'बीबीएफ' तंत्राद्वारे हंगामी पिकांची प्रयोगशील शेती

गोपाल हागे
Thursday, 2 July 2020

बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अतिदुर्गम भागात भोसा हे ७० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले गाव आहे. येथील प्रयोगशील शेतकरी केशवराव खुरद अनेक वर्षांपासून सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी विविध पिकांची आंतरपीक पद्धती व बीबीएफ तंत्राचा वापर करून यशस्वी बीजोत्पादन घेत आहेत. त्यातून बियाणे तसेच उत्पादन खर्चात बचत करून त्यांनी अर्थकारणही सुधारले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अतिदुर्गम भागात भोसा हे ७० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले गाव आहे. येथील प्रयोगशील शेतकरी केशवराव खुरद अनेक वर्षांपासून सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी विविध पिकांची आंतरपीक पद्धती व बीबीएफ तंत्राचा वापर करून यशस्वी बीजोत्पादन घेत आहेत. त्यातून बियाणे तसेच उत्पादन खर्चात बचत करून त्यांनी अर्थकारणही सुधारले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुलडाणा जिल्ह्यात भोसा (ता. मेहकर) हे दुर्गम आदिवासी बहुल गाव आहे. येथील केशवराव खुरद यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख मिळवली आहे. तीन भावांची मिळून त्यांची १२० शेती आहे. बालरोग तज्ज्ञ असलेले बंधू डॉ. सुभाष हे मेहकर येथे राहतात. प्रभाकर हे देखील मेडिकल व्यवसायाच्या निमित्ताने तेथे राहतात. केशवराव मात्र पूर्णवेळ शेती करतात. 

समस्यांवर उपाय 
गावातील जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची असून एक ते दोन फुटांवर खडक, मुरूम लागतो. पाऊस जास्त झाल्यास पिके पिवळी होतात तर खंड पडल्यास पिके सुकायला लागतात. परिणामी उत्पादनात कुठल्याही कारणाने घट येते. केशवराव यांना नवे तंत्रज्ञान वापरण्याचा ध्यास आहे. त्यामुळे अशा समस्यांवर उपाय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सन २०१२ मध्ये तत्कालीन कृषी सहायक विठ्ठल धांडे यांनी त्यांना रुंद वरंबा सरी यंत्र अर्थात बीबीएफ तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्यांच्यामार्फत यंत्राची उपलब्धताही झाली.

पहिल्या वर्षी पाच एकरांत सोयाबीनची पेरणी केली. यावेळी जास्त पाऊस झाल्याचा जसा अनुभव आला. तसा पावसाचा खंडही अनुभवला. अशावेळी पीक चांगले तग धरून राहण्यासाठी मोठी मदत झाली. फवारणी करणेही सोयीस्कर झाले. सोयाबीनचे उत्पादन दरवर्षीपेक्षा अडीच पोते अधिक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर केशवरावांनी बीबीएफ तंत्राचा जो वापर सुरू केला त्यात आजगायत सातत्य ठेवले आहे. मुख्य व आंतरपीक पद्धती व बीजोत्पादन हे त्यांच्या शेतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य़ आहे.

अडचणींवर केली मात 
बीबीएफ यंत्राद्वारे आंतरपीक म्हणून तूर घेताना आलेल्या अडचणी केशवरावांनी धांडे यांच्या मार्गदर्शनातून दूर केल्या. आंतरपिकात विविध प्रयोग सुरू केले. बीबीएफ यंत्राला चारच फण असल्याने तुरीसारखे आंतरपीक घेणे अवघड गेले. परंतु पुढील वर्षी (२०१३) चार ओळी सोयाबीनच्या बीबीएफ तंत्राद्वारे घेतल्या. त्यानंतर बैलचलीत यंत्राद्वारे दोन ओळी तुरीच्या घेतल्या. दोन्ही बाजूस सरी निघाली. सन २०१४ मध्ये यात आणखी बदल केला. मधल्या वरंब्यावर मजुरांच्या साह्याने प्रत्येकी सहा इंचावर तूर दोन ते तीन दाणे टोकण पद्धत असा वापर सुरू केला. 

