कमी खर्चिक व्यवस्थापन तंत्रातून मोसंबीचे शाश्वत उत्पादन

bhaskar-palwe
bhaskar-palwe

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुका मोसंबीसाठी प्रसिद्ध. देवगाव येथील भास्कर बाबूराव पालवे यांनी वडिलोपार्जित मोसंबी पीक जपले आहे. मशागत, बहार आणि खत यांच्या कमी खर्चीक व्यवस्थापनातून मोसंबीचे शाश्वत उत्पादन घेत आहेत. 

भास्कर पालवे यांच्याकडे बारा एकर शेती असून, त्यात कपाशी तीन एकर, मोसंबी साडे तीन एकर, मका एक एकर, तूर दीड एकर, मूग एक एकर व अन्य क्षेत्रात चारा पिके, भुईमूग, भाजीपाला अशी साधारण पीक पद्धती आहे. पालवे कुटुंबीयांकडे ८० च्या दशकापासून मोसंबी फळबाग आहे. वडील बाबूराव यांनी सुरुवातीला गावरान मोसंबी लागवड केली. वीस वर्ष म्हणजे २००० पर्यंत गावरान मोसंबी जपल्यानंतर न्युसेलर या मोसंबीच्या कलमांची लागवड केली. मात्र, ही झाडे २००६-०७ मध्ये दुष्काळाच्या वणव्यात टिकली नाहीत.   साधारण २००५ मध्ये शेतीमध्ये उतरलेल्या भास्कर पालवे यांनी न्युसेलर प्रमाणेच असलेल्या, पण देशी मोसंबीची (त्याला गावरान दगडी मोसंबी असे संबोधतात) ४५० कलमांची लागवड केली. आता त्यांचा मुलगा गणेशही त्यांना शेतीत मदत करत आहे. अडचणी आल्या तरी एकूण तीन पिढ्यांपासून मोसंबी हे पीक जपलेले आहे. 

घडाई पेक्षा मढाई जास्त...
भास्कर पालवे सांगतात, की पूर्वीच्या मोसंबी बागेची जोपासना म्हणजेच घडाईपेक्षा मढाईच जास्त असा प्रकार होता. १९८० ते २००० दरम्यान मुबलक पाणी, शेणखत, रासायनिक खतांचा वापर करून मोसंबीचे झाड तीन ते चार उत्पादनानंतर टिकत नव्हते. पारंपरिक पद्धतीने व्यवस्थापन करत होतो. खर्चात वाढ होत असली तरी ४५० झाडांचे उत्पादन सात ते आठ टनांच्या पुढे जात नव्हते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२००५ नंतर बदलली पद्धत 
सुरुवातीची १० वर्षे भास्कर यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेती केली. इयत्ता १० पर्यंतच शिक्षण झाले असले तरी मित्राकडून शेतीविषयक शास्त्रीय पुस्तकांचे वाचन सुरू केले. दूरचित्रवाणीवरील शेतीविषयक कार्यक्रम पाहू लागले. त्यातून मिळालेल्या माहितीची सांगड अनुभवाशी घालून सन २००५ पासून भास्कर हे स्वतःच्या विचाराने शेती करू लागले. दरम्यान न्युसेलरची बागही गेली होती. त्या धक्क्यातून सावरत भास्कर यांनी देशी मोसंबीची कलमे विकत आणली. २००६ मध्ये १८ फूट बाय १८ फूट अंतरावर साडेतीन एकरात लागवड केली. 

पूर्वी घेत असलेल्या गावरान मोसंबीचा आकार कमी जास्त असल्याने त्याच्या चार ते पाच प्रतवाऱ्या कराव्या लागत. तसेच फळांना चकाकीही नव्हती. परिणामी दर मिळत नसे. 

दरम्यान लावलेल्या न्युसेलर मोसंबीचा आकार एकसारखा असला तरी झाडावर माल फार काळ टिकत नाही. 

त्या तुलनेमध्ये गावरान दगडी या मोसंबीचा आकार एकसारखा, झाड मजबूत व मोठे राहते. या झाडांवर किमान महिनाभर फळे टिकून राहतात. तसेच गळही कमी असल्याचे भास्कर पालवे सांगतात.  

