कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्याचा आगळा प्रयोग

संतोष मुंढे
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - गुलाबी बोंड अळी असो की रसशोषक किडी असोत, त्यांच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांकडून उपाय सुचविले जात आहेत. शिवाय शेतकरीही आपलं डोकं लावून यापैकी काही किडींवर कल्पकतेतून नियंत्रण मिळविण्यासाठी काही करता येऊ शकतं का याचा शोध घेत आहेत.

औरंगाबाद - गुलाबी बोंड अळी असो की रसशोषक किडी असोत, त्यांच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांकडून उपाय सुचविले जात आहेत. शिवाय शेतकरीही आपलं डोकं लावून यापैकी काही किडींवर कल्पकतेतून नियंत्रण मिळविण्यासाठी काही करता येऊ शकतं का याचा शोध घेत आहेत.

खुलताबाद तालुक्‍यातील घोडेगाव येथील सांडू पाटील जाधव त्यापैकीच एक. रासायनिक शेतीला कायमचा फाटा दिलेल्या पाटलांनी कल्पकतेतून मावा, पांढरी माशी आदी रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एक  आगळा प्रयोग म्हणून बैलाच्या साहाय्याने प्रयोगाची शक्‍कल लढविली.  सांडू पाटील जाधव यांच्याकडे ९ एकर शेती. जवळपास दहा वर्षांपासून त्यांनी पूर्णत: सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. यंदा नेहमीप्रमाणे आले (अद्रक), कपाशी, आंतरपीक मूग, उडीद, तूर आदी पिकं सांडू पाटलांनी घेतली आहेत. चार एकरावर त्यांची कपाशी आहे. जूनच्या पहिल्या व शेवटच्या आठवड्यात चार बाय चार अंतरावर लागवड केलेल्या कपाशीत मुगाचे आंतरपीक घेतले आहे. कोणतीही रासायनिक कीटकनाशके वापरायचीच नाहीत याची खूणगाठ मनी बांधलेल्या सांडू पाटलांना इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच रसशोषक किडी, गुलाबी बोंड अळी आदी किडींनी संकटात आणले. यावर उपाय योजताना त्यांनी किडींच्या प्रकारानुसार कामगंध सापळे, चिकट सापळ्यांचा वापर करून किडींवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आत्माचे प्रदीप पाठक यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पांढरी माशी, मावा यांच्या नियंत्रणासाठी एक शक्कल सुचली.

बैलाच्या पाठीवर झूल टाकून त्या झुलीला वरच्या बाजूने ग्रीस, तेल किंवा चिकट पदार्थ लावले. ते बैल औताला जुंपून कपाशीत आंतरमशागत करण्याचा सल्ला मिळाला. हा प्रयोग प्रत्यक्षात आणला. त्यातून मावा, तुडतुडे व पतंगरूपी किडींवर नियंत्रण मिळत असल्याचे निदर्शनास आले.

असा केला प्रयोग...
खताच्या गोण्यांपासून बैलाच्या पाठीवर मापाच्या झुल्या शिवल्या.
त्या झुल्यांवर वरच्या बाजूने ग्रीस व तेल लावले.
औताच्या दांडीलाही ग्रीस व तेल लावले.
औतावर हाकण्यासाठी असलेले गणेश जाधव यांनी घातलेल्या रेनकोटलाही बाहेरच्या बाजूने ग्रीस व तेल लावले.
सर्व तयारीनीशी कपाशीच्या पिकात आंतरमशागत केली असता दोन फेऱ्यातच मावा, पांढरी माशी आदी किडी त्याला चिकटलेल्या आढळल्या.

सेंद्रिय शेती करीत असल्याने रासायनिक पदार्थांचा वापर करण्याचे मन होत नाही. बैलाच्या पाठीवरील झुल्यांना ग्रीस, तेल लावून केलेल्या प्रयोगामुळे रसशोषक किडींवर नियंत्रण मिळविण्यासह मन मानत नसलेल्या विषयालाही पर्याय मिळाला.
- सांडू पाटील जाधव, प्रयोगशील शेतकरी,  घोडेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद

सांडू पाटील सेंद्रिय शेती करणारे व प्रयोगशील. त्यांनी सुचविलेल्या प्रयोगाला हो भरली आणि कीड नियंत्रणासाठीच्या सहज करता येऊ शकणाऱ्या प्रयोगाचे परिणाम दिसून आले.
- प्रदीप पाठक, आत्मा,  खुलताबाद, जि. औरंगाबाद

अशा प्रयोगामुळे रसशोषण करणाऱ्या किडींचे विशेषतः मावा, पांढरी माशी यांचे नियंत्रण शक्य आहे. या प्रयोगातून कोणती हानी नाही. हा प्रयोग केल्यानंतर सायंकाळच्या वेळी पिकात निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
- डाॅ. पी. आर. झंवर, प्रमुख,  कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer unique experiment To control pests