‘सीआरए’ तंत्राने तगली दुष्काळातही फळझाडे

The CRA technique produces fruit trees in drought
The CRA technique produces fruit trees in drought

प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) हे तंत्रज्ञान अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तमिळनाडू राज्यात चांगले रुजले आहे. फळबाग लागवडीसह वृक्षलागवड, औषधी वनस्पती, भाजीपाला लागवड आदींसाठी या राज्यात या तंत्राचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यातून अवर्षणातही तग धरून राहण्याची झाडांची क्षमता वाढली असून, त्यांची वाढही चांगली झाल्याचे आढळले आहे.  

सुरवातीचे प्रयोग 
हवामानाशी सुसंगत पीक पद्धती किंवा प्रतिकूल हवामानावर मात करण्याचे तंत्रज्ञान अनेक वर्षांचे प्रयत्न व प्रयोगांनंतर तमिळनाडू राज्यात विकसित झाले आहे. सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) म्हणजेच हवामान अनुकूल शेती पद्धती असे त्याला म्हटले जाते. फळबाग लागवडीसह रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड, नरेगा, औषधी वनस्पती, वनवृक्ष, वेलवर्गीय भाजीपाला लागवड आदींसाठी तमिळनाडू राज्यात या तंत्राचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तमिळनाडू राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. कोरलापल्ली सत्यगोपाल यांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व पुढे आणण्यासाठी अत्यंत कष्ट घेतले. ते चेन्नई येथे महसूल प्रशासनाचे अतिरिक्त प्रधान सचिव आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये ते निवृत्त होत आहेत. 

या तंत्राचे होणारे फायदे 
  सिंचनाची कार्यक्षमता वाढते.   पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. मोकाट सिंचनापेक्षा कमी पाणी लागून जलसंवर्धन होते.   पिकांच्या मुळांना दोन ते तीन फुटांवर सिंचन देण्याची पद्धत.   मुळांना पाणी उपलब्ध झाल्याने ती अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकतात. वाढ जोमाने व निकोप होते.   दुष्काळात तग धरण्याची क्षमता वाढते.

सन १९९१ च्या सुमारास उपजिल्हाधिकारी म्हणून होसूर जिल्ह्यात कार्यरत असताना अवर्षण स्थितीत फळबागा जगवण्यासाठी शेतकरी मडका सिंचनाचा वापर करत असल्याचे डॉ. सत्यगोपाल यांच्या दृष्टीस पडले. परंतु मडक्याच्या आकारामुळे पाणी हवे तितके खोलवर मुरत नसल्याचे दिसून आले. यानंतर वेगवेगळ्या आकाराची मडकी वापरून प्रयोग केले. दोन फूट खोल जाईल अशा लंबगोल मडक्याची निर्मिती त्यांनी स्थानिक कुंभाराकडून करून घेतली. शासकीय फार्मवर सुमारे नऊ हजार बांबू रोपांसाठी त्याचा प्रयोग करून तो यशस्वी झाला. परंतु त्यासाठी खर्च जास्त येत होता. त्यानंतर पीव्हीसी पाइपचा वापर करून प्रयोग करण्यात आले. परंतु तेही खर्चिक असल्याचे दिसले. पुढे २०१६ मध्ये मात्र ‘सीआरए’ तंत्रज्ञानाचा प्रसार सुरू झाला. डॉ. सत्यगोपाल पूर्वी ‘कमिशनर ऑफ रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन’ या पदावर काम करत असल्याने या पदाचेही संक्षिप्त सीआरए असेच होते. हेच नाव पुढे तंत्राला रूढ झाले. 

