दुष्काळात डाळिंब जगविण्याचे कष्ट आले फळाला...

सुदर्शन सुतार
Friday, 23 November 2018

अवघी दीड एकर शेती. पाण्याची भीषण अवस्था. तीनशे डाळिंबाची झाडे जगवण्याचे मोठे आव्हान. मनात केवळ जिगर ठेऊन चोपडी (जि. सोलापूर) येथील खळगे कुटुंबाचा संघर्ष सुरू आहे. बोअरचे पाणी पाचशे लिटरच्या टाकीत दररोज जमा करून ते पाईपद्वारे झाडांच्या मुळांजवळ द्यायचे. न थकता जोपासलेल्या झाडांपैकी शंभर झाडे फळांवर आली आहेत. शेतीतील ही सकारात्मता व आशावादच खळगे यांच्या वाटचालीला बळ देऊन गेला आहे.  

अवघी दीड एकर शेती. पाण्याची भीषण अवस्था. तीनशे डाळिंबाची झाडे जगवण्याचे मोठे आव्हान. मनात केवळ जिगर ठेऊन चोपडी (जि. सोलापूर) येथील खळगे कुटुंबाचा संघर्ष सुरू आहे. बोअरचे पाणी पाचशे लिटरच्या टाकीत दररोज जमा करून ते पाईपद्वारे झाडांच्या मुळांजवळ द्यायचे. न थकता जोपासलेल्या झाडांपैकी शंभर झाडे फळांवर आली आहेत. शेतीतील ही सकारात्मता व आशावादच खळगे यांच्या वाटचालीला बळ देऊन गेला आहे.  

सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील नाझरेनजीक चोपडी येथे दशरथ खळगे यांची शेती आहे. सांगोला हा कायम दुष्काळी तालुका. पाण्यासाठी कायमची वणवण इथल्या भूमिपुत्रांच्या पाठी लागलेली. डाळिंब हेच या भागातील प्रमुख पीक आहे. यंदाही पावसाची अवकृपाच झालेली. पाणी नावालादेखील नाही अशी परिस्थिती. पण परिस्थितीवर मात करण्याची जिगर इथल्या शेतकऱ्यात ठासून भरलेली आहे. निसर्गाने कितीही परीक्षा घेतल्या तरी तो पुरून उरतोच हा इतिहास इथल्या डाळिंब उत्पादकाने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिला आहे. डाळिंबाची बाग आणि शेततळ्याने इथल्या शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे. 

खळगे यांची प्रयत्नवादी शेती 
सांगोला तालुक्यातील चोपडी येथील दशरथ खळगे यांची जेमतेम दीड एकर शेती. पण त्यातूनही या हिंमतवान शेतकऱ्याने सोनं उगवण्याचं स्वप्न पाहिलं. पाच-सहा वर्षांपूर्वी अर्धा एकर क्षेत्रावर डाळिंब लावलं. आज त्यांची तीनशे भगवा जातीची झाडे आहेत. आत्तापर्यंत या क्षेत्रातून फार मोठे उत्पन्न मिळाले असे नाही. पण अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न त्यांनी सोडलेले नाहीत. 

मोलमजुरीसह शेती 
यंदा पाऊस बरसलाच नाही. उगाच नावाला झाला. पाण्याने वाईट वेळ आणल्यानंतर उदरनिर्वाहाचे वांधे निर्माण झाले. तीनशे एकर झाडांचे संगोपन अशा स्थितीत करणे सोपी गोष्ट नव्हती. साहजिकच उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून दुसऱ्यांच्या शेतात मुलगा संजय व वडील दशरथराव अशा दोघांनाही दररोज मोलमजुरी करावी लागते. ते काम सांभाळून शेती पाहावी लाहते. दशरथराव शेतीतील पट्टीचे मजूर मानले जातात. खोदकाम किंवा अन्य कामे करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही असे गावकरी सांगतात. कामाला अन व्यवहाराला चोख अशी त्यांची ख्याती आहे. या व्यतिरिक्त डाळिंबाचे पॅकिंग, काढणी आदी कामांनाही पितापुत्रांना जावे लागते. एवढे कष्ट करून शेतीचीही जबाबदारी खांद्यावर असतेच. शिवाय आईदेखील कधी मधी म्हणजे वेळ पडेल तेव्हा मोलमजुरी करते. अवघ्या दीड एकरांसाठी सारं कुटूंब रात्रंदिवस राबराब राबतेय.  

