कडधान्य, भाजीपाला पिकांच्या दरांत वाढ

Grains
Grains

कडधान्यांचे भाव गेल्या काही दिवसात चांगलेच वाढले आहेत. कोविड काळात प्रथिनयुक्त आहार म्हणून कडधान्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. टोमॅटो आणि  बटाट्यापाठोपाठ कांद्याच्या भावातही सुधारणा झालेली आहे. विविध कारणांनी  पुरवठ्यावर असलेला दबाव पाहता कांद्याचे भाव पूर्ववत व्हायला दोन महिने तरी लागतील, अशी चिन्हे आहेत. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माल वाहतूक क्षेत्रात, ग्राहक-वृत्ती मध्ये झालेले कमालीचे बदल आणि मूल्यसाखळीतील कच्चे दुवे या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे अन्नधान्य महागाई दरात वाढ झाल्याचे दिसून आले. 

आजमितीला कडधान्यांच्या किरकोळ बाजारातील दरांत मोठी वाढ दिसून येत आहे. आकडेवारी द्यायची तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलोने मिळणारी तूरडाळ १२० रुपये म्हणजे ५० % वाढली आहे. तर उडीद, मूग आणि मसूर डाळीच्या भावात त्याच प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वाळवलेला हिरवा वाटाणा १५० रुपये किलो तर पिवळा वाटाणा १२०-१४० रुपये किलो आहे. इतके दिवस ६०-८० रुपये किलो असलेल्या हरभऱ्याने आता शतक गाठलेले दिसत आहे. साधारणत: काही महिन्यात या किंमती ५०-६० टक्के वाढल्या आहेत. अर्थात घाऊक किंमती त्या प्रमाणात वाढल्या नसल्या तरी या घडीला दोन-अडीच वर्षानंतर प्रथमच सर्व कडधान्ये हमीभावाच्या ५-२० % अधिक आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सणासुदीच्या काळासाठी देशांतर्गत वाढणारी मागणी, पावसाने झालेले खरीप पिकांचे मोठे नुकसान अशी कारणे या दरवाढीमागे असली तरी हंगामाखेरीस कमी होणाऱ्या पुरवठ्याच्या काळात नेहमीच अशी एक मोठी तेजी आणली जाते. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे पेरणी अधिक होऊन पुढील हंगामाचा पुरवठा सुरक्षित होतो. तर दुसरे म्हणजे स्टॉकिस्ट किंवा साठेबाजांना आपला माल वरच्या भावात विकण्याची संधी उपलब्ध होते. या घाऊक भाववाढीला महागाई म्हणण्यापेक्षा उत्पादनखर्चावर आधारीत रास्त भाव म्हणणे अधिक योग्य होईल. परंतु उत्पादकांच्या हातातून बहुतेक माल निघून गेल्यावर झालेल्या भाववाढीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. महत्वाचे म्हणजे या भाववाढीमुळे रिझर्व्ह बँकेची गोची होऊन अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी आवश्यक असणारी व्याजदरात कपात करणे शक्य होणार नाही.

या पार्श्वभूमीवर प्रश्न एवढाच आहे की कडधान्यांतील ही भाववाढ कितपत टिकाऊ राहील आणि जर भाव नरम होणार असतील तर किती आणि कधी? यासंबंधात या क्षेत्रातील दिग्गज आणि केंद्रीय कृषी आयुक्त यांची उपस्थिती असलेला वेबिनार इंडिया पल्सेस अँड ग्रेन असोसिएशनने नुकताच आयोजित केला होता. भारतीय कडधान्य बाजारावर लक्ष ठेऊन असलेल्या सुमारे २५ देशांतील हजारभर लोकांनी यात सहभाग घेतला. त्यातील चर्चेचा सारांश पाहता ही दरवाढ शेवटच्या चरणात असून नवीन खरीप हंगामातील मालाच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आकडे अपेक्षेपेक्षा  कमी राहतील. त्यामुळे आवक वाढू लागेल त्या प्रमाणात भाव कमी होतील. याव्यतिरिक्त येत्या काळात वाढणारा भाजीपाला पुरवठा, मसुरावरील आयात शुल्कातील कपात आणि वाढवलेली कालमर्यादा व त्यातून सरकारी हस्तक्षेपाची दिलेली सूचना आणि ग्राहक वृत्तीतील बदल या कारणांमुळे कडधान्यांच्या किंमती कमी होण्याची चिन्हे आहेत. 

