esakal | अतिवृष्टीचा ८००० हेक्टरला फटका; बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती  
sakal

बोलून बातमी शोधा

buldhana-rain

महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके अतिवृष्टीने बाधित झाली आहेत. यात सर्वाधिक ४१०० हेक्टर क्षेत्र एकट्या बुलडाणा तालुक्यातील आहे.

अतिवृष्टीचा ८००० हेक्टरला फटका; बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती  

sakal_logo
By
प्रतिनिधी

बुलडाणा - जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने बुलडाणा, चिखलीसह इतर तालुक्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके अतिवृष्टीने बाधित झाली आहेत. यात सर्वाधिक ४१०० हेक्टर क्षेत्र एकट्या बुलडाणा तालुक्यातील आहे.

जिल्ह्यात रविवारी (ता.१६) आणि सोमवारी (ता.१७) जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बुलडाणा, चिखली, संग्रामपूर, मेहकर, देऊळगावराजा, लोणार या सहा तालुक्यांतील आठ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल यंत्रणांनी सुरू केले आहेत. जिल्ह्यात १० ते १७ ऑगस्टदरम्यान संततधार पाऊस झाला. या पावसामुळे आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात बुलडाणा तालुक्यातील ४११८, चिखलीतील १९४४, संग्रामपूरमधील ८५, मेहकरमधील १५०, लोणारमधील ३२१, देऊळगावराजामधील ५१७ हेक्टरवरील पिकांचा समावेश आहे. तसेच बुलडाणा तालुक्यातील ९१६ हेक्टर जमीनसुद्धा खरडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

धाड परिसराला मोठा तडाखा
बुलडाणा तालुक्यातील धाड व परिसरात सोमवारी (ता.१७) अतिवृष्टी झाली.  यात धाड, चांडोळ, म्हसला, कुंबेफळ,सातगाव,डोमरुळ, वरुड,टाकळी, सोयगाव, जामठी, इरला,ढंगारपूर,भडगाव, मोहोज या नदीच्या काठच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. या भागातील करडी, मासरुळ,शेकापूर,ढालसावंगी, बोदेगाव येथील धरण प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. कुंबेफळ गावातील गणेश रामभाऊ वाघ यांच्या गोठ्यातील ४ शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. बाणगंगा नदीचे पाणी करडी धरणातून ओव्हरफ्लो होऊन कुंबेफळ गावातील नदीस येत असल्याने या नदीच्या काठावर असलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे. नदीच्या काठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. चांडोळ येथील धामणा नदीच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी गेल्याने जवळपास १४५० शेतकऱ्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. याठिकाणी ९६० हेक्टरवरील खरीप पिके जमीनदोस्त झाली आहेत. करडी धरणाच्या खालच्या भागातील कुंबेफळ, सातगाव, टाकळी, म्हसला या गावात शेतातील शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर संच, अवजारे, ठिबक संच, पाईप आणि साहित्य वाहून गेले आहे. धाड आणि बोरखेड येथे अंदाजे २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  धाड आणि परिसरातील १३ नदी आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या शेतीचे जवळपास एकूण १५९० हेक्टरवर नुकसान झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशी आहे स्थिती
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान
अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडल्या
नदीकाठच्या शेतीला फटका

loading image
go to top