esakal | खराब हवामानाचा आंबा उत्पादनाला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

mango tree

खराब हवामानाचा आंबा उत्पादनाला फटका

sakal_logo
By
अमित गवळे

पाली - अनियमित व खराब हवामानामुळे यंदा जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आंब्याच्या उत्पादनात जवळपास 70 ते 80 टक्के घट झाली आहे. परिणामी आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे ते चिंतातुर आहेत.

जिल्ह्यात साधारण 14 ते 15 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. हेक्टरी सव्वा टन आंब्याचे उत्पादन येते. त्यामुळे योग्य मशागत, खबरदारी व काळजी आणि हवामानाने चांगली साथ दिल्यास आंबा बागायतदारांच्या हाती चांगले उत्पादन लागते. त्यामुळे हाती चांगली रक्कमही मिळते. मात्र यंदा पाऊस कमी झाला तसेच तो लवकर गेला. उशिरा आलेली थंडी तसेच मध्यावर पडलेली जास्त थंडी अशा खराब हवामानामुळे आंब्याला पुरेसा मोहोर आला नाही. अनियमित हवामानामुळे सुरुवातीस आलेला मोहोर जळाला. त्यांनतर पुन्हा मोहोर आला त्यावेळी तापमानात वाढ झाली आणि दुबार आलेला मोहोर देखील जळाला असल्याने जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आंब्याच्या बागा ओस पडल्या आहेत. परिणामी बागायतदरांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. 

मोहोर पूर्णपणे जळून गेला आहे. दोन वेळा मोहोर आला पण तोही जळून गेला. वातावरणाच्या अनियमितपणामुळे उत्पादन खूप कमी झाले आहे. आता हातामध्ये काहीही येणार आहे. अवघे दहा टक्के उत्पादन हाती मिळणार आहे. जवळपास 7 ते 8 लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने यासंदर्भात नुकसान भरपाई द्यावी.
- लविनायक शेडगे, आंबा बागायतदार, मुरुड

खराब हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनात खूप घट झाली आहे. आता पीक आले आहे. त्यामुळे सध्या कोणत्या फवारणीची गरज नाही. गरज वाटल्यास काय फवारणी व उपाययोजना करावी याचे वेळापत्रक बागायतदार व शेतकऱ्यांना ठरवून दिले आहे. जे उत्पादन आले आहे ते योग्य व्यवस्थापित करून नीट संभाळले पाहिजे. 
- पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रायगड

loading image