शेतीमाल पुरवठ्यात वाढ; भावात घसरण

Pulses
Pulses

भारतातील २०१९-२० मधील शेती उत्पादनाचे सुधारित अंदाज १८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिद्ध केले गेले. या अंदाजानुसार बहुतेक सर्वच पिकांच्या उत्पादनात २०१८-१९ च्या तुलनेने वाढ दिसत आहे. या वर्षी तांदूळ, गहू व सर्व धान्ये यांचे उत्पादन विक्रमी ठरण्याचा संभव आहे. जागतिक पुरवठ्यातसुद्धा वाढ होण्याचा अंदाज अमेरिकन शेती खात्याने दिला आहे. चीनमधील साथीच्या आजाराने व्यापारावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सर्वच कारणांमुळे बहुतेक सर्वच शेतीमालाच्या भावात घसरण गेल्या काही दिवसात होत आहे. याही सप्ताहात कापूस व हळद वगळता सर्वच पिकांत ही घसरण चालू राहिली.

स्पॉट रब्बी मक्याचे भाव ८.२ टक्क्यांनी घसरले. सोयाबीनचे भावसुद्धा १.८ टक्क्यांनी तर बाजरीचे भाव ५ टक्क्यांनी घसरले. हळदीचे भाव मात्र ५ टक्क्यांनी वाढले. हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने मका व सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या एप्रिल/मे फ्युचर्स किमतींत वाढ दिसून येत आहे. NCDEX मध्ये मार्च २०२० पासून सोयाबीनसाठी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू होतील. एप्रिल २०२० मध्ये नोव्हेंबर, मेमध्ये डिसेंबर तर जूनमध्ये जानेवारी २०२१ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू होतील. (यांच्या डिलिव्हरी केंद्रात महाराष्ट्रातील लातूर व अकोला यांचा अंतर्भाव केला आहे). त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना मिळणाऱ्या भावांचे अंदाज पेरणीच्या वेळीच बांधता येतील, त्याचप्रमाणे फॉरवर्ड डिलिव्हरी किंवा फ्युचर्सचे व्यवहार करून आपली जोखीम जूननंतर कमी करता येईल. 
गेल्या सप्ताहातील NCDEX व MCX मधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका (रब्बी)
रब्बी मक्यामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (एप्रिल २०२०) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. १,९०० ते रु. १,७८८). या सप्ताहात त्या ७.४ टक्क्यांनी घसरून रु. १,६०६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) ८.२ टक्क्यांनी घसरून रु. १,८६५ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे.  

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (मार्च २०२०) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,५०६ ते रु. ३,९९०). या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,८७० वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ४,००८ वर घसरल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. मे डिलिव्हरीसाठी रु. ३,८६५ भाव आहे. तो सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ३.८ टक्क्यांनी कमी आहे. नजीकच्या भविष्यात भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. 

हळद
हळदीच्या फ्युचर्स (मार्च २०२०) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या. (रु. ६,७१४ ते रु. ५,९५६). या सप्ताहात त्या ५ टक्क्यांनी वाढून रु. ६,१४४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ५,८४३ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ६.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,२०८).

गहू     
गव्हाच्या (मार्च २०२०) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या. (रु. २,३०६ ते रु. २,१७१). या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी घसरून रु. २,१७२ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१६२ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१९२). या वर्षीचा हमी भाव रु. १,९२५ आहे. 

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०२०) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,३३४ ते रु. ३,९९८). या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी घसरून रु. ३,८२४ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,८२१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मेमधील फ्युचर्स किमती १.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,८८०). 

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०२०) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,४७३ ते रु. ३,९८८). या सप्ताहात त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,९७१ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०३२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती व जूनमधील फ्युचर्स किमती या समान आहेत. (रु. ४,०३४). हमीभाव रु. ४,८७५ आहे. 
 
कापूस 
MCX मधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०२०) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या. (रु. २०,५३० ते रु. १९,६८०). या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. १९,४१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,८३४ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती रु. १९,८९० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.६ टक्क्यांनी अधिक आहेत. 

(सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठ).
 : arun.cqr@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com