सुपारीवरील रोगावर ‘जीवामृता’चा यशस्वी उतारा

राजेंद्र बाईत
Friday, 16 November 2018

राजापूर - सुपारीच्या पिकावर काळ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या गळतीद्वारे सुपारीचे उत्पन्न घटले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये थैमान घातलेल्या या रोगाच्या प्रादुर्भावाने कोकणपट्ट्यातील सुपारी बागायतदार हैराण झाले आहेत. मात्र तालुक्‍यातील तेरवण येथील प्रकाश जोग यांनी त्यावर ‘जीवामृता’ची उपाययोजना करून मात केली आहे.

राजापूर - सुपारीच्या पिकावर काळ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या गळतीद्वारे सुपारीचे उत्पन्न घटले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये थैमान घातलेल्या या रोगाच्या प्रादुर्भावाने कोकणपट्ट्यातील सुपारी बागायतदार हैराण झाले आहेत. मात्र तालुक्‍यातील तेरवण येथील प्रकाश जोग यांनी त्यावर ‘जीवामृता’ची उपाययोजना करून मात केली आहे. सुपारी बागेतील झाडांसाठी जीवामृताची मात्रा दिल्याने गेल्या तीन वर्षांमध्ये होणारी सुपारी गळती रोखल्याचा स्वानुभव जोग यांनी ‘सकाळ’ला सांगितला.

गोमूत्र, गोमय आणि सेंद्रिय गूळ पाण्यात मिसळून त्याच्या मिश्रणातून जीवामृत बनवले जाते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीच्या बागा आहेत. राजापूर तालुक्‍याचा विचार करता तालुक्‍यामध्ये भू, पेंडखळे, खिणगिणी, तेरवण, कोतापूर आदी भागामध्ये २०० हेक्‍टर क्षेत्रामध्ये सुपारीच्या बागा आहेत. २००९ मध्ये झालेल्या फयान वादळावेळी सुपारी बागांच्या झालेल्या नुकसानीनंतर सुपारी बागांमध्ये काळ्या बुरशीजन्य रोगाच्या साथीचा फैलाव झाला. त्यातून सुपारीची गळती होऊन शेतकऱ्यांचे निम्मे उत्पन्न घटत आहे. या रोगावर नियंत्रण राखण्यासाठी काही बागायतदारांनी फवारणीही केली. 

मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत. या रोगावर जोग यांनी जीवामृताची मात्रा देवून मात केली आहे. 

जिवामृत कसे तयार करावे?
२०० लिटर पाण्यात १० कीलो देशी गाईचेच शेण (जर्सीचे अजिबात नाही) ५ ते १० लिटर देशी गाईचेच गोमुत्र,१ किलो काळा गूळ ( केमिकल नसलेला) किंवा ४ लिटर ऊसाचा रस किंवा १० किलो ऊसाचे तुकडे किंवा १० की.गोड ज्वारीचे तुकडे 
किंवा १ किलो गोड फळाचा गर आणी १ किलो बेसन व 
१ मूठ बांधावरची जिवानु माती घ्यावी.हे सर्व बॅरेलमध्ये टाकून चांगले ढवळून पोते झाकून ठेवावे. सकाळ - संध्याकाळ १ मिनिट काठीने ढवळावे. सूर्यप्रकाश व पावसाचे पाणी बॅरेलमध्ये पडू देवू नये. ४८ तासानंतर जिवामृत वापराला तयार होते. जास्तीत जास्त ७ दिवसापर्यंत ते वापरता येते. ७ दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते.

जीवामृताच्या मात्रेमुळे तयार होणाऱ्या जीवाणूंच्या सहाय्याने पोफळीच्या झाडाच्या मुळांवर असलेल्या बुरशीचे जीवाणू कमी होते. त्यामुळे गळ थांबून उत्पन्नात वाढ होते. जीवामृताच्या मात्रेने सुपारीची उत्पादनक्षमता, परिणामकारकताही वाढली. तसेच गळती गेल्या तीन वर्षामध्ये सुमारे पाच टक्‍क्‍यावर आली आहे.
- प्रकाश जोग,
सुपारी बागायतदार

जीवामृताची परिणामकारकता 
पोफळीच्या (सुपारीच्या झाडाच्या) बुंध्यामध्ये असलेल्या मुळावर बुरशीचा थर जमा होतो. त्यातून झाडाला होणारा अन्नपुरवठा थांबतो. त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन सुपारीची गळ होते. पोफळीच्या बुंध्याच्या ठिकाणी जीवामृताची मात्रा दिल्याने मुळांवरील बुरशीचा थर कमी होतो आणि त्यातून अन्नपुरवठा वाढून सुपारीची गळ थांबते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disease on areca nut removed by use of Jivamrut