‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाला फटका

Agriculture-Goods
Agriculture-Goods

शुक्रवारी (ता. १३ मार्च) संपलेला सप्ताह शेतीमालाच्या दृष्टीने अतिशय निराशादर्शक होता. या वर्षी भारतातील शेती उत्पादन विक्रमी ठरण्याचा संभव आहे. जागतिक पुरवठ्यातसुद्धा वाढ होण्याचा संकेत आहे. या पार्श्वभूमीवर कोविद- १९ (कोरोना) हा जागतिक साथीचा रोग ठरलेला असल्याने व भारतातसुद्धा त्याने गंभीर स्वरूप धारण केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर  मंदीचे वातावरण आले आहे. वाहतुकीची साधने व मालाची वाहतूक कमी झालेली, सर्वच राष्ट्रांचे वाढते निर्बंध आणि मागणीमधील मोठी घसरण यामुळे या सप्ताहात जगातील सर्वच बाजारांत सर्वच प्रमुख मालांचे भाव घसरले. शेतीमाल व भारतातील बाजारसुद्धा यातून सुटलेले नाहीत.  

या सप्ताहात फ्युचर्स मार्केटमध्ये सर्व पिकांचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले. सर्वांत मोठी घसरण सोयाबीनमध्ये झाली. सोयाबीनचे भाव ८.१ टक्क्याने कमी झाले. त्याखालोखाल हळद (७.८ टक्के), गवार बी (६.६ टक्के), मका (५.८ टक्के), हरभरा (४ टक्के), कापूस व गहू (२.९ टक्के) यांच्या भावात घसरण झाली. (आलेख १). एप्रिलनंतर मका, हरभरा व गव्हाचे भाव हमीभावापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  

सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने मका, सोयाबीन, गहू व हरभरा यांच्या भविष्यातील फ्युचर्स किमतींतसुद्धा घसरण दिसून येत आहे. पुढील दोन सप्ताहामध्ये या परिस्थितीत फार सुधारणा अपेक्षित नाही. 

गेल्या सप्ताहातील NCDEX व MCX मधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.
मका (रब्बी)
रब्बी मक्यामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (एप्रिल  २०२०) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. १,७८८ ते रु. १,५९९). या सप्ताहात त्या ५.८ टक्क्यांनी घसरून  रु. १,५०६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,८०७ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. बाजारातील किमती एप्रिल नंतर हमीभावाच्या खाली राहण्याचा संभव आहे. 

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,१९२ ते रु. ३,६८२). गेल्या सप्ताहात त्या ५.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,७३८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ८.१ टक्क्यांनी घसरून रु. ३,४३४ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. जून डिलिव्हरीसाठी रु. ३,४१८ भाव आहे. तो सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ५.५ टक्क्यांनी कमी आहे. नजीकच्या भविष्यात सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता नाही. 

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारीमध्ये रु. ५,८५२ ते ६,१४२ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ७.८ टक्क्यांनी घसरून रु. ५,४९६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ५,६५० वर आल्या आहेत. जूनच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ५,६४४).

गहू 
गव्हाच्या (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या (रु. २,२१० ते रु. २,०८६). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. १,८५५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती ४.९ टक्क्यांनी घसरून रु. १,९९८ वर आल्या आहेत. जूनच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,८५५).  या वर्षीचा हमीभाव रु. १,९२५ आहे. गव्हाचे अपेक्षित विक्रमी उत्पादन लक्षात घेता किमती हमीभावापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,०७० ते रु. ३,६३४). या सप्ताहात त्या ६.६ टक्क्यांनी घसरून रु. ३,५१० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ८.१ टक्क्यांनी घसरून रु. ३,४६७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जूनमधील फ्युचर्स किमती २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,५४०). किमतीतील घसरण थांबण्याची शक्यता कमी आहे. 

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारी महिन्यात रु. ३,८७६ व रु. ४,०३६ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ४ टक्क्यांनी घसरून रु. ३,७८७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमतीसुद्धा ३.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,८६९ वर आल्या आहेत. जूनमधील फ्युचर्स किमती (रु. ३,८५१) स्पॉट किमतींपेक्षा ०.५ टक्क्याने कमी आहेत. हमीभाव रु. ४,८७५ आहे. हरभऱ्याच्या किमती हमीभावापेक्षा कमी राहण्याचा संभव आहे. 

कापूस 
MCX मधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०२०) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या. (रु. १९,८८० ते रु. १८,६५०). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. १८,४७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती १.२ टक्क्यांनी घसरून रु. १८,३८८ वर आल्या आहेत. जूनच्या फ्युचर्स किमती रु. १९,१५० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.१ टक्क्यांनी अधिक आहेत. 

मूग
मुगात अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (मेरता) किमती १.२ टक्क्यांनी घसरून रु. ७,६१० वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती रु. ७,७२५ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. 

बासमती धान (Paddy Basmati)
बासमती धानमध्येसुद्धा अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. २,९७५ वर स्थिर आहेत. 

बाजरी 
बाजरीमध्येसुद्धा अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (जयपूर) किमती २.२ टक्क्यांनी घसरून रु. १,६४७ वर आल्या आहेत. 
(सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठ).
- arun.cqr@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com