फळबाग जोपासताना मशागतीची अनावश्यक कामे कमी केली. नांगरणी नाही, वखरणी नाही, गवत झालं की तणनाशक वापरून मारायचे. त्याचं आपसूकच आच्छादन तयार होते. तणांच्या मुळांमध्ये पाणी धरून ठेवले जाते. अवर्षणामध्येही आच्छादनामुळे ओलावा टिकून राहतो. गवत जागीच कुजवण्यास सुरुवात केली. मातीला सेंद्रिय कर्ब मिळून जमिनीची सुपीकता वाढत गेली. जमीन भुसभुशीत होऊन पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होऊ लागली. रासायनिक खतांचा वापरही मर्यादित प्रमाणात करू लागल्याचे भास्कर पालवे सांगतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्पादन व उत्पन्न
  २०१२ पासून आत्तापर्यंत मोसंबीच्या ४५० झाडापासून सरासरी किमान पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न भास्कर पालवे घेत आहेत. 
  २०१३ मृग बहारामधून ३२ टन उत्पादन व ३ लाख ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले. 
  २०१५ मध्ये नोटाबंदीच्या काळातही मृग बहाराच्या मोसंबी पासून सुमारे ४० टन उत्पादन व २ लाख २५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.  
  २०१७-१८ मध्ये ४ लाख ४५ हजार, २०१८-१९ मध्ये २ लाख ७० हजार रुपये उत्पन्न मिळाले.  
  २०१९-२० मध्ये आत्तापर्यंत ३५ टन मोसंबी उत्पादन मिळाले असून, अद्याप आंबे बहराची सुमारे ३ टन मोसंबी फळे झाडांवर आहेत. आजवर लाखभर रुपयांची कमाई पालवे यांना झाली आहे.
  नव्या पद्धतीने शेती करत असल्याने खर्चात मोठी बचत झाली आहे. मोसंबी बागेसाठी प्रति वर्ष सुमारे वीस हजार रुपये खर्च होतो. 

महत्त्वाचे
  २००५ पासून मोसंबीची बाग ठिबकवर आहे. त्याव्यतिरिक्त चार एकर शेती पिकेही ठिबकवर आहेत.
  तुरीत आंतरपीक मूग, कपाशीत आंतरपीक तूर घेण्याचे काम.
  शेणाच्या उपलब्धतेसाठी दोन बैल व एक म्हैस कायम गोठ्यात असते. सुमारे सहा ते आठ लीटर दुधाची ५० रुपये प्रमाणे विक्री होते. 
  पत्नी पार्वती, मुलगा गणेश आणि सूनबाई यांची शेतीत मदत होते. 
  आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथील तज्ज्ञ आणि डॉ. एम. बी. पाटील यांचे मार्गदर्शन घेतात. 

खत व्यवस्थापन 
  झाडाच्या बुडाशी कधीही खत व पाणी दिले जात नाही. परिणामी अनेक वर्षापासून झाडावरील रोगांचे प्रमाण कमी राहते. हुमणी अन्य मातीतून त्रासदायक ठरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव शेतात झालेला नाही.  
  प्रत्येक मोसंबी झाडाला दरवर्षी २० किलो शेणखत देतात.    पाणी उपलब्ध असल्यास रासायनिक खते देतात. प्रति झाड ७५० ग्रॅम डीएपी, ४०० ग्रॅम पोटॅश, २५० ते ३०० ग्रॅम युरिया असा साधारण डोस असतो. 
  यावर्षी प्रथमच प्रति झाड पाच किलो सल्फर देण्याचा प्रयोग केला. 

बहार व्यवस्थापन
पालवे यांच्या मोसंबी बागेत मृग व आंबे बहराचे नियोजन असते. मृग बहार आपोआप फुटतो तर आंबे बहरासाठी ऑक्टोबरपासून बाग ताणावर सोडली जाते. 
नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बागेचा ताण ठिबकद्वारे पाणी देऊन तोडण्याचा भास्कर यांचा कटाक्ष असतो. 
पहिले पाणी ठिबकद्वारे सुमारे दोन तास, त्यानंतर तीन ते चार दिवसांनी तीन तास देतात. 
आठ दिवसांनी ठिबकद्वारेच सहा तास, दहा बारा दिवसांनी चार ते पाच तास या प्रकारे पाण्याची उपलब्धता केली जाते. 
सामान्यतः दहा ते बारा दिवसाला चार ते पाच तास ठिबकने पाणी देण्याचे त्यांचे नियोजन असते. मात्र, एखाद्या वर्षी पाणी उपलब्धता कमी असल्यास आठ दिवसाला एक तास असे पाणी दिले जाते. 

सिंचनाची सोय
भास्कर पालवे यांच्या शेतात वडिलोपार्जित दोन आणि स्वतः घेतलेली एक अशा तीन विहिरी आहेत. देवगाव शिवाराच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम भागात विखुरलेल्या त्यांची शेतीमध्ये सुमारे ८ हजार फूट पाइपलाइनद्वारे पाणी फिरवले आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारी योजनेतून एक शेततळे घेतले होते. त्यात आज घडीला सुमारे पाच ते सात फूट पाणी शिल्लक आहे. 
 भास्कर पालवे,  ९७६५७०१२६५, ९९२२४६३९१३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com