लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदार

मुकुंद पिंगळे
Friday, 11 September 2020

गावातील दोन टेकड्यांवर समतल चर खोदले. कुठल्याही प्रकारचे सरकारी अनुदान न घेता तसेच गावकऱ्यांकडून निधी संकलित न करता हे परिवर्तन त्यांनी घडविले आहे. 

नाशिक : जिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात वसलेले दुष्काळी गाव. येथे पिकांसाठी सिंचन तर दूरच, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक सोनवणे यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतला अन हे गाव अवघ्या दोन वर्षात पाणीदार करण्यात त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

पाणी हा अशोक सोनवणे यांच्या अभ्यासाचा विषय आहे. येथील गावकऱ्यांनी त्यांना गावातील पडीक दोन टेकड्यांवर जलसंधारणाची कामे करण्याची परवानगी दिली.त्यानंतर स्थानिक तरुणांना सोबत घेऊन त्यांनी मोजमाप करून जलमृद्संधारण तंत्रानुसार कामाची आखणी केली. गावातील दोन टेकड्यांवर समतल चर खोदले. कुठल्याही प्रकारचे सरकारी अनुदान न घेता तसेच गावकऱ्यांकडून निधी संकलित न करता हे परिवर्तन त्यांनी घडविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध समाज घटकांकडून जमलेल्या सुमारे ८० हजार रुपयांतून येथे १५ हजार मीटर समतल चरांच्या निर्मितीचे काम तपशीलवार झाल्याने कमी पावसाच्या प्रदेशात १० कोटी लिटर पेक्षा जास्त पाण्याचे जलसंधारण होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी या परिसरात चांगला पाऊस झाल्याने चर पाण्याने भरले आहे. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचे संधारण करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या कामातून भूगर्भातील पाणी पातळी वाढ करण्यासह मृद्संधारणाच्या प्रयत्नाला यश आले आहे.''जल है, तो कल है'' हा विचार घेऊन लोकसहभाग आणि काटेकोर नियोजन असल्यास समाजहिताच्या दृष्टीने आदर्श काम उभे करता येते हे यातून सिद्ध झाले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याकामी युवामित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे यांनी विनामोबदला खोदकामासाठी यंत्रणा  उपलब्ध करून दिली.यासह अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉ.भाऊसाहेब मोरे,निवृत्त पोलिस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी, उद्योजक विजय पाटील,मुकुंद पाटील आदींच्या माध्यमातून सुमारे ८० हजार रुपये लोकवर्गणी जमा झाली. 

असे आहे कामाचे स्वरूप
  ३० हेक्टर आणि ६८ हेक्टर अशा दोन टेकड्यांवर सलग समतल चर खोदण्याचे काम.
  चरांची लांबी १५ हजार मीटरपेक्षा जास्त.
  चरांची खोली व रुंदी प्रत्येकी ३ फूट .
  खोल स्वरूपाचे सलग समतल चर खोदल्यामुळे या दोन्ही टेकड्यांवर सुमारे १० कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्याचे संधारण.

कमी पैशात एवढे मोठे काम होऊ शकते,ही आनंदाची बाब आहे.तांत्रिक निकष पाळून ही कामे केली.त्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला.ज्या गावांमध्ये अशा टेकड्या आणि पडीक जमीन आहे, त्या ठिकाणी पाण्याची गरज भागवू शकेल असे स्रोत निर्माण करता येईल.
- प्रा.अशोक सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deshwandi Water village nashik district