esakal | इंदापूर तालुक्याची शेततळेनिर्मितीत आघाडी 
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर तालुक्याची शेततळेनिर्मितीत आघाडी 

गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी इंदापूर तालुक्याने आघाडी घेत तब्बल २९५ शेततळ्यांची निर्मिती करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

इंदापूर तालुक्याची शेततळेनिर्मितीत आघाडी 

sakal_logo
By
प्रतिनिधी

पुणे - टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ''मागेल त्याला शेततळे'' ही योजना २०१५ पासून सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेततळ्यांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पिके घेता येणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी इंदापूर तालुक्याने आघाडी घेत तब्बल २९५ शेततळ्यांची निर्मिती करून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. शेतकऱ्यांना या शेततळ्यांमुळे दिलासा मिळाला असून, पिकांसाठी शाश्वत पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.

पाच ते सहा वर्षांपासून जिल्ह्यातील पूर्वेकडील भागात गेल्या दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची  वेळ शासनावर आली होती. मागील तीन ते चार वर्षांपूर्वी या भागातील टँकरच्या संख्येत चांगलीच वाढ झाली होती. त्यातच पिकांची शाश्वती कमी झाली होती. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना शाश्वत पिके घेण्यासाठी ''मागेल त्याला शेततळ्यां''ची योजना आणली. त्याअंतर्गत जिल्ह्यात अडीच हजार शेततळ्यांचे उद्दीष्ट ठरवून दिले. शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन त्याचा वापर पाणीटंचाईच्या काळात करणे गरजेचे असल्याचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी शासनाकडून पन्नास हजार रुपयांचे जास्तीत जास्त अनुदान देण्यात येते. 

जिल्ह्यात २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात अडीच हजार शेततळ्यांसाठी सुमारे साडेपाच हजार अर्ज दाखल झाले होते. गेल्या वर्षी म्हणजेच २०१८-१९ मध्ये ९६५ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यासाठी चार कोटी ४७ लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप केले आहे. 

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २९२५ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यासाठी जवळपास १३ कोटी ३८ लाख ८ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्यात अजूनही शेततळ्याची कामे सुरू आहेत. गेल्या वर्षी पुरंदरमध्ये २६१, बारामतीत १२२, शिरूरमध्ये ९२, खेडमध्ये ५५ शेततळी झाले असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

तालुकानिहाय 
झालेले शेततळे - 
इंदापूर २९५, पुरंदर २६१, बारामती १२२, शिरूर ९२, खेड ५५, जुन्नर ४६, आंबेगाव २२, दौंड ३७, हवेली ९, भोर १४, मुळशी २, मावळ ५, वेल्हा ५. 

loading image