युरियासोबत जैविक खतांची सक्तीच्या विक्रीची उपयुक्तता किती?

Process-on-Seed
Process-on-Seed

रासायनिक खते दिल्यानंतर पिकाकडून त्यांचा जसाच्या तसा वापर होत नाही. जिवाणूकडून त्यावर अनेक क्रिया होणे गरजेचे असते. जिवाणूंना या क्रिया पार पाडण्यासाठी ऊर्जा आणि अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर गरज असते. ही गरज सेंद्रिय कर्बातून भागविली जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकार युरिया खतासोबत जैविक खतांची सक्तीने विक्री करण्याचा विचार करीत आहे. यामागे जैविक नत्र स्थिरीकरणातून जमिनीला, पिकाला काही प्रमाणात नत्र मिळेल. जमिनीचे आरोग्य सुधारून उत्पादन खर्चात बचत होईल. युरियावरील दबाव काही प्रमाणात कमी होईल. अशी काही उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली असावीत. काही वर्षांपूर्वी सरकारने स्फुरद, पालाशयुक्त खताचे दर अनुदान कमी केले. मात्र नत्रयुक्त खतांचे अनुदान कमी केले नव्हते. तुलनेने युरिया स्वस्तात मिळत असल्यामुळे त्याच्या वापरात वाढ झाली. मात्र, युरियाचा अतिरिक्त वापर का होतो? जिवाणू खतांच्या वापराने त्यात बचत होईल का? असे प्रश्‍न उपस्थित होतात. कृषी शाखेत रसायनशास्त्र विभागाकडून पीक पोषण विज्ञानाचा अभ्यास केला जातो.

जैविक खते वापरासाठी कशी तयार करायची, विक्रीसाठी त्याचे सुरक्षित पॅकिंग कसे करायचे, याचे एक तंत्र आहे. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहीत असेलच असे नाही. इतकी वर्षे रासायनिक खतांचा जमिनीमध्ये वापर करत असूनही अनेकांना जमिनीमध्ये ती कशी कार्य करतात, याची फारच अल्प माहिती असते. मग, जैविक खते जमिनीत टाकल्यानंतर त्याच्या पुढील कार्याविषयीच्या तर बोलायलाच नको!

रासायनिक खतांच्या वापरास हरितक्रांतीनंतर सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात २ ते ४ पोते खत टाकून मिळणारे उत्पादन कितीतरी अधिक खते टाकूनही मिळत नाही. संकरित जाती आल्यामुळे पिकाची गरज काही प्रमाणात वाढली असली तरी खताची कार्यक्षमता नक्कीच कमी झाली आहे. शेतकऱ्यांनी शिफारशीपेक्षा अधिक खतांचा वापर सुरू केला आहे. खतांची ऱ्हास होण्यासोबत जमिनीची सुपीकता कमी होत गेली. 

पीक पोषण हे केवळ रसायनशास्त्रीय विषय नसून सूक्ष्मजीवशास्त्राशी नक्कीच संबंध आहे. खते पोत्यात आहेत तोपर्यंत ती रसायने आहेत. मात्र, तीच खते जमिनीत टाकल्यानंतर पिकांपर्यंत पोचणे, शोषली जाणे ही सूक्ष्मजीवशास्त्राशी संबंधित आहे. या अभ्यासाकडे आजवर दुर्लक्ष केले गेले.

रासायनिक खते जमिनीत टाकल्यानंतर त्याचे प्रथम स्थिरीकरण होऊन पुढे पिकाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध केले जाते. सूक्ष्मजिवांकडून पिकांस खते उपलब्ध करून दिली जातात. मात्र, त्यासाठी जमिनीची योग्य मशागत करणे गरजेचे असते. फक्त माती परीक्षण करून गरजेइतका खताचा पुरवठा केल्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर शक्य होणार नाही.
 खते टाकल्यानंतर जमिनीत ती व्यवस्थित स्थिर झाली पाहिजेत.
 कार्यक्षम मुळांभोवती योग्य प्रमाणात ओलावा असावा.
 जमिनीचा सामू उदासीनच्या जवळ असावा. 
 १ टक्‍क्‍यापेक्षा कमी क्षारता.
 मुळांजवळ खेळती हवा.
 योग्य तापमान.
 जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी.

पुढील हंगामातील पिकांसाठी जमिनीत आधीपासून सेंद्रिय कर्ब उपलब्ध असल्यास त्यांचे कार्य व्यवस्थित पार पडते. निसर्गतः जमिनीत उपलब्ध असलेल्या सेंद्रिय कर्बाचा आजवर वापर होत गेला. मात्र, त्याची वेळोवेळी भरपाई न केल्याने सेंद्रिय कर्बाची टक्केवारी कमी होत गेली. त्याचा फटका उत्पादनाला बसला. सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेचा अन्य घटकांवरही विपरीत परिणाम होत गेला. हा परिणाम फक्त नत्रयुक्त खतांपुरताच मर्यादित नसून, अन्य मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांवर झाला. 

