उच्चशिक्षित घुले कुटुंबीयांनी खपली गहू उत्पादनाची परंपरा नेली पुढे

अमोल कुटे
मंगळवार, 29 जानेवारी 2019

पुणे जिल्ह्याच्या परिसरात मांजरी (बु.) भागामध्ये शहरीकरण वाढत असताना केवळ शेतीच नव्हे, तर पारंपरिक देशी गहू वाण नैसर्गिक पद्धतीने जपणाऱ्या घुले कुटुंबीयांतील कसदार धान्य उत्पादनाची धुरा पुढील उच्चशिक्षित पिढीने उचलली आहे. वंदन घुले हे तीन वर्षांपासून २२ गुंठे क्षेत्रातून सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट तंत्राने दर्जेदार गहू उत्पादन घेत आहेत. त्याच्या विक्रीसाठी सामाजिक माध्यमांचा वापर करत आहेत. 

पुणे जिल्ह्याच्या परिसरात मांजरी (बु.) भागामध्ये शहरीकरण वाढत असताना केवळ शेतीच नव्हे, तर पारंपरिक देशी गहू वाण नैसर्गिक पद्धतीने जपणाऱ्या घुले कुटुंबीयांतील कसदार धान्य उत्पादनाची धुरा पुढील उच्चशिक्षित पिढीने उचलली आहे. वंदन घुले हे तीन वर्षांपासून २२ गुंठे क्षेत्रातून सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट तंत्राने दर्जेदार गहू उत्पादन घेत आहेत. त्याच्या विक्रीसाठी सामाजिक माध्यमांचा वापर करत आहेत. 

पुणे जिल्ह्यातील मांजरी (बु.) येथे पांडूरंग घुले व कुटुंबीयांची सव्वा एकर शेती आहे. पूर्वापार पिढीजात त्यांच्याकडे खपली गहू उत्पादन होत असले तरी दरम्यानच्या काळामध्ये ऊस आणि भाजीपाला उत्पादनामुळे ते मागे पडले. त्यांची मुले वंदन आणि विनय हे उच्चशिक्षित आहेत. वंदन हे एम. एस्सी (बॉटनी) असून, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सहायक संशोधक म्हणून कार्यरत आहेत. विनय हे बंगळूर येथे खासगी आयटी कंपनीत कार्यरत आहेत. एकदा विनय यांनी परदेश दौऱ्यात एकदा खपली गहू उत्पादन पाहिले आणि त्याचे कौतुकही ऐकले. इकडे थेऊर येथील साखर कारखाना बंद झाल्याने ऊस पिकाला पर्याय शोधत होते. त्या वेळी पुन्हा खपली गहू लागवडीची कल्पना त्यांच्या मनात आली. त्याला वंदन यांनीही दुजोरा दिला. मग सुरू झाली खपली गहू बियाण्यांची शोधाशोध. अलीकडे खपली गहू लागवडीचे प्रमाण तुलनेने कमी झाल्यामुळे बियाणे मिळत नव्हते. शेवटी त्यांना फलटण येथून नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेले बियाणे मिळाले. सुरवातीला नैसर्गिक शेती किंवा रासायनिक खतांच्या वापराशिवाय शेती कशी होऊ शकते, असे वाटत होते. तेव्हा माधव घुले, आशिष विधाते, सचिन घुले, गणेश घुले, डॉ. प्रकाश जाधव अशा मित्रांनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुभाष पाळेकर यांच्या पद्धतीने नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि नैसर्गिक पद्धतीने गहूच नव्हे, तर खरीप हंगामातील सोयाबीन, मूग आणि उन्हाळ्यातील पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्याचेही उत्पादन घेऊ लागले. यंदा मुगाबरोबच उडीद, तूर या कडधान्य पिकांच्या उत्पादनाचेही वंदन यांनी नियोजन केले आहे. वंदन घुले यांना वडील पांडूरंग, आई शशिकला आणि पत्नी अॅड. सोनाली यांची शेतीमध्ये मदत होते.  

आरोग्यदायी खपली गहू
महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटकमधील विजापूर, आंध्र प्रदेश, गुजरातच्या सौराष्ट्र भागांमध्ये खपली गव्हाची लागवड होते. 

या वाणाचे एकरी उत्पादन कमी असून, अधिक प्रक्रिया कराव्या लागत असल्याने खर्चही अधिक आहे. परिणामी गेल्या दशकामध्ये या वाणाची लागवड कमी झाली आहे. खपली गहू हा तांबेरा प्रतिबंधक आहे. 

खपली गव्हामध्ये तंतूमय पदार्थांचे प्रमाण इतर वाणांपेक्षा अधिक असून, रक्तातील शर्करा (ग्लुकोज) कमी करण्याची क्षमता आहे. 

कर्बोदके, व्हिटॅमिन, मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आहे. 

मधुमेह, हृदयाशी निगडित आजार कमी करण्यासाठी खपली गहू उपयुक्त असल्याचे विविध संशोधनातून पुढे येत आहे. 

गहू बीज प्रक्रिया, लागवड तंत्र
पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात, दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पोषक हवामानानुसार गव्हाची लागवड होते. दरवर्षी गहू काढणी झाल्यानंतर बियाणे चांगले वाळवून राखेमध्ये ठेवले जाते. त्यानंतर लागवडीपूर्वी बीजामृताने बीज संस्कार करून बियाणे सावलीमध्ये वाळविले जाते. तोपर्यंत शेतामध्ये नांगरणी, पाळी टाकून, टोकण पद्धतीने किंवा फेक पद्धतीने लागवड केली जाते. ५ ते ६ इंच खोलीवर बियाणे जाईल याची काळजी घेतली जाते. बाल्यावस्थेतत खुरपणी केली जाते. त्यामुळे हवा खेळती राहून एका बियाणाला सरासरी ४५ ते ५० फुटवे येत असल्याचा अनुभव आहे. १२० ते १२५ दिवसांमध्ये गहू काढणीला येतो. 