बियाणे वापर व बचत 
केशवराव सांगतात की बीबीएफ पद्धतीत एकरी बियाणे वापरात  बचत होते. उदाहरण द्यायचे तर पारंपरिक पद्धतीत सोयाबीनचे एकरी ३० ते ३५ किलो बियाणे लागते. सोयाबीन अधिक तूर पद्धतीत हेच बियाणे १७ किलोपर्यंत तर तुरीचे दोन ते तीन किलोपर्यंत लागते. 

यांत्रिक सुधारणा 
केशवराव यांनी यांत्रिक पद्धतीने शेती करताना बीबीएफ पेरणी तंत्रात आवश्‍यक बदल केले आहेत. पारंपरिक पद्धतीने पेरणीस लागणारा वेळ, मजुरीची समस्या व वाढलेली मजुरी यावर त्यांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. प्रचलित पेरणी यंत्राच्या सात फणांच्या ऐवजी पाच फणांची रचना केली. मधोमध एक फण व दोन्ही बाजूचे दोन फण अशा पद्धतीने पेरणी यंत्राची रचना केली. मधला फण तूर पेरणीसाठी ठेवून दोन्ही बाजूंच्या फणाने सोयाबीन किंवा उडीद पेरणी करता आली. यामुळे ४- १ हे प्रमाण (सोयाबीन अधिक तूर) ठेवता आले. हे प्रमाण बीबीएफ प्रमाणेच होते. पीक १५ ते २० दिवसांचे झाल्यावर डवऱ्याला दोरी बांधून सरी काढल्या जाते.

पीक उत्पादकता
बहुतांशी हंगामी पिकांचे केशवराव खाजगी कंपनीसाठी बीजोत्पादन घेतात. यामध्ये प्रत्येक पिकाची उत्पादकता टिकवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. अलीकडील काळातील प्रातिनिधिक उत्पादन.

यंदाचे नियोजन -
या हंगामात बीबीएफ तंत्राने सोयाबीन अधिक तूर असे चार एकरांत तर उडीद अधिक तूर असे दहा एकरात लागवडीचे नियोजन झाले. यंदा पट्टा पद्धतीने सोयाबीन अधिक तूर ३० एकर आणि उडीद अधिक तूर १० एकरात लागवड झाली आहे.

बीबीएफचे झालेले फायदे

  • बियाण्यात सरासरी ३० ते ४० टक्के बचत होते. 
  • पाऊस कमी झाल्यास झाडांची संख्या कमी असल्याने पाण्यासाठी स्पर्धा कमी होऊन पीक पाण्याचा ताण जास्त दिवस सहन करते.
  • पाऊस जास्त झाल्यास सरीद्वारे अतिरिक्त पाणी निघून जाते. निचरा चांगला होऊन वाफसा लवकर येण्यास मदत होते. 
  • पीक गादीवाफ्यावर असल्याने मुळांना व पिकाला खेळती हवा मिळते. फांद्या, फुले व शेंगा भरपूर लागतात. आंतरपीक तुरीला दोन्ही बाजूंनी सरी असल्याने जास्त पावसात चिबड होत नाही व मर रोग लागत नाही. अंतर रुंद असल्याने फवारणी व संरक्षित ओलीत करणे सोयीचे जाते.
  • किडीचे प्रमाण कमी राहिल्यामुळे फवारणीत बचत होते. 
  • उत्पादन खर्चात बचत होते व उत्पादनात वाढ होते.

