हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात आखडता

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

जळगाव - कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे लक्षात घेता केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) पहिल्या ग्रेडच्या कापसासंबंधी ५४५० रुपये दर देण्यास सपशेल नकार दिला आहे. कापूस पहिल्या वेचणीचा, दर्जेदार असला तरी दर ५३५० रुपये मिळेल, असे केंद्रात कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीसीआयचे कर्मचारी बजावत आहेत. यातून जळगावात मागील तीन-चार दिवसांत शेतकरी व केंद्रातील कर्मचारी यांच्यात जोरदार शाब्दीक वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. 

जळगाव - कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे लक्षात घेता केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) पहिल्या ग्रेडच्या कापसासंबंधी ५४५० रुपये दर देण्यास सपशेल नकार दिला आहे. कापूस पहिल्या वेचणीचा, दर्जेदार असला तरी दर ५३५० रुपये मिळेल, असे केंद्रात कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीसीआयचे कर्मचारी बजावत आहेत. यातून जळगावात मागील तीन-चार दिवसांत शेतकरी व केंद्रातील कर्मचारी यांच्यात जोरदार शाब्दीक वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. 

राज्यात फक्त विदर्भ व मराठवाडा भागांत चांगला उतारा सध्याच्या निकषानुसार मिळत आहे, असा दावा सीसीआयचे अधिकारी करीत आहेत. देशात साडेआठ लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. यात राज्यात फक्त साडेतीन लाख गाठींची खरेदी झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश, गुजरातेत हवी तशी खरेदी झालेली नाही. बाजारात जशी तेजी आली तसे नोव्हेंबरमध्ये सीसीआयने खरेदी सुरू केली. खानदेशात शहादा, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत एरंडोल, भुसावळ, जामनेर तालुक्‍यांतील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, जळगाव व बोदवड व धुळे जिल्ह्यांत शिरपूर येथे खरेदी केंद्रांचे नियोजन केले. 

सुरवातीला उत्तम दर्जासंबंधी बन्नी ब्रह्मा प्रकारच्या कापसासाठी ५४५० रुपये प्रतिक्विंटलचे दर दिले. २९.५ ते ३०.५ मिलिमीटर कापसाची लांबी, ३.५ ते ४.३ मायक्रोनीयर (ताकद) व ३४ उतारा (एक क्विंटल कापसात किमान ३४ किलो रुई) असे निकष लावून खरेदी केली जात होती. परंतु जसा बाजारात चढउतार सुरू झाला तसा खरेदीबाबत हात आखडता घेतला. मागील सोमवारपासून (ता. ११) एचफोर, आरसीएच२ प्रकारच्याच कापसासंबंधी ५३५० रुपये प्रतिक्विंटलचे दर दिले जात आहेत. २७.५ ते २८.५ मिलिमीटर लांबी, ३.५ ते ४.७ मायक्रोनीअर व ३४ चा उतारा असे निकष सीसीआय लावत आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ३५चा उतारा हवा, असा निकष असेल. डिसेंबरनंतर एरंडोल व पहूर येथील केंद्र बंद केले. तर शहादा, नंदुरबारातही खरेदीबाबत निकषांचे अडथळे आणले. भुसावळ, जामनेरचे केंद्र सुरूच झाले नाही. 

सध्या फक्त जळगाव तालुक्‍यात आव्हाणे व शिरपूर येथे खरेदी सुरू आहे. सध्या एक क्विंटल कापसात ३४ चा उतारा मिळत नसल्याचा दावा सीसीआयचे कर्मचारी करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालयाने (मुंबई) खरेदी कमी करा, उतारा तपासून घ्या, असे तोंडी आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे खरेदी रखडत सुरू आहे. जेवढी खरेदी कमी कापूस उत्पादन करणाऱ्या तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकात सीसीआयने केली, तेवढी खरेदी राज्यात केलेली नाही.

बाजारातील चढउतार लक्षात घेता सीसीआयने खानदेशातील एरंडोल, पहूर (ता. जामनेर) केंद्र बंद केले आहे. हवे तसे दर किंवा हमीभाव पहिल्या दोन वेचणीच्या कापसाला मिळत नसल्याने जळगाव तालुक्‍यातील एका गावातील शेतकऱ्याने जळगाव येथील खरेदी केंद्रात सीसीआयच्या कर्मचाऱ्याशी मध्यंतरी वाद घातला. जोरदार शाब्दीक चकमक झाल्यानंतर कर्मचाऱ्याने संबंधित शेतकऱ्याचा ट्रॅक्‍टरभर कापूस ५४५० रुपये प्रतिक्विंटल या दरात अखेर खरेदी केला. या शेतकऱ्याकडे आणखी कापूस होता, पण त्याने या केंद्रात कापूस विक्रीसाठी नंतर आणला नाही. त्याने गावातच ५३०० रुपयांत कापसाची नंतर विक्री केली. या शेतकऱ्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर हा अनुभव ॲग्रोवनला सांगितला. अर्थातच खेडा खरेदीत कापसाला हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे. 

प्रतिक्रिया
या महिन्यात क्विंटलमागे ३४ किलो रुई, असा उतारा मिळावा, असा निकष सीसीआयचा आहे. पुढील महिन्यात (मार्च) ३५ किलो रुईचा उतारा हवा, असा निकष आहे. कापूस कोरडा, कमी आर्द्रतेचा, निर्यातक्षम येतो. परंतु उताऱ्याची कटकट सीसीआयचे केंद्र घेतलेल्या जिनिंग प्रेसिंग कारखानाचालकांचे नुकसान करणारी ठरत आहे. अटी व निकष हे शेतकऱ्यांना पूरक असावेत. कारखानदारांचा विचार नंतर करा, पण शेतकरी हित सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. 
- अविनाश भालेराव, जिनिंग प्रेसिंग कारखानदार, जळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central govt not interested purchasing cotton maharashtra