सोयाबीन काढणी, मळणीला वेग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

उमरगा - परतीच्या पावसाच्या फटक्‍यातून सावरण्यासाठी आता शेतकरी सोयाबीन काढणी, मळणी आणि राशीला प्राधान्य देत असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसत आहे.

उमरगा - परतीच्या पावसाच्या फटक्‍यातून सावरण्यासाठी आता शेतकरी सोयाबीन काढणी, मळणी आणि राशीला प्राधान्य देत असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसत आहे.

निसर्गाच्या बदलत्या चक्रात शेतकरी नेहमी अडकत आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते; मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागलेली उठाठेव शेतकऱ्यांना त्रासदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले होते. मध्यंतरी झालेल्या पावसाने सोयाबीनला दगाफटका बसला होता. ऐन काढणीच्या अवस्थेत परतीच्या पावसाने सोयाबीनचा दर्जा घसरविला. भिजलेल्या सोयाबीनला सरंक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांना नाना तऱ्हेच्या उपाययोजना कराव्या लागल्या. आता भिजलेले सोयाबीन वाळवून ते राशीसाठी तयार केले जात आहे. राशीसाठी दुहेरी कामे करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना दुप्पट मजुरीसाठी पदरमोड करावी लागत आहे. दिवाळी सणानंतर आता शेतकरी राशीच्या कामात गुंतला आहेत.

खुल्या बाजारात दरात घट
सोयाबीनला तीन हजार ५० रुपये हमी भाव आहे. आडत बाजारपेठेत दोन हजार ५०० ते दोन हजार ७०० रुपये दर आहे. परतीच्या पावसात भिजल्याने सोयाबीनमध्ये असलेल्या ओलाव्याने दर कमी झाल्याचे कारण सांगितले जात आहे. शिवाय वजनातही घट होत आहे. दरम्यान उमरगा आडत बाजारात सोयाबीन खरेदीसाठी हमी भाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या खरेदी नसली तरी नावनोंदणी करून घेतली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news agriculture soyabean