मिरची, गव्हाच्या फ्युचर्स भावात घसरण

डॉ. अरुण कुलकर्णी 
गुरुवार, 5 जानेवारी 2017

या सप्ताहात मिरची, सोयाबीन, गहू व गवार बी यांचे भाव घसरले. साखरेचे भाव वाढले. खरीप मका व हळदीचे भाव किंचित वाढले. मिरची, गहू व हळद यांचे फेब्रुवारी नंतरचे फ्युचर्स भाव वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने सध्याच्या स्पॉट भावांपेक्षा कमी आहेत. ज्यांच्याकडे मागील पिकाचा साठा असेल, त्यांनी तो विकून टाकावा. नवीन पिकाच्या उत्पादकांनी हेजिंगचा विचार करावा. 

पुढील सप्ताहात आवक वाढण्याची शक्यता आहे. मागणीसुद्धा वाढती राहील. यांचा परिणाम म्हणून भाव काहीसे स्थिर राहतील. 

१ डिसेंबरपासून एप्रिल २०१७ साठी खरीप मका, रब्बी मका, गहू व गवार बी यांचे, मे २०१७ साठी सोयाबीन व कापसाचे आणि जुलै २०१७ साठी मिरची व हळद यांचे नवीन व्यवहार सुरू झाले. त्याचप्रमाणे जुलै २०१८ साठी साखरेचे व्यवहार सुरू झाले. 
गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. 

मिरची 
मिरचीच्या (मार्च २०१७) किमती या सप्ताहात ८,८१८ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुंटूर) १२,४८० रुपयांवर आहेत. सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा जून २०१७ मधील फ्युचर्स किमती, नवीन पिकाच्या आवकेमुळे २९.३ टक्क्यांनी कमी आहेत (८,८१८ रु.). जर काही साठा असेल तर तो लगेच विकणे योग्य ठरेल. 

मका 
गेल्या दोन महिन्यांत खरीप मक्याच्या (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात १,४३४ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) १,४४० रुपयांवर आहेत. या वर्षी पीक समाधानकारक आहे. यापुढे आवक वाढेल. मागणी पण वाढती आहे. मार्चच्या फ्युचर्स किमती १,४९४ रुपयांवर आल्या आहेत. 

साखर 
साखरेच्या (मार्च २०१७) किमती या सप्ताहात ३ टक्क्यांनी वाढून ३,५९६ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती ३,५७१ रुपयांवर स्थिर आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१७) च्या फ्युचर्स किमती ३,५९६ रुपयांवर आल्या आहेत. उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे. साठा पुरेसा आहे. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. 

सोयाबीन 
सोयाबीनच्या फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात २.२ टक्क्यांनी घसरून ३,११९ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३,०८७ रुपयांवर आल्या आहेत. एप्रिल २०१७ च्या फ्युचर्स किमती ३,२६३ रुपयांवर आल्या आहेत. पुढील सप्ताहात मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. 

हळद 
हळदीच्या फ्युचर्स (मार्च २०१७) किमती चालू सप्ताहात ०.६ टक्क्यांनी वाढून ७,००० रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती ७,६९७ रुपयांवर आल्या आहेत. नवीन पिकाच्या अपेक्षेमुळे जून २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ९.२ (६,९९२ रु.) टक्क्यांनी कमी आहेत. मागणी कमी आहे. साठा पुरेसा आहे. या वर्षीचे उत्पादनसुद्धा समाधानकारक आहे. किमती कमी होण्याचा संभव आहे. 

गहू 
गव्हाच्या (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात ०.७ टक्क्यांनी घसरून २,०५८ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती २,१५० रुपयांवर आल्या आहेत. मार्च २०१७ मधील फ्युचर्स किमती स्पॉट किमतींपेक्षा १४.८ टक्क्यांनी (१,८३१ रु.) कमी आहेत. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. लांबवरचा कल उतरता आहे. 

गवार बी 
गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात ०.८ टक्क्यांनी घसरून ३,३२२ रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ३,३४८ रुपयांवर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (दिल्ली) किमतींपेक्षा मार्च २०१७ मधील फ्युचर्स किमती १.२ (३,३९० रु.) टक्क्यांनी अधिक आहेत. पुढील काही दिवस किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. 

कापूस 
कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१७) किमती या सप्ताहात १.२ टक्क्यांनी घसरून १९,०६० रुपयांवर आल्या आहेत. स्पॉट किमती १८,८२१ रुपयांवर आल्या आहेत. एप्रिल २०१७ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.७ टक्क्यांनी (१९,६०० रु.) अधिक आहेत. या पुढे मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गासडी). 

Web Title: chilli, wheat market rate