डाळिंब बाग संगोपनाचे प्रयत्न    
पाच-सहा वर्षांपूर्वींची व दोन वर्षांपूर्वीची अशी झाडे आहेत. यंदा जुन्या बागेचा जुलैमध्ये बहर धरला. शेणखत, रासायनिक खते, विद्राव्य खते यांचा योग्य वापरही केला. पाणी मर्यादीत असल्याने खर्चही आटोक्यात ठेवला. यंदा पावसाने पाठ फिरवल्यानंतर पाण्याची सोय करण्यासाठी एकाच महिन्यात पंधरवड्याच्या अंतराने दोन बोअर घेतल्या. पहिल्या बोअरसाठी खोदणीकाम, मोटर असा मिळून खर्च ८० हजार रुपयांपेक्षा कमी आला नाही. दुसऱ्या बोअरच्या वेळी केवळ मोटरचा खर्च वाचला. दुष्काळात पैशांची जुळवाजुळव ही साधी बाब नव्हती. काही रक्कम पाहुण्यांकडून उसनवारीने घेतली. तर गावातीलच एका कंपनीकडून ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज काढले.   
प्रत्येक झाडाला मोजून मापून पाणी 
निसर्ग कोणत्या ना कोणत्या संकटांना घेऊन प्रत्येकवेळी दारी येतोच, पण तेवढ्याच ताकदीनं त्याला तोंड देण्याची क्षमताही ही संकटे वाढवतात. दोन बोअर घेऊन लाखभर रुपये खर्ची घालूनही अवघ्या ५०० लिटरपेक्षाही अधिक पाणी दिवसाला मिळेना. मग ५०० लिटरच्या प्लॅस्टिक टाकीची व्यवस्था केली. दररोज दोन ते तीन बोअर सुरू करून त्याचे पाणी टाकीत दररोज भरले जाते. या टाकीला बागेतील पाईपचे कनेक्शन दिले आहे. त्याद्वारे झाडाच्या ड्रीपररजवळील आळ्यात पाणी दिले जाते.त्यातून झाडे हिरवी, ताजी तवानी ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

शंभर झाडे ठेवली उत्पादनक्षम
सध्या फळावर आलेली शंभर झाडे आहेत. त्यांचे संगोपन अधिक कटाक्षाने केले जात आहे. उर्वरित दोनशे झाडे मात्र केवळ जगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्ध्या एकरांसाठी सर्व मिळून उत्पादन किमान दीड लाखाचा झाला आहे. आलेल्या फळांचा अंदाज घेता सुमारे दीड टनांपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. अर्थात काढणीला महिनाभर अवकाश आहे. सध्या किलोला ४८ ते ५० रुपये दर सुरू असल्याचे खळगे म्हणाले. पण पुढे दर कसा राहिल यावर सगळे गणित अवलंबून आहे. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ कसा बसेल याबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. पण खर्च वसूल झाला तरी तो दिलासाच असेल, अशी दशरथरावांची मानसिकता आहे. 

त्यांनी शेजारधर्म पाळला
आपली शेती अल्प असली तरी चिकाटीने ती जगवण्याची दशरथरावांची धडपड उल्लेखनीय अशीच आहे. आज त्यांचे वय पासष्टीच्या घरी आहे. त्यांच्या या जिद्दीला, धडपडीला दाद म्हणून त्यांचे शेजारी शेतकरी आणि उद्योजक सतीश पाटील पुढे सरसावले. त्यांनी आपल्या शेतातील वापराविना असलेल्या बोअरचे पाणी दशरथरावांना वापरण्यास दिले आहे. त्याद्वारेही ५०० ते १००० लिटर पाण्याचा अतिरिक्त आधार झाला आहे. पाटील यांनी संकटाच्या काळात पाळलेला हा शेजारधर्म आदर्शच म्हणवा लागेल. आजच्या युगात माणुसकीचा झरा अद्याप आटला नसल्याचेच त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. 
 - संजय खळगे - ७५८८८८०१७१


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Pomegranate Agriculture Sanjay Khalage