पाणी व खत व्यवस्थापन
खपली गहू पिकाला तीन महिन्यांच्या कालावधीत पाच ते सहा वेळा पाणी द्यावे लागते. या वाणाला पहिले पाणी दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी आंबवणी म्हणून दुसरे पाणी दिले जाते. त्यानंतर दोन पाण्यातील अंतर वाढवत नेले जाते. आंबवणी दिल्यानंतर १५ दिवसांनी, तेथून पुढे २२ दिवसांनी आणि त्यानंतर २८ दिवसांनी शेवटचे पाणी दिले जाते. ओंब्या बाहेर निघेपर्यंत जास्त पाणी दिले जात नाही. यंदा पाऊस कमी असल्याने सहावे पाणी द्यावे लागेल. प्रत्येक पाण्याला वाहत्या पाण्यातून जीवामृत दिले जाते. दर २१ दिवसांनी पानांवर जीवामृताची फवारणी केली जाते. आंब्यांमध्ये दाणे भरत असताना सप्तधान्यांकुराची फवारणी करतात. किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार दशपर्णी अर्कही फवारला जातो.  

सापळा पिकांमधून कीटकांचे नियंत्रण 
गहू वाढीच्या काळात बऱ्याचदा ढगाळ वातावरण येते. रोगाचा व काळ्या माव्याचा प्रादुर्भाव होतो. माव्याच्या नियंत्रणासाठी सापळा पिकांची उदा. मोहरी, मेथी, हरभरा, कोथिंबीर, गुजरातवरून आणलेले जिरे लावले आहेत. मेथीमुळे नैसर्गिकरित्या नत्र पुरवठा होतो. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करत नाही. मावा किडींचे शत्रू मावा व अन्य उपद्रवी कीटकांचा बंदोबस्त करतात. मोहरीच्या फुलांकडे मधमाश्‍या आकर्षित होतात, त्याने परागीभवन वाढते.  अन्य पक्ष्यांसाठी नैसर्गिक थांबे तयार होतात. 

हरभरा, कोथिंबीर, जिरे या पिकांकडे मावा ओढला जातो. यातून मोहरी, मेथी, कोथिंबीरीचे उत्पादन मिळते. 

नातेवाइकांसह गहू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोहरी मोफत दिली जाते. 

विक्री व्यवस्थेसाठी सामाजिक माध्यमे...
यंत्राद्वारे गहू काढणीनंतर साधारण एक आठवड्यापर्यंत वाळवला जातो. त्यानंतर मीलमध्ये भरडून त्यावरील तूस हलकेचे वेगळे केले जाते. त्यानंतर वाऱ्यावर उफणून त्यातील तूस, कचरा वेगळा केला जातो. या पद्धतीमुळे गव्हातील पोषक घटक कमी होत नाहीत. घुले यांना २२ गुंठे क्षेत्रातून सुमारे ६ क्विंटल खपली गहू उत्पादन मिळते. यातील ५० टक्के गहू विकला जातो. २५ टक्के बियाणे तर उर्वरित गहू घरी खाण्यासाठी ठेवला जातो. गव्हाची व बियाण्याची ८० रुपये किलोने विक्री होते. 

पहिल्या वर्षी केवळ बियाण्यासाठी गहू पिकविण्यावर भर दिला. दुसऱ्या वर्षी बियाणे विक्रीसाठी समाजमाध्यमांचा वापर केला. त्यावरून लातूर, पुणे, सातारा, औरंगाबाद येथून अनेकांनी बियाण्याची मागणी केली. अगदी मध्य प्रदेश, राजस्थानसह दक्षिण भारतातील राज्यातून बियाण्यासाठी मागणी आली. खाण्यासाठी गव्हाला दूरवरून मागणी येत आहे. 

कसदार, चवदार गव्हासाठी...
वडिलोपार्जित शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीने खपली गव्हाचे उत्पादन घेत आहे. हाताने कापणी केल्यानंतर बैलाने मळणी केली जायची. नंतर तो गहू खाण्यासाठी मशीनमधून काढून घेत. खपली गहू खायला चवदार आहे. त्याविषयी बोलताना पांडुरंग घुले यांनी माजी मंत्री कै. डॉ. पतंगराव कदम यांची आठवण सांगितली. ते हडपसर येथील साधना विद्यालयात शिकवायला होते, त्या वेळी घुले यांच्या सायकलवरून खास खपली गव्हाच्या पुऱ्या खाण्यासाठी घरी येत. या गव्हात कस अधिक असून, तो आमच्या खाण्यात असल्यानेच वयाच्या ७२ व्या वर्षीही ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यानंतर शेती कोण करणार, हा प्रश्नही त्यांच्या दोन्ही मुलांनी नोकरी करताना शेतीत लक्ष घातल्याने सुटला आहे. आता मुलांचा त्यांना अभिमान वाटत असल्याचे पांडुरंग घुले यांनी सांगितले.
- वंदन पांडुरंग घुले, ९८८१२५८२८२ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghule Family Wheat Production Agriculture Success Motivation