नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका

प्रतिनिधी
Wednesday, 30 September 2020

सध्या जागेवरच २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचे दर मिळत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किमान पाच व कमाल १२ रुपये प्रतिकिलोचे दर मिळाले होते. 

नंदुरबार - जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. काढणी सुरू झाली असून उत्पादनावर परिणाम दिसत असल्याने दर टिकून आहेत. सध्या जागेवरच २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचे दर मिळत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये किमान पाच व कमाल १२ रुपये प्रतिकिलोचे दर मिळाले होते. 

यंदा उत्पादनावर निसर्गाच्या लहरीपणाच परिणाम झाला आहे. कारण जून, जुलैमध्ये पावसाने ताण दिला. जूनमध्ये १२ ते १३ दिवस प्रचंड ऊन पडत होते. जुलैमध्येदेखील १३ ते १५ दिवस ऊन पडले. यामुळे पिकाची हवी तशी वाढ झाली नाही. मग ऑगस्टमध्ये सतत पाऊस सुरू होता. सप्टेंबरमध्ये सुमारे २९ दिवस सतत पाऊस झाला. जोरदार व अतिजोरदार पाऊस झाला. प्रतिकूल व अस्थिर वातावरणामुळे मिरची पिकाला फटका बसला. यामुळे काढणीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. फुले गळून पडली. सप्टेंबरमध्येच काढणीला वेग येतो. पण सध्या पीक व्यवस्थित नसल्याने काढणी रखडत सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतिपावसाने पीक पिवळे पडले आहे. वाढ खुंटली आहे. अनेक रोपांमध्ये आकस्मिक मर रोगाची समस्या दिसली आहे.  जिल्ह्यात नंदुरबार तालुका मिरची लागवडीत आघाडीवर आहे. तालुक्यातील कोठली, चौपाळे, पळाशी, धमडाई भागाला मोठा फटका अतिपावसामुळे बसला आहे. गेल्या वर्षी एक-दोन दिवसाआड एक एकरात १० ते १२ क्विंटल हिरवी मिरचीची काढणी ऑक्टोबरमध्ये केली जात होती. परंतु यंदा एक एकरात दोन दिवसाआड पाच ते सहा क्विंटल मिरचीच काढणीला उपलब्ध होत आहे. उत्पादन कमी येत आहे. नंदुरबार तालुक्यातील कोळदे, शिंदे, नाशिंदे, लहान शहादे, बामडोद, भागातही मिरची पिकाची स्थिती बिकट  आहे. 

हेही वाचा : प्रयोगशील शेतकरी सोपान शिंदे यांना रेशीम शेतीने दिली आर्थिक साथ

बाजार समितीत आवकही नगण्य
गेल्या वर्षी मिरचीला जागेवरच प्रतिकिलो पाच ते १२ रुपये प्रतिकिलोचे दर मिळत होते. यंदा जागेवरच २० ते ३० रुपये प्रतिकिलोचे दर मिळत आहे. दर्जेदार मिरचीला चांगले दर आहेत. जागेवरच अधिक खरेदी सुरू असल्याने नंदुरबार बाजार समितीमधील आवकही कमी  झाली आहे. बाजार समितीत नगण्य आवक सध्या सुरू आहे. प्रतिदिन ५० ते ६० क्विंटल मिरचीची आवक गेल्या पंधरवड्यात झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पावसाळ्यात वातावरण सतत अस्थिर राहीले. सुरवातीला पावसाचा मोठा खंड प्रत्येक महिन्यात होता. मग अतिपाऊस झाला. यामुळे पिकात मर रोग आला. पिकाची वाढ खुंटली असून, काढणी हवी तशी नाही. 
- सागर पाटील,  शेतकरी, कोठली (जि.नंदुरबार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains hit Nandurbar chillies