esakal | दरवर्षीप्रमाणे यंदाही करणार अभ्यासपूर्ण सोयाबीन शेती
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अनिल बुलबुले यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक

माझी बोरी (ता. जिंतूर, जि.परभणी) येथे १२ एकर मध्यम ते भारी जमीन आहे. मी १९९७ पासून बियाणे क्षेत्रातील कंपनीसाठी खरीपात सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा बिजोत्पादन घेत असतो. बिजोत्पादनामुळे बाजारभावाच्या तुलनेत अधिक दर मिळून फायदा होतो. यंदा मूलस्थानी जलसंधारण, पाणी अतिरिक्त झाल्यास त्याचा निचरा, उत्पादन वाढ या बाबी विचारात घेऊन यंदा रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पध्दतीने सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही करणार अभ्यासपूर्ण सोयाबीन शेती

sakal_logo
By
माणिक रासवे

पीक - सोयाबीन
शेतकरी - डॉ.अनिल बुलबुले
  बोरी, ता.जिंतूर, जि.परभणी

माझी बोरी (ता. जिंतूर, जि.परभणी) येथे १२ एकर मध्यम ते भारी जमीन आहे. मी १९९७ पासून बियाणे क्षेत्रातील कंपनीसाठी खरीपात सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा बिजोत्पादन घेत असतो. बिजोत्पादनामुळे बाजारभावाच्या तुलनेत अधिक दर मिळून फायदा होतो. यंदा मूलस्थानी जलसंधारण, पाणी अतिरिक्त झाल्यास त्याचा निचरा, उत्पादन वाढ या बाबी विचारात घेऊन यंदा रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पध्दतीने सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे. आजवर हंगामी पिकांवरच भर देत आलो आहे. परंतु शाश्वत उत्पन्नासाठी काही क्षेत्र फळपिकाखाली असणे आवश्यक आहे असा अभ्यास केला. मग कमी पाण्याची गरज असलेल्या सीताफळाचा पर्याय स्विकारला. सोयाबीन पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसोबत सहा एकरांवर सिताफळ लागवडीची तयारी सुरु केली आहे. 
सोयाबीन व्यवस्थापनातील ठळक बाबी

दरवर्षी माझ्याकडे १२ एकरांवर सोयाबीनची पेरणी असते. बैलचलित टोकण यंत्राव्दारे पेरणी करतो. दोन ओळीतील अंतर १८ इंच असते. या पध्दतीने एकरी ३० किलो बियाणे लागते.

यंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या व सुमारे १०० दिवसांत परिपक्व होणाऱ्या सोयाबीनच्या एमएयूएस ६१२ या वाणाची पेरणी करणार आहे.

पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपत आली आहेत. नांगरणी, रोटाव्हेटर करुन जमीन पेरणीसाठी तयार आहे. 

घरच्या जनावरांनापासून मिळणाऱ्या शेणापासून दरवर्षी अर्धा ते एकर एकर क्षेत्र खतवून निघते. यंदा शेणखत विकत घेऊन सहा एकरांसाठी वापरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची तसेच पीएसबी, रायझोबियम तसेच पोटॅश विद्राव्य जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करुन पेरणी करणार आहे. या घटकांची बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकास अन्नद्रव्यांची उपलब्धता सहज स्वरुपात होते. परिणामी उत्पादनात २० टक्क्यांपर्यत वाढ झाल्याचा अनुभव आहे. 

पेरणी योग्य (किमान १०० मिमी) पाऊस झाल्यानंतर पेरणी करणार आहे. यंदा बीबीएफ पेरणी यंत्र वेळेवर उपलब्ध झाले तर त्याव्दारे अन्यथा बैलचलित यंत्राव्दारे पेरणी करणार आहे.

खत व्यवस्थापन 
पेरणीच्या वेळी १२-३२- १६ हे प्रमाण असलेले खत प्रति एकरी १०० किलो त्यासोबत बेन्टोनाईट सल्फर १० किलो प्रतिएकरी देणार आहे. तर दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरी पाच किलो या प्रमाणात देणार आहे. सोयाबीन हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे गंधकाची मात्रा देणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होते. पेरणीपासून १५ ते ४० दिवसांच्या दरम्यान झिंक, फेरस, काॅपर, मोलीब्डेनम, बोरॉन, मॅगेनीज या चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी नेहमी करतो, तसेच कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक न मिसळता सकाळी दहा वाजेपर्यत तसेच दुपारी चारनंतर फवारणी करीत असतो. 

कीड- रोग नियंत्रण 
पेरणीनंंतर २० व्या दिवशी पाने कुरतडणारी अळी, चक्री भुंगा, खोड माशी या किडींच्या नियंत्रणासाठी अधिक काळ कीड नियंत्रणात ठेवणाऱ्या शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करणार आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्यास किंवा प्रतिबंधक म्हणून ४० व्या दिवशी शिफारशीत किटकनाशकांची फवारणी करतो. तर ६० व्या दिवशी शेंगा पोखणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपायांची आखणी करीत असतो. चार- पाच वर्षात शेंगांवरील करपा रोगाचा प्राद्रुर्भाव होत असल्याचे आढळून येत आहे.

त्यासाठी ७० ते ७५ व्या दिवशी पुन्हा एकदा शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करतो. दरवर्षी एकरी १० ते १२ क्लिंटल उत्पादन मिळते. यंदा हवामान व पाऊस अनुकूल राहिल्यास १३ ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादनाचे उद्दीष्ट सफल होईल असे वाटते.

सीताफळ लागवड 
यंदा सहा एकरांवर सीताफळाच्या एनएमके -१ या वाणाची लागवड करणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोयाबीनच्या पेरणीनंतर जून-जुलै मध्ये सीताफळाची लागवड करणार आहे. 

- डॉ.अनिल बुलबुले, ९४२१३८८४१६