बीबीएफ यंत्राची उपलब्धता व अनुदान
शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता काही कंपन्यांनी चार फणी, सहा फणी, सात फणी व नऊ फणी बीबीएफ व टोकण यंत्र बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. त्यांच्या किंमत ४८ हजार रुपयांपासून ते ६५ हजारांपर्यंत आहेत. या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी २०१७-१८ पर्यंत वैयक्तिक व गटासाठी ९० टक्के अनुदान दिले जात होते. उदाहरणार्थ चार फणी बीबीएफची किंमत ४८ हजार तर अनुदान ४३ हजार ४०० रुपयांपर्यंत मिळत होते. बीबीएफ यंत्रासाठी विविध योजनांचे पाठबळ देण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीत धान्य योजना, विदर्भ सधन सिंचन आणि २०१७-१८ पासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ४० ते ५० टक्के अनुदान दिले जात आहे. यासाठी कोणत्याही लक्षांकाची अट न ठेवता प्राधान्य देण्यात आले आहे. यंदाच्या वर्षात कोरोनामुळे विविध योजनांचे अनुदान उपलब्ध नाही. अशीच स्थिती बीबीएफबाबत निर्माण झालेली आहे.

बुलडाण्यात राबविला होता प्रयोग 
सन २०१२-१३ मध्ये तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी प्रत्येक कृषी सहायक विभागात एक बीबीएफ यंत्र याप्रमाणे नियोजन केले होते. त्यानुसार या तंत्राचा प्रसार करण्यात आला. त्यातून या तंत्राबाबतचे महत्त्व शेतकऱ्यांना पटले. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बीबीएफ व पट्टा पद्धतीने पेरणी करण्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी विभागाने तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीस उपविभागीय कृषी अधिकारी नारायण देशमुख, तालुका कृषी अधिकारी सत्येंद्र चिंतलवाड, कृषी सहायक विठ्ठल धांडे (विश्‍वी) यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी सभा व प्रात्यक्षिकाद्वारे प्रसिद्धी केली. यामुळे यंदा बीबीएफ व पट्टा पद्धतीने पेरणीखालील क्षेत्र २५० हेक्टरपेक्षा अधिक झाले आहे.

आमच्या भागातील एका शेतकरी दरवर्षी हरभऱ्याचे एकरी १० क्विंटल उत्पादन घ्यायचे. त्यांना मी बीबीएफ पद्धतीने हरभरा लावण्याचे महत्त्व समजावून दिले. एवढेच नव्हे तर उत्पादनवाढ मिळवून देण्याचे आवाहन स्वीकारून स्वतः त्यांची लावणही करून दिली. या तंत्राद्वारे व्यवस्थापन करून त्यांना एकरी १४ क्विंटल हरभरा उत्पादन मिळवून दिले. 
- केशवराव खुरद

कृषी विद्यापीठाने सांगितले तंत्राचे महत्त्व  
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ बीबीएफ यंत्राच्या चाचण्या घेत आहे. चार दात्यांचे यंत्र पेरणीच्या दृष्टीने अतिशय चांगले व योग्य आहे. या यंत्रामुळे पेरणीस वेळ लागतो, क्षेत्र कमी होते अशा स्वरूपाच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येतात. मात्र गादीवाफ्याचा योग्य परिणाम साधावयाचा असेल व जमिनीत पाणी जिरवायचे असेल तर हे तंत्र योग्य आहे. शिवाय अधिकचे पाणी सरीद्वारे निघूनही जाते. जर फण्या वाढवून तासांची संख्या वाढवली तर मध्यभागी असलेल्या तासांना पुरेसा ओलावा मिळणार नाही. अशा प्रकाराची शक्यता आहे. सोबतच या यंत्राचा शेवटचा फाड हा ट्रॅक्टरच्या चाकामागेच चालला पाहिजे. त्याचे अनेक फायदे होतात. विद्यापीठाने बीबीएफ यंत्राचा प्रसार विविध माध्यमांतून सुरू केला आहे. यंदा या तंत्राच्या साह्याने अकोला जिल्ह्यातील उगवा गावात साडेतीन एकरात कापूस पेरला आहे.

- शैलेश ठाकरे, ९७६३७०५१००, विभाग प्रमुख, कृषीशक्ती अवजारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experimental cultivation of seasonal crops using BBF technique