परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र` 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

परभणी - ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीकृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम साॅफ्टवेअर देण्यात आले आहे.

परभणी - ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीकृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम साॅफ्टवेअर देण्यात आले आहे.

आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून केंद्र शासनाचा ई -पंचायत प्रकल्प (११ एनआयसी आज्ञावली) ग्रामपंचायत लेखसंहिता २०११ चे १ ते ३३ रजिस्टर डिजिटाइज्ड; तसेच आॅनलाइन करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींद्वारे देण्यात येणारे जन्मनोंदणी व प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, नोकरी व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र ,मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र, स्वच्छतागृह दाखला, बांधकाम परवाना, नादेय प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, निराधार योजनेसाठी वयाचा दाखला, हयातीचा दाखला, जाॅब कार्ड आदी सेवा आॅनलाइन करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली.

ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकोपयोगी असलेल्या रेल्वे, बस आरक्षण, डीटीएच रिचार्ज, बॅंकिंग सेवा, आर्थिक समावेशन, ई-काॅमर्स, पॅन कार्ड, आधार नोंदणी, विमा हप्ते भरणे, पासपोर्ट, वीजबिल भरणे आदी सेवादेखील आपले सेवा केंद्रांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

परभणी जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ६९ ग्रामपंचायतींमध्ये तसेच १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या २०४ ग्रामपंचायतींमध्ये (स्वच्छेने) स्वंतत्र आपले सेवा सरकार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. १५ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या ४३१ ग्रामपंचायतींचे क्लस्टर तयार करून १८९ आपले सेवा सरकार सेवा केंद्राची उभारणी करण्यात  आली.

खर्च आणि वेळेची बचत
आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून ग्रामस्थांना गावातच माफक शुल्कात ग्रामपंचायतींकडून संगणकीकृत दाखले देण्यात येत आहेत. तसेच अन्य आॅनलाइन सुविधादेखील मिळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा खर्च आणि वेळेची बचत होत आहे.
- विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),  जिल्हा परिषद, परभणी    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayats in Parbhani district government service center