सामूहिक बळातून प्रगतिपथावर कुलस्वामी शेतकरी मंडळ

डॉ. मनोज तलाठी
Tuesday, 2 October 2018

रायगड जिल्ह्यातील किल्ले- रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राने आपल्या कार्यक्षेत्रातील तळे तर्फे कोशिंबळे गावातील शेतकऱ्यांना सामूहिक शेतीची प्रेरणा दिली. मार्गदर्शन, तंत्रज्ञान व प्रशिक्षणही दिले. त्यातूनच आज गावात कुलस्वामी शेतकरी मंडळ स्थापन झाले. सुधारित तंत्रज्ञानाचा वसा घेत त्यांनी विविध पिकांचे उत्पादनवाढ घेत उत्पन्नवाढही केली आहे. ग्रामबीजोत्पादनातूनही स्वयंपूर्णतः मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. 

सामूहिक शेतीचा ‘पॅटर्न’ कोकणात फारसा दिसून येत नाही आणि तसा तो प्रत्यक्षात आला तरी फार काळ टिकत नाही असे म्हणतात. माणगाव तालुक्‍यातील तळे तर्फे कोशिंबळे (जि. रायगड) या गावातील शेतकऱ्यांनी मात्र जिद्दीने सामूहिक शेतीचा वसा धरला. तो चिकाटीने टिकवला देखील.गटातील १६ शेतकरी आठ वर्षांपासून सातत्याने कुलस्वामी शेतकरी मंडळाच्या माध्यमातून अखंड कार्यरत आहेत. त्यांना कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), किल्ला- रोहा (ता. रोहा) यांचे पाठबळ व मार्गदर्शन मिळत आहे.

शेतकरी व केव्हीके आले एकत्र 
तळे तर्फे कोशिंबळे हे सुमारे ४०० लोकवस्तीचे गाव मुंबई-गोवा महामार्गावर वसले आहे. महामार्गाच्या पश्‍चिमेकडे गाव तर पूर्वेकडे व उत्तर-दक्षिण दिशेकडे शेती आहे. खरिपात पूर्णपणे भातशेती तर रब्बी व उन्हाळी हंगामात उत्तरेकडे दुबार भातशेती कालव्याच्या पाण्यावर केली जाते. पूर्वेकडील भागात कडधान्ये, भाजीपाला लागवड असते. फेब्रुवारीअखेरपर्यंतच पाणी उपलब्ध असल्याने मार्च ते मे या काळात पिकांना संरक्षित पाणी देण्यामध्ये अडचणी यायच्या. पर्यायाने उपलब्ध ओलीतावरच पिके घेतली जायची. केव्हीकेने गावाला पाणी अडवा पाणी जिरवा या जलसंवर्धनाच्या माध्यमातून एकत्र आणले. बंधारे बांधण्यास उपकृत केले. गावातील शेतकऱ्यांना मंडळ स्थापन करण्याविषयी दिशा दिली. प्रत्येक सभासद शंभर रुपये प्रतिमहिना वर्गणी गोळा करण्यास सुरूवातही झाली. अशारीतीने कुलस्वामी शेतकरी मंडळाची स्थापना झाली. मंडळाचे महिपत पांडुरंग मांजरे अध्यक्ष आहेत. 

जलसंधारण ते ग्रामस्वच्छता 
सन २००८ पासून केव्हीकेचे सर्व विषयांतील जिल्ह्यातील विविध भागांत जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. माजी प्रशिक्षणार्थी संमेलनाचा अनोखा उपक्रमही सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांत आत्मविश्‍वास वाढून त्यांच्या अनुभवाचे बोल अन्य शेतकऱ्यांना ऐकायला मिळून त्याप्रमाणे त्यांच्या शेतीत बदल होत आहेत. ‘कुलस्वामी’ मंडळाने जलसंधारण कार्यक्रमात भाग घेतला. ग्रामपंचायतीमार्फत दाखणे नदीवर बांधण्याचा बंधारा सामूहिक श्रमातून पूर्ण केला. यातून पंधरा हजार रूपयांचे अनुदानही मिळाले. आजमितीला मंडळ प्रत्येक वर्षी जलसंधारण कार्यक्रमात सहभाग घेत आहे. प्रत्येक वर्षी मंडळामार्फत गावातील ग्रामस्थ, महिला व युवकांच्या सहकार्याने नवपात्र उत्सवापूर्वी ग्रामस्वच्छता अभियान स्वयंस्फूर्तीने राबविले जाते.

ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमातून फायदा  
मंडळातील सदस्यांना कृषी तंत्र विद्यालय, रोहा यांचेही सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्र येण्यातून भात व कडधान्य पिकांचा ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात आला. त्यातून उत्कृष्ट बियाणेनिर्मिती साधली. मिळालेले सामूहिक नफा मंडळाच्या अन्य उपक्रमांसाठी उपलब्ध केला. वेळेवर न मिळणाऱ्या बियाणे समस्येवर मात करून गावपातळीवर भाताच्या कर्जत-५, कर्जत-७ जातींचे बियाण निर्माण केले. 

परसबागेतील कुक्कुटपालनला दिली चालना 
मंडळामार्फत गावात केव्हीकेच्या सहकार्याने यापूर्वी शेतकरी महिलांसाठी गिरीराज कोंबडीपालनाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या महिलांना प्रत्येकी १० पक्षी मंडळाच्या खर्चातून देण्यात आले. या पक्षांच्या पालनातून चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे दिसले. आता गावात कुक्कुटपालन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महिला स्वतःहून गिरीराजा पक्षांची आवश्‍यकतेनुसार केव्हीकेमधून  खरेदी करतात. पक्षी तसेच अंडी विक्रीतून चांगले अर्थाजन करतात.

कुलस्वामी मंडळ- अन्य ठळक बाबी 
हंगामाच्या सुरवातीला प्रतिसभासद कर्ज बियाणे, खते व अन्य निविष्ठां खरेदीसाठी नाममात्र दराने (एक  टक्का) कर्ज उपलब्ध केले जाते. याची परतफेड सहा महिन्यांतच करण्याचा नियम कटाक्षाने पाळला जातो. -गावात `स्वदेस'' फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विशाल वरूठे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक शेती, ठिबक संच तंत्रज्ञान, यंत्रे व अवजारांचा वापर याविषयी प्रशिक्षण  अनुदानावर बियाणे, यंत्रे व अवजारे देण्याबाबत मार्गदर्शन  मंडळामार्फत १० टक्के निधी उपलब्ध झाल्यावर संबंधित संस्थेमार्फत यंत्रे व अवजारे बॅंक तयार करण्यात आली. यात सुरवातीला पॉवर टिलर खरेदी करण्यात आला. 

मागील व यंदाच्या खरिपात त्याचा वापर सामूहिक तत्त्वावर भाडेशुल्क आकारणी करून करण्यात आला. यातून मंडलास चांगला आर्थिक फायदा झाला. 
भात कापणी, झोडणी, भात स्वच्छ करण्याची यंत्रे तसेच फवारणी यंत्रांचीही खरेदी

यशाचे गमक कशात? 
मंडळाच्या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी
आर्थिक व्यवहारांची सर्वसमावेशक मांडणी
सर्व सभासदांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध, शासकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
सर्व स्तरावरील अधिकारी- कर्मचारी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध 
केव्हीकेसह डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे,
विघवली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेव बक्कम यांचे पाठबळ

पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग 
मंडळातील सदस्य केव्हीकेसह कृषी विभाग, पंचायत समिती यांच्यामार्फत आयोजित नवे वाण, तंत्रज्ञानाच्या प्रथमदर्शी प्रात्यक्षिकात सहभाग घेतात. भाताच्या कर्जत-७, कर्जत-८,  कर्जत-९, तसेच भुईमूग, भेंडी, वाल (कोकण वाल), हरभरा या पीक प्रात्यक्षिकांमध्ये त्यांचा सहभाग अत्यंत अभ्यासपूर्ण ठरला आहे. सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब ते करतात. या उपक्रमातून पारंपारिक वाणांपेक्षा अधिक उत्पादन त्यांनी मिळवित व आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. 

(लेखक रोहा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आहेत.) 
महिपत पांडुरंग मांजरे, ९१६८११०५४८ 
डॉ. प्रमोद मारुती मांडवकर, ९४२१२३८५५२ 
विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार)  
डॉ. मनोज सुधाकर तलाठी, ९४२११३६०३२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collective farming Kulaswamy Farmer mandal