कापूस निर्यातीत ३१ टक्के घट होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

यंदाच्या हंगामात(२०१८-१९) देशाची कापूस निर्यात ३१ टक्के घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)ने वर्तवला आहे.

यंदाच्या हंगामात(२०१८-१९) देशाची कापूस निर्यात ३१ टक्के घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)ने वर्तवला आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस निर्यात २२ लाख गाठींनी कमी होऊन ४७ लाख गाठी राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ६९ लाख गाठी कापूस निर्यात झाली होती. यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे कापूस उत्पादन घसरल्याने निर्यातीला फटका बसला आहे.   

‘सीएआय''ने २०१८-१९ या हंगामात ३२१ लाख गाठी कापूस उत्पादन राहील, असा ताजा अंदाज व्यक्त केला आहे. आधीच्या अंदाजानुसार ३२८ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असे सांगण्यात आले होते. त्यात ७ लाख गाठींची कपात करण्यात आली आहे. 

‘सीएआय''ने ताज्या अंदाजात गुजरात व आंध्र प्रदेशमधील कापूस उत्पादनात प्रत्येकी १ लाख गाठी, तेलंगणातील कापूस उत्पादनात ४ लाख गाठी, कर्नाटकातील कापूस उत्पादनात ७५ हजार गाठी, तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात ८० हजार गाठींची कपात केली आहे. तसेच तमिळनाडू आणि ओडिशा राज्यांतील कापूस उत्पादन अंदाजांत अनुक्रमे ५० हजार गाठी आणि ५ हजार गाठींची किरकोळ वाढ केली आहे.

यंदा प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागले. त्यामुळे कापूस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. सुमारे ७० ते ८० टक्के क्षेत्रामध्ये कापूस बोंडांची तिसरी आणि चौथी वेचणीच करता आली नाही.

‘सीएआय''ने यंदाच्या हंगामात कापसाचा देशांतर्गत खप ३१६ लाख गाठी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शिल्लक साठा १३ लाख गाठी राहण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton exports will decline by 31 per cent

टॅग्स