पुणे जिल्ह्यात वादळी पावसाने पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे आंबा, कांदा आणि कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. 

पुणे - जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी (ता. १५) दुपारी व रात्री उशिरापर्यंत अवकाळी पावसाने सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटात जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गाराही पडल्या. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे आंबा, कांदा आणि कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. 

 आंबेगाव तालुक्यातील रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने लौकी व चास येथे घरासमोरील शेताच्या बांधावर असलेल्या तीन नारळाच्या झाडांवर वीज पडून झाडे जळाली आहेत. लौकी येथे शेळी ठार झाली आहे. मावळ तालुक्यातील आंदर मावळ, लोणावळा परिसरात विजेचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. 

अचानक आलेल्या पावसाने चाकण बाजारातील व्यापारी, शेतकरी यांचा कांदा भिजू लागला आहे. कांद्याला भाव नाही, त्यात पावसाने कांदा भिजला तर तो सडणार आहे. कांदा कसा झाकायचा हा प्रश्न व्यापारी, शेतकरी यांना पडला आहे. चाकण बाजारात शनिवारी चौदा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कुरुळी, (ता. खेड) तालुक्‍याच्या दक्षिण भागातील कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी परिसरातील आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावली. 

खेड-शिवापूर परिसरातही सायंकाळी गारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने आंबा, कांदा आणि कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. गाऊडदरा, श्रीरामनगर, शिवापूर, रांजे, आर्वी, कोंढणपूर, खोपी, कुसगाव, शिवरे, वरवे या गावांत पावसाचा जोर जास्त होता. पावसाने आंबा, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. शहरालगत धायरी, वडगाव बुद्रुक व नऱ्हे परिसरांमध्येही मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. दौंड शहर आणि जिल्ह्यातही वादळी पावसाच्या सरी पडल्या. जुन्नर तालुक्यातही दुपारनंतर ढग दाटून येत वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाने शिडकावा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop damage in the district of Pune due to rainstorms