यातूनही उपाय शोधण्याचे काम येथील शेतकरी करीत आहेत. गावातील राजू अवचार यांची हिंमत त्या अनुषंगाने दाद देण्यासारखी आहे. त्यांची दोन एकर शेती आहे. पंधरा वर्षांपासून ते फूलशेती करीत आहेत.  दुष्काळाशी सामना करताना पीक उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. अशा स्थितीत छोटे क्षेत्र असलेले अवचार यांचे फुलशेतीचे मॉडेल फायदेशीर ठरत आहे. घरालगतच त्यांची १३ गुंठ्यांत गुलाबशेती आहे. गुलाबासह विविध प्रकारची फुलेदेखील आहेत. पाच गुंठ्यांत बिजली, पाच गुंठ्यांत लिली, पाच गुंठ्यांत शेवंती आणि २० गुंठ्यांत गॅलार्डिया आहे. या फूलशेतीने अवचार कुटुंबाला वर्षभर रोजगार दिला. राजू यांच्यासह त्यांची दोन मुले, पत्नी असे चौघेजण फूलशेतीत राबतात. व्यवस्थापनातील सारी कामे हेच सदस्य करीत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व त्यांनी कमी केले आहे. फूलशेतीला पाण्याची चांगली गरज भासते. एक कूपनलिका असून, त्याचा आधार मिळतो. उत्पादनासोबत विक्रीतदेखील हे कटुंब माहीर झाले आहे.   

स्वतः विक्रीतून वर्षभर मिळकत  
 साखरखेर्डा हे मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. या गावच्या बस स्थानक परिसरात अवचार यांनी आपले फूलविक्री केंद्र सुरू केले आहे. येथून दिवसभर ते फुलांची विक्री करतात. सकाळी गावातील बहुतांश व्यावसायिक संस्थांना फुलांचे हार घरपोच पोचवून देण्याचे काम केले जाते. 

दिवसाला सुमारे २०० हार विकले जातात. त्यापासून १५०० ते २००० रुपयांची मिळकत होते. या गावात प्रसिद्ध प्रल्हाद महाराज व सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी संस्थान पलसिद्ध स्वामी यांचा मोठा भक्त समुदाय अहे. साहजिकच तेथे विविध कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे फुलांना मागणी राहत असल्याचे अवचार सांगतात. मागणीच्या काळात देऊळगाव माळी, जालना येथून फुले मागवून ग्राहकांची गरज पूर्ण केली जाते. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम अवचार यांनी याच व्यवसायाच्या आधारे पेलले आहे.  छोट्या क्षेत्रातूनही आर्थिक सक्षमता मिळवता येऊ शकते हे सिद्ध केल्याने कार्याची दखल घेत सिंदखेडराजा येथील लोकजागर परिवारने अवचार यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला आहे.  

अवचार यांचे  कामांचे नियोजन 
 सायंकाळी फुलांची तोडणी
 घरातील सदस्यांकडून हार बनविणे
 तयार केलेले फुलांचे हार सकाळी व्यावसायिकांच्या घरांपर्यंत पोचवणे 
 बस स्थानक परिसरातील विक्री केंद्रात विक्री करणे
 मागणीनुसार केंद्राद्वारे हार बनवून ग्राहकांना विकणे
 मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी, लग्नसोहळ्यांसाठी विशिष्ट हारांची निर्मिती करणे

 राजू अवचार- ९७६७२१७८९८

बेंडमाळी यांच्या कुटुंबालाही फूलशेतीचा आधार
साखरखेर्डा गावातीलच अल्पभूधारक विवेक बेंडमाळी यांच्या कुटुंबालाही फूलशेतीचा मोठा आधार झाला आहे. कुटुंबात दोघे बंधू असून, अडीच एकर शेती आहे. त्यापैकी २० गुंठ्यांत ते फूलशेती करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी मोगऱ्याची २०० तर गुलाबाची ५०० झाडे लावली. फुलांचे दररोज उत्पादन घेतले जाते. अवचार यांच्याप्रमाणेच बेंडमाळीदेखील गावातील फूल व्यावसायिकांना विक्री करतात. दररोज दीडशे ते दोनशे रुपये नगदी येत असल्याचे विवेक यांनी सांगितले. महिन्याला सहा हजार रुपयांहून अधिक नियमित मिळकत ही दिसायला कमी असली तरी कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा आधार ठरते. यामुळे शेतातील अन्य पिकांच्या उत्पन्नावर भार येत नाही असे विवेक सांगतात. कुटुंबातील सदस्य शेतीत सहकार्य करतात. मोगऱ्याच्या फुलांपासून लग्नसराईच्या काळात गजरे तयार करून त्यांचीही विक्री केली जाते. कुटुंबातील महिलांचा गजरे बनविण्यात मोठा सहभाग असतो.   

कृषी विभागाची मदत अवचार व बेंडमाळी या दोन्ही 
अल्पभूधारक शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, कृषी सहायक 
समाधान वाघ यांनी शासकीय योजना, फूलशेतीचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन 
केले आहे.   
जलयुक्त योजनेचा आधार 
साखरखेर्डा गावात २०१५ पासून 
जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्या 
प्रमाणात झाली आहेत. परिणामी दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. गावातील महालक्ष्मी, गायखेडी तलावातील गाळ काढल्याने पाझर तलाव, सिमेंटनाला बांध, माती बंधाऱ्याचे काम झाले. कूपनलिका, विहिरींना पाणी आले. अवचार, बेंडमाळी या दोघांनाही फूलशेतीसाठी या कामांचा फायदा झाला आहे. 

विवेक बेंडमाळी-९४०३५८२२५९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon specialstory Farmer Raju avchar Flower farming