२१ एकरांत सीताफळ 

२१ एकरांत सीताफळ 

दुष्काळी भाग असलेल्या पारनेर तालुक्‍यातील राळेगण थेरपाळ (जि. नगर) भागात पाण्याची बऱ्यापैकी  उपलब्धता आहे. येथील कारखिले परिवाराची पूर्वी एकत्रित शेती होती. त्यांनी १९८८ साली तीन एकरांवर डाळिंबाची लागवड केली. टप्प्याटप्प्याने वाढ करत ती ३५ एकरापर्यंत नेली. 

कुटुंबातील बाळासाहेब कोंडीबा कारखिले बीएस्सी. ॲग्री आहेत. सन १९८९ च्या सुमारास पुण्यात शिकायला असताना ते गुलटेकडी बाजारात जात. तेथे सासवड (जि. पुणे) भागातून सीताफळ विक्रीला येत. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जायचे. हे पीक त्यांच्या मनात भरले. त्याचा पूर्ण अभ्यास करून लागवडीचा निर्णय घेतला.  

 सीताफळाची शेती 
बाळासाहेब यांना पाच बंधू. आता प्रत्येकाची स्वतंत्र शेती आहे. मात्र बाळासाहेब व थोरले बंधू शिवाजी यांची एकवीस एकर शेती एकत्र. संपूर्ण सीताफळ पीक.  
एक एकर- ३० वर्षे वयाची बाग. सुमारे ३२० झाडे.    
नऊ एकर- अंबेजोगाई येथील संशोधन केंद्रातर्फे विकसित धारूर वाण
उर्वरित क्षेत्र- सीताफळ उत्पादक नवनाथ कसपटे यांनी विकसित केलेले वाण व अन्य नवे
चौदा वर्ष एक एकरांत सीताफळ घेतले. सोबत डाळिंब होते. मात्र सीताफळातून शाश्वत उत्पादन मिळू लागल्यानंतर डाळिंबाचे क्षेत्र कमी करत सीताफळाचे क्षेत्र वाढवले. 
जुन्या व नव्या झाडाच्या वयानुसार प्रति झाड वीस किलो शेणखत, एक किलो निंबोळी पेंड, तीनशे ग्रॅम रासायनिक खत, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये, जीवामृत आणि विद्राव्य खतांचाही वापर होतो. 
सध्या राळेगण थेरपाळ परिसरासह अन्यत्र बाळासाहेबांनी या शेतीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

परिवार राबतो शेतीत  
सीताफळ बाग व्यवस्थापनात बाळासाहेबांचा परिवार दिवसभर राबतो. हंगामाच्या काळात कुटूंबातील सदस्य बारा- तेरा तास कार्यरत असतात. पत्नी सौ. सुरेखा, भाऊ शिवाजीराव महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. पदवीचे शिक्षण घेतलेला बाळासाहेबांचा मुलगा अमोलही नोकरीच्या मागे न जाता शेतीचीच जबाबदारी सांभाळतो. 

विश्वासाचा ब्रॅंड 
कारखिले सीताफळाचे बॉक्स पॅकिंग करतात. आईची कृतज्ञता म्हणून मातोश्री हा ब्रॅंड तयार केला आहे. आपल्या दर्जेदार, वजनदार फळाबाबत त्यांनी इतका विश्वास तयार केला आहे की बॉक्सचे कव्हर न उघडताच लोक तो घेऊन जातात असे बाळासाहेबांनी अभिमानाने सांगितले. 

जलसंधारणाचे काम 
पाण्यासाठी तीन विहीरी. मात्र गरजेच्या वेळी म्हणून चौदा वर्षांपूर्वी स्वखर्चाने शेततलाव 
संपूर्ण क्षेत्रावर ठिबक. सीताफळ लागवड व भागात पहिल्यांदा ठिबक वापरणारे या भागातील बाळासाहेब पहिले शेतकरी असावेत. 
विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी शेताशेजारुन जाणाऱ्या ओढ्यावर सहा वर्षांपूर्वी तीन छोटे बंधारे स्वखर्चाने बांधले.  

पुरस्कार व अन्य 
सह्याद्री कृषी सन्मान, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शेतकरी, सीताफळ महासंघातर्फे कृषीभूषण स्व. वि. ग. राऊळ कृषी पुरस्कार 
२००९ साली इस्त्राईल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट   
बागेला सीताफळ महासंघ, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या भेटी  

बाग व्यवस्थापन वैशिष्ट्ये 
उन्हाळी बहार धरण्यावर भर. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये फळे तोडणीस येतात. या वेळी बाजारात दर चांगला असतो. शिवाय एकाचवेळी फळे उपलब्ध न होता मागेपुढे होतात. त्यामुळे तोडणी आणि विक्रीलाही सोपे जाते. 
जुन्या बागेचे पाच वर्षांपूर्वी पुनरूज्जीवन. यात संपूर्ण छाटणी केली. त्याला पुन्हा चांगले फुटवे आले. झाडाचा आकार गोलाकार ठेवला. कॅनोपीचे व्यवस्थापन चांगले केले. 
 यंदा जुन्या एक एकरात बहार धरतेवेळी बाजरी पेरली. फळे येण्याच्या काळात पर्यंत बाजरी फुलोऱ्यात होती. त्यामुळे मधमाशांचे प्रमाण बागेत नेहमीपेक्षा जास्त होते. त्याचा फळधारणेला मोठा फायदा झाला. शिवाय आंतरपिकामुळे बागेत गारवा राहिला. त्याचा फळधारणेला फायदा झाला. बागेतील ‘मायक्रो क्लायमेट’साठी फॉगर्सचा वापर केला. या सर्व बाबींमधून नेहमीच्या तुलनेत वीस टक्के उत्पादनात वाढ झाली.
बागेत सुरवातीच्या काळात मल्चिंग पेपरचा वापर करुन खरबूज, हिरवी मिरची, कांदा, कलिंगड आदी आंतरपिके घेत त्यांचेही चांगले उत्पादन मिळवले. 
बाळासाहेबांचे अनेक मित्र कृषी क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्याचा तांत्रिक ज्ञान वाढवण्यासाठी फायदा होतो. 
 हलक्‍या प्रतीच्या जमिनीचा विचार करुन लागवड 

उत्पादन व उत्पन्न 
प्रति झाड- १६ ते १७ किलो 
मिळणारे दर- ६० ते ७० रुपये प्रति किलो 
७०० ग्रॅम वजनाच्या फळाला १२० रुपये दरदेखील मिळाला आहे. 
दोनच व्यापाऱ्यांना विक्री 
अनेक वर्षांपासून सीताफळ शेतीत असल्याने विक्रीतही कुशलता मिळवली आहे. विक्रीतील धोके, फसवणूक यांचा अनुभव घेऊन काही वर्षांपासून मुंबईतील दोनच ठरलेल्या व्यापाऱ्यांना विक्री होते. विक्रीला नेण्यासाठी स्वतःचे वाहन आहे. 

: बाळासाहेब कारखिले, ९८२२९९०४२० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com