या एक-दोन दिवसात केंद्रीय कृषी खाते २०२०-२१ पीक वर्षाच्या चालू खरीप हंगामातील उत्पादनाचे पहिले अंदाज प्रसिद्ध करणार आहे. परंतु राज्यांकडून आलेल्या माहितीनुसार कडधान्यांचे एकूण उत्पादन मागील वर्षाच्या ८०.५ लाख टनांच्या तुलनेत यावेळी ९२ लाख टन राहील असे केंद्रीय कृषी आयुक्तांनी सांगितले आहे. यापैकी तुरीच्या काढणीला अजून तीन महिने बाकी असले तरी पेरणीचे आकडे पाहता निदान ४० लाख टन  तरी उत्पादन राहील असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे उडदाचे उत्पादन मागील वर्षाच्या १३-१४ लाख टनांच्या व्यापारी अंदाजाएवढेच किंवा त्यापेक्षा कमी राहील ही भीती निराधार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. या वर्षी उडीद उत्पादनाचा आकडा २१ लाख टन एवढा असेल, असे म्हटले आहे. खास करून छत्तीसगड, झारखंड, गुजरात मधील पूर किंवा अतिवृष्टी नसलेल्या भागात वाढलेले क्षेत्र आणि उत्पादकता वाढ यांचा एकत्रित परिणाम होऊन उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज दिल्लीत अन्न मंत्रालयाच्या पुढाकाराने या संदर्भात एक बैठक होणार आहे. त्यात काय निष्कर्ष निघतील, ते पाहणे गरजेचे आहे. काही राज्यांमध्ये मुगाचे नुकसान झाले असले तरी राजस्थानमधील उत्पादन बरे राहिल्यामुळे एकूण नुकसान अपेक्षेपेक्षा कमी राहील. तसेच मुगाचे क्षेत्र पाच लाख हेक्टरने वाढल्यामुळे उत्पादन बरे राहील.

खरिपाचे हे चित्र असताना रब्बी हंगामातील चित्र देखील चांगलेच आशादायी आहे. देशातील महत्वाच्या १२३ जलाशयांमधील पाणीसाठा या घडीला ८५ % एवढा वाढला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उत्पादन वाढणार आहे.

परिणामी कडधान्यांच्या उत्पादनात भारत यावर्षी २०१७-१८ मधील जवळपास २४५ लाख टन उत्पादनाचा  विक्रम मोडीत काढेल अशीही आशा कृषी आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

महागाई दरात वाढ
अलीकडच्या काळात अन्नधान्य महागाईचे जे आकडे आले, ते काहीसे अनपेक्षित म्हणता येतील. कारण मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांची मागणी असणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचा कारभार कोविड-पूर्व काळाच्या पन्नास टक्क्यांवर देखील आलेला नाही. तरीही महागाई वाढल्याची अनेक कारणे देता येतील.  वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माल वाहतूक क्षेत्रात, ग्राहक-वृत्ती मध्ये झालेले कमालीचे बदल आणि मूल्यसाखळीतील कच्चे दुवे या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे ही स्थिती उद्भवली, असे म्हणता येईल. टोमॅटो आणि  बटाट्यापाठोपाठ कांद्याच्या भावातही सुधारणा झालेली आहे. विविध कारणांनी  पुरवठ्यावर असलेला दबाव पाहता कांद्याचे भाव पूर्ववत व्हायला दोन महिने तरी लागतील, अशी चिन्हे आहेत. परंतु कडधान्यांचे भाव देखील गेल्या काही दिवसात चांगलेच वाढल्यामुळे चर्चेत आलेले दिसत आहेत. कोविड काळात प्रथिनयुक्त आहार म्हणून कडधान्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. 

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com