आजही शेतकऱ्यांना सेंद्रिय खते कशासाठी दिली पाहिजेत, त्याचे जमिनीतील कार्य, आणि वापर याविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही. फक्त एकरी २० ते २५ गाड्या शेणखताचा वापर करावा, अशी शिफारस गेली ५० वर्षे करण्यात येते. मात्र, शेतकऱ्याकडून याचा वापर होतो का? शेणखत योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्यास त्याला सोपे, सुलभ आणि स्वस्त पर्याय दिले आहेत का, याचा  आजवर संशोधक पातळीवर कोणताही विचार झालेला नाही. या सर्व गोष्टी बाजूला ठेवून केवळ युरियाच्या पोत्यासोबत चार जैविक खताची पाकिटे शेतकऱ्याला सक्तीने खरेदी करायला लावल्यास काय साध्य होणार आहे? नत्र वायूच्या विघटनासाठी लागणारी ऊर्जा सेंद्रिय कर्बाकडून मिळवली जाते. त्यानंतरच्या प्रत्येक पायरीमध्ये ठरावीक ऊर्जेचा वापर केला जातो. जिवाणूंच्या शरीरक्रिया व प्रजोत्पादनासाठी सेंद्रिय कर्बाची ऊर्जा गरजेची असते.
 पिकाला गरजेइतके नत्र युरिया खतातून मिळत असेल तर जिवाणूंच्या हवेतील नत्र उपलब्धीकरण करण्याची गरजच संपून जाते. सेंद्रिय कर्बाअभावी युरियातील नत्राचा कार्यक्षम वापर होणार नसेल तर जैविक नत्र स्थिरीकरणाचे काम व्यवस्थित चालेल असे गृहीत धरता येणार नाही.
 अन्य सर्व जिवाणू खताच्या बाबतीतही अशीच स्थिती असू शकते.

जिवाणू खतांच्या वापराविषयी शेतकऱ्यांची समजुती 
नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू खत जमिनीत टाकले की हवेतून नत्राचा पुरवठा पिकाला सुरू होतो, असा शेतकऱ्यांचा समज करून दिला आहे. १९७० च्या दरम्‍यान ॲझेटोबॅक्टर या नत्र उपलब्ध करणाऱ्या जिवाणू खत बाजारात आले. त्यानंतर स्फुरद, पालाश विरघळवणारी जैविक खते बाजारात उपलब्ध झाली. याच्या वापराविषयी काही काही मूलभूत शास्त्रीय प्रश्‍न उभे राहतात.
 फक्त पाकिटातील जिवाणू खताचा वापर शिफारशीप्रमाणे केल्यानंतर त्या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेचे प्रश्‍न सुटणार काय?
 साल १९७० च्या सुमारास सर्वत्र शेतीतून समाधानकारक उत्पादन मिळत होते. त्या काळात जिवाणूंचे कार्य व्यवस्थित चालू होते. मग आज का होत नाही? 
 त्या काळात जमिनीत असणाऱ्या कोणत्या घटकांची सध्या कमतरता निर्माण झाली? ती कमतरता भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमके काय करणे गरजेचे आहे?
 आताच्या घडीला जमिनीतील जिवाणूंची संख्या किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे का? जिवाणूंच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेल्या गरजा जमिनीतून न भागल्यामुळे स्थानिक जिवाणूंची कार्यक्षमता कमी झाली असावी, हा माझा निष्‍कर्ष आहे. 
 विकत आणून टाकलेले जिवाणू त्याठिकाणी वाढून योग्य काम करतील का? आपण अनुकूल परिस्थिती निर्माण केल्यास स्थानिक जिवाणूंच योग्य काम करणार नाहीत का?

जिवाणू खतांच्या वापराविषयी...
 जिवाणू खताच्या पाकिटावर त्याच्या वापरासंबंधी सर्व माहिती दिलेली असते. मात्र त्यांच्या वाढीसाठी जमीन कशी तयार करावी, याची माहिती दिसत नाही. सूक्ष्मजीवशास्त्रानुसार, जिवाणू आणि त्याच्या आसपासची परिस्थिती यांचा योग्य समन्वय झाला तरच त्यांना कार्य करता येते. मात्र सर्वत्र परिस्थिती सर्व शेतजमिनीमध्ये समान असेलच असे नाही.
 एकाच अन्नद्रव्यासाठी निसर्गात सूक्ष्मजिवांच्या अनेक जाती प्रजाती आहेत. परिस्थितिकी बदलली की प्रजाती निसर्गंत आपोआप बदलते. आपल्याकडे जैविक खतांसाठी वापरल्या जाणाऱ्या जिवाणूंची संख्या अत्यल्प आहे. ती सर्वत्र तितक्याच कार्यक्षमतेने कमी करतील का?]

जैविक नत्र स्थिरीकरण 
आज सर्वत्र जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बांची टंचाई आहे. जिवाणूंचे संपूर्ण जीवन सेंद्रिय कर्बावर अवलंबून असते. जैविक नत्र स्थिरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लागणारी ऊर्जा सेंद्रिय कर्बाकडून पुरविली जाते. जैविक नत्र स्थिरीकरणाचे काम चार पायऱ्यांत चालते. त्या चार पायऱ्या व त्यातील ऊर्जेचा वापर पुढील तक्त्यामध्ये पहा.

- प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८, (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी आहेत.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com