दुग्ध व्यवसायाने सावरली कुटुंबाची घडी

Milk-Business
Milk-Business

औद्योगिक कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेणे भाग पडल्यानंतर खचून न जाता बाळासाहेब रानवडे (नांदे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी दोन गायींपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज चिकाटी, मेहनतीतून व्यवसाय वाढवत १५ गायी व रोजच्या १२० लिटर दूध संकलनापर्यंत विस्तार केला आहे. त्यातून कुटुंबाची आर्थिक घडी बसवली आहे. 

पुणे शहरानजीक असलेल्या हिंजवडी परिसरात शहरीकरण व माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी) वेगाने विस्तारले आहे. येथील जमिनींचे दर म्हणूनच गगनाला भिडले आहेत. याच हिंजवडीपासून पाच किलोमीटरवर असलेल्या नांदे (ता. मुळशी) येथील बाळासाहेब रानवडे आकुर्डी येथील औद्योगिक कंपनीमध्ये कार्यरत होते. सन २००२ मध्ये कंपनीने उत्पादननिर्मिती बंद केली. कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ‘ऑफर’ देण्यात आली. रानवडे यांच्यावरही प्रतिकूल परिस्थिती आली. पुढे काय करायचे हा प्रश्‍न उभा राहिला. पण खचून न जाता हिमतीने त्यांनी मार्ग काढण्याचे ठरवले. 

दुग्ध व्यवसायाची निवड 
घरची पाच एकर शेती होती. मका, ज्वारी, गहू आदी पिके घेतली जात होती. स्वेच्छानिवृत्तीचे १० लाख रुपये मिळाले होते. अभ्यास करून दुग्ध व्यवसायात उतरायचे ठरवले. सुरुवातीला वासरे सांभाळून, मोठी करून विक्री करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून चार गायींची विक्रीदेखील केली. मात्र रोज पैसा हाती येत नव्हता. अखेर चुलत भावाचे मार्गदर्शन घेतले. दोन संकरित गायी खरेदी केल्या. पहिल्या टप्प्यात २० लिटर दूध मिळू लागले. विक्री परिसरातच होऊ लागली. गायी सांभाळण्याचा आत्मविश्‍वास आल्यानंतर टप्प्याटप्प्याने संख्या वाढविण्याचे धाडस केले. सध्या १५ गायी आणि दोन वळू असे १७ पर्यंत पशुधन गोठ्यात आहे. 

मुक्तसंचार गोठा व दूध संकलन 
पारंपरिक गोठ्याला २०१० मध्ये स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त गोठा पद्धतीची जोड दिली. रानवडे दांपत्य स्वतः व्यवसायात राबते. केवळ एक कामगार तैनात केला आहे. घरच्या शेतीत मका, ऊस व चारा पिके घेतली जातात. त्यामुळे हिरव्या चाऱ्यावरील खर्च वाचतो. दर सहा महिन्यांनी घटसर्प, फऱ्या लाळ्या खुरकूत यांचे लसीकरण केले जाते. रात्री गायींना बंदिस्त गोठ्यात ठेवले जाते. यांत्रिक पद्धतीने दूध काढण्यात येते. 

दूध संकलन 
दररोज १३० लिटरपर्यंत तर काही कालावधीत १५० लिटरपर्यंत दूध संकलन होते. पैकी सकाळचे सुमारे ६० ते ६५ लिटर दूध परिसरातील महाळुंगे, बालेवाडी, वाकड परिसरांत घरोघरी ५० रुपये प्रति लिटर दराने रतीबाने पुरवले जाते. मुले किरण आणि कुमार देखील यात मदत करतात. संध्याकाळचे उर्वरित दूध ३५ रुपये प्रति लिटर दराने घाऊक विक्रेत्याला दिले जाते. 

मुलांना केले उच्चशिक्षित
मुलांच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यामुळे शिक्षणाच्या खर्चासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे होते. त्यामुळे कंपनीकडून मिळालेल्या रकमेचा विनियोग योग्य प्रकारे करून व्यवसायातील आर्थिक कसरत सांभाळली. दोन मुलगे आणि एका मुलीला अनुक्रमे पदवीधर, डी फार्म आणि एमबीएपर्यंत शिक्षण देणे शक्य झाले. मुलगी हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये नोकरी करते आहे. 

जमीन विकणार नाही
हिंजवडी येथील ‘आयटी पार्क’मुळे परिसरातील जमिनींना प्रचंड दर आले आहेत. नांदे गावातही मोठ्या इमारती होऊ लागल्या आहेत. रानवडे म्हणाले, की आमच्या गावात प्रति गुंठा काही लाखांच्या वर जमिनींचे दर आहेत. मात्र शेती व दुग्ध व्‍यवसायाने आमच्या कुटुंबाची आर्थिक घडी स्थिरस्थावर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत जमीन विक्री करणार नाही.  

बाळासाहेब रानवडे  ९८५०२३४४८५

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com