शेततळे उद्दिष्टपूर्तीत मराठवाडा पिछाडीवर

Farm-lake
Farm-lake

औरंगाबाद : दुष्काळात शेतकऱ्यांना फळबागा आणि पिकांसाठी शेततळे उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने शेततळ्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. परंतु शेततळ्यांच्या उद्दिष्टपूर्तीत मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड हे जिल्हे नोव्हेंबरअखेर पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी प्रतिक्षेतील शेतकरी, विशेषत: फळबागाधारक अडचणीत आले आहेत.

सातत्याने अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात ४६ हजार १०० शेततळेनिर्मितीचा लक्ष्यांक देण्यात आला होता. प्राप्त लक्ष्यांकच्या अुनषंगाने तब्बल १ लाख ८ हजार ५१५ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जातून ८५ हजार ४४५ अर्जांना मंजुरी देण्यात आली होती. मंजुरी दिलेल्या अर्जांपैकी ७६ हजार ३०८ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. कार्यारंभ आदेश दिलेल्या शेततळ्यांपैकी ६८ हजार ८६५ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली होती. त्यापैकी ३५ हजार १८३ शेततळ्यांची कामे २२ नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण झाली तर ८२८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. 

प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी ९१०० शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला. त्या तुलनेत १० हजार ३४ शेततळ्यांची निर्मिती करताना ११० टक्‍के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली. जालना जिल्ह्यात ६ हजार शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला. त्या तुलनेत ७ हजार ९७ शेततळ्यांची निर्मीती करण्यात आली. यातून ११८ टक्‍के उद्दिष्टपूर्ती झाली. हिंगोली जिल्ह्याला २५०० शेततळ्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असताना त्यापुढे जाऊन कामगिरी करत २६३२ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात या जिल्ह्याने यश मिळविले आहे. 

बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांत मात्र शेततळेनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात कृषी विभागाला यश आले नसल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात १३ हजार शेततळ्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ ७ हजार १३१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. यातून ५५ टक्‍केच उद्दिष्ट पूर्ण करणे कृषी विभागाला शक्‍य झाले आहे. लातूर जिल्ह्यात ४८०० शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट असताना केवळ १८९८ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे केवळ ४० टक्‍केच उद्दिष्ट पूर्ण करणे शक्‍य झाले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ३७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत केवळ ६३ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण होत जिल्ह्यात २३३१ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्ह्याला ४ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. नांदेडमध्येही केवळ ४८ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले. या जिल्ह्यात १९१५ शेततळीच होऊ शकली आहेत. परभणी जिल्ह्याला ३ हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ७२ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले असून २१४५ शेततळ्यांची निर्मिती करणे शक्‍य झाले आहे.

मुदखेड तालुक्यात १२० पैकी फक्त दोन शेततळ्यांची निर्मिती
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्‍यात १२० शेततळेनिर्मितीचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत केवळ २ शेततळ्यांची निर्मीती करणे शक्‍य झाले आहे. दुसरीकडे अर्धापूर तालुक्‍यात १०, मुखेडमध्ये १८, नायगावमध्ये १४ , बिलोलीमध्ये १६ टक्‍के शेततळेनिर्मिती उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्‍यात २६, लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्‍यात १७, देवणी तालुक्‍यात १४ तर अहमदपूर तालुक्‍यात केवळ २० टक्‍के शेततळेनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करणे कृषी विभागाला शक्‍य झाले आहे.

१५ तालुक्‍यांमध्येच उद्दिष्टपूर्ती
मराठवाड्यातील ७६ पैकी केवळ १५ तालुक्‍यांमध्येच २२ नोव्हेंबरपर्यंत शेततळेनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करणे शक्‍य झाले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, वैजापूर, खुल्ताबाद, सिल्लोड, जालना जिल्ह्यांतील बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नांदेड जिल्ह्यांतील भोकर, परभणीमधील जिंतूर व मानवत तर हिंगोलीतील कळमनुरी व सेनगाव या तालुक्‍यांतच उद्दिष्टपूर्ती अथवा त्यापेक्षाही अधिक शेततळेनिर्मिती करणे शक्‍य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com