असे आहे तंत्रज्ञान
 वृक्ष किंवा फळबागांची रोपे- कलमे लावण्याच्या जागी दोन बाय दोन फूट बाय दोन फूट खोलीचा खड्डा खोदला जातो. खड्ड्याच्या दोन किंवा चार कोपऱ्यांत दोन फूट लांबीचे पीव्हीसी पाइप रोवले जातात. यानंतर गांडूळखत, शेणखत व मातीने खड्डा तीन चतुर्थांश भरून घेतला जातो. यावेळी पाइप सरळ रेषेत राहतील याची काळजी घेतली जाते.   खड्ड्यात रोप लावून माती भरून घेतली जाते. यानंतर सर्व पाइपमध्ये अर्धा फूट गांडूळ खत व जमीन पातळीपर्यंत वाळू भरण्यात येते.  त्यानंतर पाइप हळूवार वर ओढून बाहेर काढले जातात. ते पुढील लागवडीसाठीही उपयोगी ठरतात. हळूवार पाइप काढल्याने दोन किंवा चारही कोपऱ्यांत वाळूचा दोन फूट खोलीचा सलग ‘कॉलम’ तयार होतो. रोपांना दिलेले पाणी प्रथम चार कॉलम्समध्ये शोषले जाते. कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरवात होते. अशा प्रकारे मुळांच्या परिसरास तात्काळ ओलावा मिळतो.  गांडूळ खत किंवा शेणखतामुळे पाणी धरून ठेवले जाते. त्यातून मुळांना अन्नद्रव्ये मिळतात. रोपांची वाढ झपाट्याने होते. सशक्त झाड निर्माण होते. काही ठिकाणी ओबडधोबड वाळूचा उपयोग केला तरी चालतो. बाल्यावस्थेतच काळजी घेतली तर वाढ चांगली होऊन अवर्षणाला तोंड देण्याची रोपांची क्षमता वाढते.

जुन्या बागांमध्ये प्रयोग 
अवर्षणाच्या काळात अनेक फळबागा वाळून जातात. तीरुप्पूर जिल्ह्यातील नारळाची अशी बाग या तंत्राने वाचवण्यात यश आले आहे. बुंध्यापासून थोडे दूर छिद्र पाडून त्यात गांडूळ खत व बारीक वाळू भरून त्याद्वारे सिंचन दिले जाते. यामुळे कमी पाण्यातही फळबाग तग धरू शकते.

ठिबकला जोड ‘सीआरए’ची  : तमिळनाडूमध्ये ज्या ठिकाणी ठिबक बसवले आहे तेथे ड्रीपर हे वाळूच्या ‘कॉलम’वर येईल याची दक्षता घेतली जाते. ठिबक सुरू केले की पाणी वाळूच्या ‘कॉलम’द्वारे झिरपून दोन फुटांचा मातीचा थर अल्पावधीत सिंचित होतो. या तंत्रामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. 

प्रयोगांचे  उत्साहवर्धक परिणाम 
  तमिळनाडूत विविध शासकीय तसेच स्वयंसेवी संस्था, कृषी विद्यापीठ यांच्याद्वारे हे तंत्रज्ञान पारखण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे झाडांची उंची, पानांचा आकार, फांद्यांची संख्या, बुंध्याचा घेर पारंपरिक लागवडीच्या तुलनेत वाढला असल्याचे प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे.   तंजापूर जिल्ह्यात या तंत्रावर आधारीत चिंचेच्या झाडाची उंची दोन वर्षांनंतर पारंपरिक लागवडीपेक्षा चार फुटाने जास्त आढळली. बुंध्याचा घेर पारंपरिक पद्धतीत दहा सेंमी तर सीआरए तंत्रज्ञानावर आधारीत बुंध्याचा घेर २१ सेंमी दिसून आला.   कांचीपुरम जिल्ह्यात तंत्रज्ञानावर लागवड केलेल्या आंब्याची दोन वर्षांत उंची ३१० सेंमी,  बुंध्याचा घेर २० सेंमी, फांद्यांची संख्या १४ आढळली. पारंपरिक पद्धतीत हीच संख्या अनुक्रमे १८९ सेंमी, १३ सेंमी व १० सेंमी होती.    तिरुवांनामलाई जिल्ह्यात या तंत्रज्ञानावर आधारीत सागाची उंची ५०४ सेंमी तर पारंपरिक पद्धतीच्या सागाची उंची २१४ सेंमी दिसून आली. तंत्रज्ञानावर आधारीत सागाची उंची दीड वर्षात नऊ फूट पाच इंचाने जास्त दिसून आली.   विल्लुपूरम जिल्ह्यात या तंत्रज्ञानावर आधारीत शेवग्याच्या बुंध्याचा घेर दीड वर्षांत ३१ सेंमी तर पारंपरिक पद्धतीत हाच घेर २३ सेंमी दिसून आला.   विरुधुनगर जिल्ह्यात या तंत्राचा वापर केलेल्या करंज वृक्षाच्या पानाची लांबी तीन महिन्यात १३ सेंमी तर पारंपरिक पद्धतीत ती ८ सेंमी. दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com