भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई - भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस उत्पादनात १.७ टक्के घट येणार अाहे. भारतात २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादन ३६५ लाख गाठी (१ कापूस गाठ = १७० किलो) होईल. मागील वर्षी २०१७-१८ मध्ये देशात ३७२ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने दिली आहे.

मुंबई - भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस उत्पादनात १.७ टक्के घट येणार अाहे. भारतात २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादन ३६५ लाख गाठी (१ कापूस गाठ = १७० किलो) होईल. मागील वर्षी २०१७-१८ मध्ये देशात ३७२ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने दिली आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात भारतात यंदा कापूस उत्पादनात १.७ टक्क्यांनी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘‘भारतात २०१८-१९ मध्ये ३६५ लाख गाठी उत्पादन होईल असे म्हटले आहे. तसेच मुख्य कापूस उत्पादक राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यास उत्पादनात वाढ होईल, असे झाले नाही तर उत्पादन घटीचा अंदाज कायम राहील. मॉन्सूनच्या मधल्या काळात कापूस उत्पादक अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने कापूस उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे देशाच्या प्रतिहेक्टरी उत्पादकतेत तीन ते चार टक्के वाढ होऊन ५२६ किलो राहील. मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण असल्याने कापूस पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना किडीनियंत्रणावर भर दिला आहे,’’ असे अहवालात म्हटले आहे.

तसेच गुजरात राज्यातही कापूस वाढीच्या स्थितीत असून शेतकऱ्यांना ओलावा टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाय करण्याचे सुचविण्यात आले आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात हे महत्त्वाचे कापूस उत्पादक राज्य आहे.

शिलकी साठा कमी राहणार 
अमेरिकेच्या कृषी विभागाने भारताचा शिलकी साठा २०१८-१९ मध्ये ११८.८ लाख गाठी (१ गाठ=२१८ किलो) राहील असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु त्यात घट करून यंदा ८९.८ लाख गाठी शिलकी साठा राहील, असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच भारतातून ४४ लाख गाठींची निर्यात होईल, तर १५ लाख गाठी कापसाची आयात होईल. भारताचा घरगुती वापर २५५ लाख गाठी होईल, हा सुरवातीचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने अमेरिकेत कापूस उत्पादनाचा अंदाज वाढविला आहे. सुरवातीच्या अहवालात १९७ लाख गाठी उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता त्यात वाढ करून १९८ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज जाहीर केला आहे. 

जागतिक कापूस उत्पादनही घटणार
अमेरिकेच्या कृषी विभागने जागतिक कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सुरवातीच्या अहवालात विभागाने जागतिक कापूस उत्पादन १२१९.७ लाख गाठी उत्पादन होईल असा अंदाज जाहीर केला होता. सुधारित अंदाजानुसार जागतिक कापूस उत्पादन १२१६.६ लाख गाठी होईल असे म्हटले आहे. तसेच जागतिक शिलकी गाठी ७७४.५ लाख राहतील असा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton Production