अाहारात असाव्यात फळभाज्या, पालेभाज्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

भाज्या या अनेक व्याधींवर गुणकारी असतात. त्यामुळे विविध फळांसोबतच अाहारात पालेभाज्या अाणि फळभाज्यांचाही अाहाराच्या दृष्टीने समावेश असणे महत्त्वाचे अाहे. 

पालेभाज्यांचे गुणधर्म 
१) अळूची पाने - 
- अळू ही पालेभाजी रक्त, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. 
- अळूच्या पानांचा रस व जिरेपूड असे मिश्रण पित्तावर गुणकारी अाहे. फुरसे किंवा अन्य विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा. गळवे किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठे वाटून त्या जागी बांधावी. 
- अळूच्या पनांमध्ये प्रथिने - ८.६ टक्के, कॅल्शिअम ४६० मिली ग्रॅम, फाॅस्फरस १२५ मिली ग्रॅम, लोह ३८.७ मिलीग्रॅम, क जीवनसत्त्व ६३ मिली ग्रॅम असते. 
२) चाकवत (चंदन बटवा) 
- दीर्घकाळाच्या तापामुळे तोंडाला चव नसणे, कावीळ, छातीत जळजळ अशा तक्रारींवर ही भाजी वापरावी. शक्यतो किमान मसाला मिसळून ही पातळ पालेभाजी तयार करावी. व्यक्तिनुरूप व प्रकृतीप्रमाणे लसूण, आले, जिरे, धने, हिंग, ताक, सैंधव, मिरी, तूप, खडीसाखर, गूळ हे पदार्थ अनुपान म्हणून वापरावेत. 
- चाकवत रुचिकर, पाचक, रक्तशोधक, दर्दनाशक, त्रिदोषशामक, शीतवीर्य, बल व शुक्राणुवर्धक आहे. चाकवतमध्ये लोह, क्षार, कॅरोटिन, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, प्रोटीन, विटामिन ‘सी’ व ‘बी मुबलक प्रमाणात आहे. 
- चाकवत डोळे, लघवी व पोटा संबंधी तक्रारीसाठी विशेष लाभदायक आहे. 

फळभाज्याचे गुणधर्म 
१) गवार : गवार गुणाने रुक्ष, वातवर्धक आहे. मलावरोध, मधुमेह, रातंधळेपणा विकारांत गवारीचे महत्त्व सांगितले आहे. गवार तुपावर परतून सैंधव मिसळून खावी. भाजी फार तेलकट बनवू नये औषधी गुण जातात. मेदस्वी माणसाने गोवारीच्या शेंगा नुसत्या वाफवून खाव्यात. 
२) तोंडली - तोंडल्याच्या मुळांचा रस सैंधव चूर्ण मिसळून घ्यावा मधुमेहावर उपयुक्त आहे. पानांचा रस व्रणरोपणाचे काम करतो. पाने वाटून जखमेवर बांधावी, पोटात रस घ्यावा. पातळ जुलाब होत असल्यास, तोंडाला चव नसल्यास तोंडल्याची उकडून भाजी खावी. सोबत सुंठ पाणी घ्यावे. काविळीत तोंडल्याची भाजी पथ्यकर आहे. 

फळांचे गुणधर्म 
१) डाळिंब : 
डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते. आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार (संगहणी) बरा होतो. डाळिंबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो. 
२) जांभूळ : 
जांभूळ पाचक अाणि अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते. 

Web Title: Health Benefits of Vegetables