पूरक व्यवसायांतून ‘नंदाई’ ने उभारले कुटुंब

शेळीपालनातून कुटुंब उभे करणाऱ्या नंदा थोरात यांच्यासह मुलगा गणेश, सून तृप्ती व नातू अरुष.
शेळीपालनातून कुटुंब उभे करणाऱ्या नंदा थोरात यांच्यासह मुलगा गणेश, सून तृप्ती व नातू अरुष.

साधारण अठरा वर्षांपूर्वी भावाने रक्षाबंधनाला शेळी भेट दिली. त्यातून टप्प्याटप्प्याने संख्येत वाढ करीत आदर्श शेळीपालन नंदा थोरात (ढवळपुरी, जि. नगर ) यांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीतून यशस्वी केले. शेतीसह पूरक व्यवसायांची मदार त्या आज समर्थपणे सांभळत आहेत. त्यांच्याच नावावरून शेळीपालनाला नंदाई ॲग्रो फार्म असे नाव दिले आहे. गणेश व प्रवीण ही त्यांची मुले नोकरी सांभाळून त्यांना शेतीत आधार देत आहेत. 

ढवळपुरी (ता. पारनेर, जि. नगर) येथील नंदा पोपट थोरात आपली शेती व पूरक व्यवसाय आज सक्षमपणे जोपासत आहेत. त्यांना मुलगा गणेश व प्रवीण यांची चांगली साथ आहे. गणेश यांचे ‘बीएसस्सी’ व हॉस्पीटल  मॅनेजमेंट’ चे शिक्षण झाले असून ते नगर येथे खासगी रुग्णालयात नोकरी करतात. त्यांचे बंधू प्रवीण पुणे येथे खासगी नोकरी करतात. थोरात कुटुंबाची  वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. गणेश यांच्या वडिलांनी १५ वर्षे मुंबईत एका खत कंपनीत नोकरी केली.

गावचा संघर्ष 
साधारण १८ वर्षांपूर्वी नोकरी सोडून कुटुंब ढवळपुरीला आले. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. गावात राहायला घर नव्हते. त्यातच गावातील समाजमंदिरात बिऱ्हाड मांडले. दोन वर्षांत गणेश यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र आठ वर्षे कुटूंब या समाजमंदिरातच राहिले. गणेश यांच्या आई नंदा यांना गावातील मानलेले भाऊ भाऊसाहेब थोरात यांनी १८ वर्षांपूर्वी रक्षाबंधनाला शेळी भेट दिली.

तिचे पालन पोषण करत नंदाताईंनी शेळ्यातं वाढ केली. एकही शेळी खरेदी न करता थोरात यांच्याकडे आज सुमारे ३५ शेळ्या तर २५ पर्यंत करडे आहेत. सर्व स्थानिक उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आहेत. नंदाताई त्यांचे चोख व्यवस्थापन पाहतात. आईच्या १८ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आज थोरात यांचे शेळीपालन केवळ नावारूपालाच आले नाही तर कुटुंबाचा आधार देखील बनले आहे. गणेश शक्य त्यावेळी नोकरी सांभाळून सुट्टीच्या काळात आईला शेतीत मदत करतात. 

कोंबडीपालनाची जोड 
शेळीपालनासाठी सुरवातीला छोटे शेड केले होते. अडीच वर्षांपूर्वी गणेश यांनी साधारण अडीच लाख रुपये खर्च करून दहा गुंठे क्षेत्रावर मुक्तसंचार शेळीपालन सुरु केले. आता स्थानिक जातीच्या कोंबडीपालनाचीही जोड दिली आहे. मुक्तसंचार शेडमध्ये नियमितपणे सुमारे दीडशे कोंबड्यांचा मुक्तपणे वावर असतो.या पद्धतीमुळे कोंबड्याच्या खाद्यावरील खर्चात साधारण चाळीस ते पन्नास टक्के बचत होते. साधारण शंभर कोंबड्यापासून नियमितपणे अंडी उत्पादन घेतले जाते. वर्षभरात साधारण चारशे ते पाचशे कोंबड्यांची जागेवरच विक्री केली जाते.

दोन एकरांवर चारा उत्पादन
पाच एकरांपैकी तीन एकर शेती दुसऱ्यांच्या मदतीने करून घेतली जाते. तर दोन एकरांत शेळ्यांसाठी फक्त चारा उत्पादन घेतले जाते. त्यात २० गुंठे क्षेत्रावर दोन वर्षांपूर्वी सुबाभळीची लागवड केली आहे. तर अन्य प्रत्येकी वीस गुंठ्यात मेथी घास व कडवळ ज्वारी घेतली आहे. विहिरीची पाणी उपलब्ध असल्याने आलटून-पालटून तेथे चारा घेतला जातो.

कुटुंबाला आर्थिक आधार
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करणाऱ्या थोरात कुटुंबाला शेळीपालन व त्यास जोड दिलेल्या कोंबडीपालनापासून आर्थिक आधार मिळाला आहे. शेळ्या व बोकड मिळून वर्षाला ५० ते ५५ च्या संख्येपर्यंत विक्री होते. साधारण पाचहजार ते सातहजार रुपये प्रति शेळी असा दर मिळतो. कोंबड्याची प्रती नग ४००  रुपयांप्रमाणे तर दररोज प्रति नग ७ ते ८ रुपयाप्रमाणे ३० ते ४० अंड्यांची विक्री होते. दोन्ही पूरक व्यवसायांमधून वर्षाला काही लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.  

घर बांधले, बंधूचे शिक्षण केले 
अनेक वर्षे समाजमंदिरात राहून संघर्ष करणाऱ्या थोरात परिवाराला पूरक व्यवसायांच्या आधारे घराचे स्वप्न पूर्ण करता आले. त्यांनी ढवळपुरी व नगर येथेही घर बांधले आहे बंधू प्रविणचे शिक्षण करता आले. याच आधारावर आजोळी कर्जत तालुक्यात निंबे (ता. कर्जत) येथे दोन एकर शेती खरेदी केली आहे. आईच्या कष्टातूनच चांगले दिवस प्राप्त झाल्याचे गणेश सांगतात. त्यांच्यातच नावाने नंदाई ॲग्रो फार्म असे शेळीपालन व्यवसायाला नाव दिले आहे. येत्या काळात शेळ्यांच्या संख्येत वाढ करून त्या शंभरापर्यंत नेत पूर्णवेळ हा व्यवसाय करण्याचा त्यांचा मानस आहे. देशी कोंबडी व शेळीच्या मटणाला कोरोना काळात चांगली मागणी आली आहे. यामुळे पुढील काळात शहरांसह अन्य भागात मागणीनुसार मटण व चिकनचा थेट पुरवठा करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

- गणेश थोरात  ९७६६६५२६५९ 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com