esakal | खेळाच्या कौशल्यातून स्वतःची युनिक आयडेंटिटी तयार करा; श्रीनिवास रेड्डी
sakal

बोलून बातमी शोधा

Kabaddi  coach Srinivasa Reddy

हरियाणात प्रत्येक जिल्ह्यात कबड्डीची एक अकॅडमी आहे.

खेळाच्या कौशल्यातून स्वतःची युनिक आयडेंटिटी तयार करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कबड्डीपटूंनी केवळ नोकरी मिळविण्याची मानसिकता न ठेवता स्वतःची युनिक आयडेंटिटी तयार करावी, असे आवाहन भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. कबड्डीला ग्लॅमर असून अॅडव्हान्स प्रशिक्षणाद्वारे कबड्डीपटूंनी त्यांच्यातील कौशल्य वाढवावे, असेही त्यांनी सांगितले.

रेड्डी यांनी गोकुळ शिरगावमधील छत्रपती शाहू महाराजनगर येथील कबड्डी रावस अकॅडमीला आज भेट दिली. ते मूळचे हैदराबादचे असून, त्यांनी भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघाला मार्गदर्शन केले आहे. प्रो कबड्डीतील हरियाणा स्टिलर्स, तेलुगू टायटन व जयपूर पिंक पॅथर संघाला प्रशिक्षण दिले असून, कोल्हापुरातील भेटीत त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

रेड्डी म्हणाले, "कबड्डी रावस अकॅडमीमध्ये उत्कृष्ट सोयी-सुविधा उपलब्ध असून, इथल्या प्रशिक्षणाचा लाभ घेत खेळाडूंनी कौशल्य वाढवायला हवे. कबड्डी इनडोअर खेळ झाला असून, दहा हजार रुपये शुल्क देऊन खेळाडू या खेळाचे प्रशिक्षण घ्यायला तयार आहेत. प्रो कबड्डीचा गाजावाजा कसा झाला आहे, ते आपण पाहत आहोत. आज जगभरात भारतीय कबड्डी प्रशिक्षकांना मागणी आहे. या खेळाला प्रमोट करण्याची ही वेळ असून, ऑलिंपिकमध्ये या खेळाचा नक्कीच समावेश होईल. तो झाल्यास भारत या खेळात नक्कीच सुवर्णपदक जिंकून आणेल."

ते म्हणाले, "ग्रासरुट लेव्हलपासून तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासह कबड्डीसारख्या सांघिक खेळायला शासनाने भरीव निधी देणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार असून, त्यांच्याकडे तशी मागणी कबड्डी खेळाडूंनी करायला हवी. एक खेळाडू तयार व्हायला कमीत कमी दोन वर्षे लागतात."

पत्रकार परिषदेस आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडिगिरी, प्रा. संभाजी पाटील, उमा भोसले-भेंडिगिरी, अण्णासाहेब गावडे, अजित पाटील, उदय खांडेकर, साक्षी भोसले-भेंडिगिरी उपस्थित होते.

रावस अकॅडमी आंतरराष्ट्रीय दर्जाची...

हरियाणात प्रत्येक जिल्ह्यात कबड्डीची एक अकॅडमी आहे. मात्र तिथल्या व कबड्डी रावस अकॅडमीतील सुविधांत जमीन-अस्मानचा फरक आहे. रावस अकॅडमी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. ती करण्यामागे आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडिगिरी, प्रा. संभाजी पाटील, उमा भेंडिगिरी-भोसले व कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेच्या अन्य सदस्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे, अशा शब्दांत रेड्डी यांनी कौतुक केले.

हेही वाचा: प्रसाद लाड यांचे पोलीस ठाण्यात आंदोलन; राणे समर्थक आक्रमक

मी १९९८ला गुजरातमधील गांधीनगर येथे कबड्डी प्रशिक्षणासाठी दाखल झालो. त्यावेळी मला हिंदी येत नव्हते. केवळ नोकरी मिळविण्याचा माझा दृष्टीकोन होता. मार्गदर्शक प्रसाद राव यांनी माझा दृष्टीकोन बदलला. २०१०ला एशियन गेम्सच्या शिबिरात माझा सहभाग होता. त्यानंतर माझी भूमिका बदलली आणि मी दक्षिण कोरियाला प्रशिक्षक म्हणून रुजू झालो. कबड्डीमुळे मला अभनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेता आली. कबड्डीमुळे मला गाडी, बंगला खरेदी करता आला, असेही रेड्डी यांनी सांगितले.

loading image
go to top