पौष्टीक गोडंबीने वाढवली सुका मेव्याची लज्जत 

पौष्टीक गोडंबीने वाढवली सुका मेव्याची लज्जत 

अकोला जिल्ह्यात गोंधळवाडी हे पातूर-मालेगाव मार्गावर वन्य भागात वसलेले पुनर्वसित गाव आहे. साधारणतः ९०० पर्यंत लोकसंख्येच्या या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. येथील सुमारे २०० कुटुंबांपैकी निम्मी कुटुंबे गोडंबी व्यवसायात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवितात. यात प्रामुख्याने महिलांचा सहभाग अधिक आहे.

काय आहे गोडंबी?  
काळा बिब्बा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. वन्य किंवा जंगल परिसरात याची झाडे आढळतात. हा बिब्बा फोडून त्यातून गोडंबी वेगळी केली जाते. बिब्याचे तेल त्वचेसाठी घातक असते. त्यामुळे बिबा फोडताना त्यातील तेलाचा त्वचेशी संपर्क झाल्यास त्वचा काळी पडते. असे हे जिकीरीचे काम असूनही गोंधळवाडीतील महिला मोठ्या कष्टाने बिब्यामधून गोडंबी वेगळी करतात. 

गोडंबी वेगळी करण्याचे काम 
गोडंबी वेगळी करण्यासाठी प्रतिकिलोसाठी दीडशे रुपये मजुरी दिली जाते. सकाळपासून सायंकाळपर्यंत महिला दीड ते दोन किलोदरम्यान गोडंबी वेगळी करता. त्यातून त्यांना दिवसाला दोनशे रुपयांहून अधिक मजुरी मिळते. साधारणतः १० किलो बिब्बे फोडल्यानंतर एक किलो गोडंबी मिळते.  

कुठून येतात बिब्बे 
बिब्याची झाडे पातूर तालुक्यात फारशी शिल्लक उरलेली नाहीत. त्यामुळे या व्यवसायाला लागणारे बिब्बे प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यांतून आणले जातात. महिन्याला सुमारे १० ते २० टनांपर्यंत बिब्बे लागतात. गोंधळवाडीसह लगतच्या खेड्यांमध्येही बिब्बे फोडण्याचे काम दिले जाते. 

विक्री कुठे होते?
गोडंबी प्रामुख्याने अकोला मार्केटमध्ये विकली जाते. या शहरात किराणा बाजार मोठा आहे. साहजिकच अकोला, बुलडाणा, वाशीम तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत येथून किराणा माल पाठवला जातो. त्यामुळे ठोक व्यावसायिक ही गोडंबी खरेदी करतात.

हिवाळ्यात अधिक दर 
गोडंबी हा सुका मेव्यातील प्रमुख खाद्यपदार्थ आहे. हिवाळ्यात सुकामेव्याचे लाडू बनवून खाल्ले जातात. यात काजू, बदाम, खोबरे, मनुका यांसह गोडंबीला मागणी असते. डिंकाच्या लाडवातही त्याचा वापर केला जातो. साहजिकच या काळात गोडंबीचे दर वर्षभरातील अन्य काळाच्या तुलनेत अधिक राहतात. त्यामुळे सव्वा ते दीडपट अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी या काळात असते. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे काही महिने बिब्बे फोडून त्यातून मिळणारी गोडंबी साठवून ठेवली जाते. यासाठी हवाबंद ड्रमचा वापर केला जातो. अन्य वेळी ५० किलोच्या पोत्यात पॅकिंग करून व्यापाऱ्यांना ती ठोक विकली जाते.

शेतकरी गटाची स्थापना
गावातील काही शेतकरी एकत्र येऊन त्यांनी कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत शेतकरी गट स्थापन केला आहे. मध्यतंरी आत्माच्या पुढाकाराने महिलांना बिबे फोडण्याच्या दृष्टीने हातमोजे व अन्य साहित्य पुरविण्यात आले होते. येत्या काळात व्यवसायाच्या दृष्टीने कार्यक्रम हाती घेणार असल्याचे ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मंगेश झांबरे यांनी सांगितले.

मार्केटिंग करणार
सध्या गोडंबी व्यापाऱ्यांना ठोक स्वरूपात दिली जाते. पुढील काळात कृषी विभागाच्या पुढाकाराने होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होऊन थेट विक्री करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रामदास म्हणाले. यासाठी वेगवेगळ्या वजनाचे पॅकींग करण्यात येणार आहे. 

गोडंबीचे  व्यावसायिक महत्त्व 
गोडंबी ही उष्णतावर्धक समजली जाते. याचा वापर प्रामुख्याने शिवाय ड्रायफ्रुटमध्ये होतो. बिब्बा फोडल्यानंतर त्यामध्ये जी बी मिळते तिला गोडंबी म्हटले जाते. बदामाच्या तोडीने त्यात पोषणमूल्य असल्यामुळे हा बिब्याचा सर्वांत किमती भाग मानला जातो. बिबे फोडून गोडंबी वेगळी करताना वरच्या आवरणातील तेल अंगावर उडते आणि जखमा होऊ शकतात. बिब्बे फोडण्यात कुशल महिला त्या कामात अवगत झाल्या आहेत. 

तयार केला रोजगार 
गोंधळवाडी येथील रामदास गोदमले यांना राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून नोकरी लागली होती. यवतमाळ विभागात त्यांनी तीन वर्षे नोकरी केलीही. तेथून त्यांची थेट मुंबई विभागात बदली करण्यात आली. मिळणारे वेतन, मुंबईसारख्या शहरी भागात वास्तव्य या बाबी लक्षात घेत त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते थेट गावात आले आणि आपला गोडंबी व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू केला. काम वाढविले. महिन्याला १० ते २० टनांपर्यंत बिब्बे फोडण्याचे काम सुरू केले. त्यासाठी त्यांच्याकडे दररोज ३० ते ३५ महिला वर्षभर कामाला असतात. गोंधळवाडी हे गाव वन विभागाच्या परिघात आहे. या ठिकाणचे संपूर्ण क्षेत्र कोरडवाहू असल्याने खरीप हंगाम सोडला, तर अन्य वेळी शेतात फारशी कामे नसतात. अशा परिस्थितीत गोडंबी वेगळी करण्याच्या व्यवसायाने गावातील महिलांच्या हाताला वर्षभर काम उपलब्ध करून दिले आहे. अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधनच हा व्यवसाय बनला आहे. नोकरी सोडून या व्यवसायात ताकदीने उतरलेले रामदास यांचे उत्पन्न आता नोकरीच्या तुलनेत चांगले राहिले आहे. 

आमच्या गावात बिब्बे फोडून गोडंबी वेगळीकरण्याचा व्यवसाय आणखी वाढू शकतो. यासाठी शासनाने तयार माल साठविण्यासाठी गोदाम उभारून दिल्यास वर्षभर व्यावसायिक विक्री करणे शक्य होईल. बिब्बे फोडण्याचे काम किचकट व त्वचेच्या दृष्टीने जोखमीचे असते. यासाठी यंत्र विकसित झाले तर त्याचा मोठा फायदा मिळेल.
- सुभाष खिल्लारे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com