स्वयंचलित फॉगर्स ठेवणार गोठ्यातील तापमानावर नियंत्रण 

अमित गद्रे 
सोमवार, 24 एप्रिल 2017

गोठ्यामध्ये योग्य वातावरण असेल तर दुधाळ गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहाते. दुधात सातत्य राहाते. सध्याच्या काळात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. याचा परिणाम गाई, म्हशींचे आरोग्य, दूध देण्यावर होतो. हे लक्षात घेऊन कोळकी (ता. फलटण, जि. सातारा) येथील चैतन्य पवार यांनी गोठ्यामध्ये स्वयंचलित फॉगर्स यंत्रणा बसविली. गेली दोन वर्षे ही यंत्रणा कमी खर्चात कशी करता येईल याबाबत प्रयोग करण्यात येत होते.

गोठ्यामध्ये योग्य वातावरण असेल तर दुधाळ गाई, म्हशींचे आरोग्य चांगले राहाते. दुधात सातत्य राहाते. सध्याच्या काळात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. याचा परिणाम गाई, म्हशींचे आरोग्य, दूध देण्यावर होतो. हे लक्षात घेऊन कोळकी (ता. फलटण, जि. सातारा) येथील चैतन्य पवार यांनी गोठ्यामध्ये स्वयंचलित फॉगर्स यंत्रणा बसविली. गेली दोन वर्षे ही यंत्रणा कमी खर्चात कशी करता येईल याबाबत प्रयोग करण्यात येत होते.

गाई, म्हशींच्या व्यवस्थापनाबाबत गोविंद डेअरीतील पशुतज्ज्ञ डॉ. एस. पी. गायकवाड म्हणाले की, फेब्रुवारी ते मे मध्ये तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही पुढे जाते. यामुळे गाई, म्हशी खाद्य कमी खातात, पाणी कमी पितात. धापा टाकतात. दूध उत्पादन घटते. जर गोठ्यातील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले तर होल्स्टिन फ्रिजीयन यांसारख्या संकरित गाईचे १५ ते २० टक्के आणि तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले तर २० ते ४० टक्क्यांपर्यंत दुग्धोत्पादन कमी होते. यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. 

अशी आहे यंत्रणा 
स्वयंचलित फॉगर्स यंत्रणा बसविलेला गोठा ८० फूट लांब आणि ११० फूट रुंद दोन पाखी मुक्त संचार पद्धतीचा आहे. सध्या गोठ्यात गाई, वासरे मिळून जनावरे ३० आहेत. 

गोठ्यात थंड तापमान रहाण्यासाठी छताच्या खालच्या बाजूला लॅटरल फिरवून प्रति गाय एक फॉगर या प्रमाणे सध्या दोन्ही पाखी धरून दर चार फूटावर २० फॉगर्स बसविलेले आहेत. 

जेव्हा तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाते तेव्हा फॉगर्स सुरू केले जातात. यासाठी एक मनुष्य ठराविक वेळेस फॉगर्स चालू आणि बंद करण्यासाठी लागतो. १० -१५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ फॉगर्स सुरू राहिल्याने गोठ्यात अति दमट वातावरण तयार होते. काहीवेळा जमिनीवर पाणी साचून राहिल्याने कासदाह तसेच इतर रोगकारक जंतूंची झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाई, म्हशी आजारी पडतात. ही अडचण लक्षात घेऊन फॉगर्स यंत्रणेला सेंसर बसविण्यात आला. गोठ्यामध्ये गाईच्या उंचीपेक्षा दोन फूट उंचीवर सेंन्सर बसवला आहे. त्याची जोडणी फॉगर्स सुरू आणि बंद होणाऱ्या यंत्रणेला दिली आहे. 

गोठ्यात ३० अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यावर सेंसर कार्यरत होऊन फॉगर्स सुरू होतात. तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा खाली आले की, तीन ते चार मिनिटांत फॉगर्स बंद होतात. 

फायदे 
स्वयंचलित यंत्रणेमुळे फॉगर्स सुरू, बंद करण्यासाठी मनुष्याची गरज नाही. 
गरजेपुरते दिवसा आणि रात्री तापमानवाढीमुळे फॉगर्स सुरू होऊन तापमान नियंत्रणात रहाते. पाणी, वेळ, विजेची बचत होते.
फॉगर्स गरजेपेक्षा जास्त वेळ चालू राहात नाहीत. गाई, म्हशींच्या आजारपणाचा धोका टळतो. 
ज्या शेतकऱ्यांनी गोठ्यात फॉगर्स बसविले अाहेत त्यांना सेंन्सर जोडण्यासाठी फक्त सरासरी १२०० रुपये खर्च येतो. गोठ्यात वीज पुरवठा खंडीत झाला तर सोलर पॅनेल किंवा बॅटरी इन्व्हर्टरवर ही यंत्रणा कार्यरत ठेवणे शक्य आहे. 

तंत्रज्ञान फायदेशीर 
तंत्रज्ञानाबाबत चैतन्य पवार म्हणाले की, आम्ही सध्या २० गाईंसाठी २० फॉगर्स बसविले आहेत. प्रति १०० रुपये प्रमाणे २००० रुपये खर्च आला. गोठ्यात छताला आतल्या बाजूने फॉगर्स लावण्यासाठी १६० फुटांची लॅटरल फिरविलेली आहे. त्याचा खर्च ५०० रुपये, पाणी पुरविण्यासाठी अर्धा एचपी मोटारीचा खर्च १८०० रुपये, सेंन्सरला १२०० रुपये खर्च आला. शेतकऱ्यांकडे पाणी साठवण टाकी असतेच. सरासरी मला ५,५०० रुपये खर्च आला. फॉगर्स यंत्रणेमुळे गोठा थंड राहीला. गाईमधील वाढत्या तापमानाचा ताण कमी झाला. गाई पुरेसे खाद्य खातात, पाणी पितात. त्यामुळे संकरित होल्स्टिन फ्रिजीयन गाईंची दररोज सरासरी २० ते २५ लिटर दूध देण्याची क्षमता टिकून आहे.
चैतन्य पवार, ७०४०७९६००१.

Web Title: Automatic foggers will control the marmalade temperature