शेतकरीपुत्राच्या आयुष्यात स्वरांची गुंफण

प्रशांत बैरागी
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

नामपूर, जि. नाशिक - शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचली असली तरी शिक्षण व रोजगार यांच्यात मोठी दरी असल्याने बेरोजगारीची समस्या वाढली आहे. रोजगार व नोकरीसाठी होणारी वणवण जीवनात अनेक आवाहन उभे करते. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बुलबुल बँजो निर्मितीच्या छंदातून स्वप्न साकारण्याची किमया मोराणे (ता. बागलाण) येथील हरहुन्नरी संगीतप्रेमी तरुण सचिन मोकासरे याने साधली आहे. पूर्णता ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असलेल्या तरुणाने काळाच्या पडद्याआड जाणाऱ्या बुलबुल वाद्याला संजीवनी देऊन संगीतवाद्यांच्या देशाच्या बाजारपेठेत आपला ठसा उमटविला आहे.

 नामपूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मोराणे गावाची लोकसंख्या हजार बाराशेच्या घरात आहे. येथील मोकासरे परिवाराचा शेती हा पारंपरिक व्यवसाय. सचिनचे आजोबा पुंडलिक देशमुख यांना संगीताची आवड होती. त्यांच्याकडे हाताने वाजविता येणारा बुलबुल होता. त्यामुळे सचिनलाही बुलबुल वाद्य वाजविण्याची आवड निर्माण झाली. गेल्या काही वर्षांपूर्वी सचिन आपल्या मित्रांसोबत कोकणात फिरायला गेला होता. त्या वेळी गुहागर (चिपळूण) येथे त्याला बुलबुल विक्री व दुरुस्ती करणारे दुकान दिसले. येथूनच त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. ते दुकान राज्यातील नामवंत बुलबुलवादक सुदेश जाधव यांच्या मालकीचे होते. त्यानंतर सचिनने तेथेच सुमारे चार वर्षे बुलबुल वाजविण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन बुलबुलतरंग निर्मितीचे कौशल्य हस्तगत केले. त्यानंतर धुळे येथेही सुमारे दोन वर्षे काम केल्यानंतर सचिनने आपल्या मूळगावी मोराणे येथील आपल्या शेतात दहा बाय दहाच्या छोटेखानी शेडमध्ये बुलबुल बँजो निर्मितीचा लघुउद्योग उभारून ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिद्द मेहनत चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावर कोणताही वारसा नसताना एका खेड्यातील शेतकऱ्याच्या लेकाने आकाश व्यापून टाकले आहे.

...अशी होते बुलबुलची निर्मिती
बुलबुल निर्मितीसाठी लागणारा सर्व कच्चा माल स्थानिक बाजारपेठेत मिळत असला, तरी स्वरसाचा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री राजस्थान, हरियाना येथून आणावी लागते. देवदारच्या लाकडापासून बुलबुल तयार करतात. विविध प्रकारच्या सूरनिर्मिती करणाऱ्या तारा, गिटारच्या चाव्या, ॲक्रेलिक साहित्य, बुटांसाठी वापरण्यात येणारे प्लेट, बस कंडक्टरच्या तिकिटास लागणारे स्क्रू, ॲल्युमिनियम स्लाइडिंग मटेरिअल यांचा वापर करून बुलबुल तयार केला जातो. महिन्याकाठी सचिन वीस वाद्ये तयार करतो. त्याने आपल्या बुलबुल बँजोला साज सरोज असे नाव दिले असून, सुरांच्या गुणवत्तेमुळे उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, अहमदाबाद, बिहार आदी देशी बाजारपेठांसह इस्राईल, अॉस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण अफ्रिका येथेही बुलबुलला मागणी वाढली आहे. 

श्री. मोकासरे संपर्क : ७७०९६८३१८४ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer son sachin mokasare story