वडिलांच्या अपंगत्वानंतर धडाडीने सावरली घरासह शेती

वडील विजय, आई लता व भाऊ हृषीकेश यांच्यासह जोत्स्नाचे समाधानी कुटुंब.
वडील विजय, आई लता व भाऊ हृषीकेश यांच्यासह जोत्स्नाचे समाधानी कुटुंब.

लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना लहान वयात सर्व अनुभवत होती. उच्चशिक्षणानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी तिने खांद्यावर पेलली. कष्ट, जिद्द, चिकाटीतून शिक्षकीपदाची नोकरी सांभाळत प्रयोगशील द्राक्ष उत्पादक म्हणूनही ती आपली ओळख तयार करीत आहे. वडिलांचा मुलगाच होऊन घरातील सदस्यांना कर्त्या पुरुषाचा आधार तिने दिला आहे. 

द्राक्षाचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात लोणवाडी येथे निफाड-पिंपळगाव बसवंत रस्त्यालगत दौंड कुटुंबीयांच्या वाट्याला विभागणीनंतर दोन एकर शेती आली. विजय दौंड १९८४ पासून द्राक्षशेती करायचे. ऐन उमद्या वयात १९९९ मध्ये भीषण अपघात होऊन त्यांना अपंगत्व आले. सहा महिने ते नाशिकमध्ये दवाखान्यात उपचार घेत होते. हळूहळू सावरत ते चालू लागले. नव्या उभारीने शेती पाहू लागले. दुर्दैवाने त्यांची पाठ सोडली नाही. सन २०१० मध्ये पुन्हा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. हिंमतीने पत्नी सौ. लता यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. 

धडाडीची मुलगी जोत्स्ना 
मुलगा हृषीकेश लहान होता. मोठी मुलगी आर्थिक गरिबीमुळे शिक्षणासाठी मामाच्या गावी होती. मग मोठी मुलगी ज्योत्स्ना शिक्षण घेत आईला प्रत्येक मदत कामात मदत करू लागली. परिस्थितीचे भान ठेवत तिने जिद्दीने अभ्यास केला. ओझर (मिग) येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचएएल महाविद्यालयात संगणक शास्रात एमसीएसचे शिक्षण घेतले. अंतिम परीक्षेत ती विशेष नैपुण्याने उत्तीर्ण झाली. 

वडिलांची मुलगी नव्हे, तर मुलगा   
अभ्यासात कायमच पुढे असलेल्या जोत्स्नाला नाशिकमधील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवणे कठीण गेले नाही. त्यात पुढे चांगले करियर करण्याची मोठी संधीही होती. पण घरच्या शेतीची जबाबदारी समोर दिसत होती. अपंगत्वाने हताश झालेल्या वडिलांना पुन्हा उभारी द्यायची होती. आता वडिलांची मुलगी नव्हे, तर वडिलांचा मुलगा होऊन तिला काम करायचे होते. अखेर ‘आयटी’ मधील नोकरीवर पाणी सोडले. 

दुहेरी कसरत सुरू 
शेतीकडे दुर्लक्ष होणार नाही आणि घरप्रपंचही सुरळीत सुरू राहील असे नियोजन जोत्स्नाने केले. घरापासून पाच किलोमीटरवरील पिंपळगाव बसवंत येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ती सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाली. दुसरीकडे द्राक्ष बागायतदार ही भूमिकाही पार पाडण्यासाठी सज्ज झाली. लहानपणापासून द्राक्षशेतीचे धडे वडिलांकडून गिरवले होते. याच जोरावर क्लोन-२, थॉमसन या वाणांच्या निर्यातक्षम उत्पादनास सुरवात झाली.

कामांत तरबेज 
नाशिक जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती बिकट आहे. दौंड यांच्या शेतातील विहीरही कोरडी पडली आहे. बोअरला थोडेच पाणी आहे. पण जोत्स्ना दुष्काळाला डगमगत नाही. पाणी उपसा करून ते विहिरीत साठविण्याचे काम ती करते. भारनियमनाच्या काळात रात्री शेतीत पंप चालू बंद करण्यासाठी जावे लागते. अशावेळी मागे न हटता भाऊ किंवा घरातील सदस्यांच्या मदतीने हे काम यशस्वी पार पाडते. विहिरीत साठविलेले पाणी ठिबकद्वारे देणे असो की बागेत पाचटाचे मल्चिंग करणे असो या तंत्राच्या वापरात ती कुशल आहे. 
 
कष्टाला सीमा नाही  
जोत्स्नाचा दिवस पहाटे पाच वाजताच सुरू होतो. सकाळी आठ ते दुपारी तीन अशी शाळा असते. त्यानंतर मग घरी येणे, द्राक्ष बागेची हंगामनिहाय कामे अशी प्रत्येक जबाबदारी जोत्स्ना पार पाडत राहते. विरळणी, सबकेन, बगलफूट, शेंडाबाळी, शेंडा मारणे अशी सारी कामे ती लीलया पार पाडते. कीडनाशके, खते, अन्य साहित्यदेखील तीच घेऊन येते. ट्रॅक्टर चालवून फवारणी देखील करण्यात ती कमी पडत नाही. ब्लोअरमध्ये बिघाड झाल्यास पाठीवरील पंपाद्वारे फवारणी करून काम अडू देत नाही. जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब यांचे महत्त्व जाणून तसे व्यवस्थापन तिने सुरू केले आहे.   

विक्रीचे नियोजन
द्राक्षाचे एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. कमीत कमी खर्चात गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीसाठी जोत्स्ना प्रयत्नशील असते. विक्रीसाठी मात्र घरातील सर्वांची मदत व सल्लामसलत होते. काहीवेळा व्यापाऱ्यांना माल पोचही करावा लागतो.  

कौटुंबिक जबाबदारी
घरातील आर्थिक बाजूही ज्योस्त्नाने सक्षम पेलली आहे. शेती, घरातील किराणा, दवाखान्यापासून सर्व कौटुंबिक खर्चाचे व्यवस्थापन ती चोखपणे बजावते. अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात ती कुशल आहे मजुरांचे दर वाढल्याने जास्तीत जास्त कामे घरच्या घरी कशी करता येतील याकडे तिचा कल असतो. शेतीची औजारे आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावर आणली जातात. कर्ज मुदतीमध्ये कसे फेडता येईल याची आर्थिक शिस्त जपली आहे. उत्पन्नातील काही रक्कम शेतीत भांडवलासाठी राखीव ठेवली जाते. शासकीय कामांकडेही जातीने लक्ष असते.
- ज्योत्स्ना दौंड - ७२१९६५०४८३, ९५५२७६०६९९

नाशिकच्या द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वतीने ‘आदर्श महिला द्राक्ष उत्पादक’, कृषिथॉन बेस्ट वूमन फार्मर ॲवार्ड द्वारे जोत्स्नाचा गौरव करण्यात आला आहे. यंदा जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ‘महिला गौरव’ पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात येत आहे. मेळावे, प्रदर्शनांमध्येही तिच्या प्रयत्नांची दखल घेतली आहे.

वडील हीच प्रेरणा अन्‌ मार्गदर्शक
लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी घेताना अभ्यास घेण्यापासून कॉम्प्युटर सायन्स पदवीच्या शिक्षणापर्यंत तिने त्याला वाढवले आहे. भावाला आता चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्याचे समाधनाही तिला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांनी आम्हा भावंडांचा सांभाळ करून संघर्ष करण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली द्राक्षशेतीत विविध प्रयोग करण्याची उर्मी मिळते. तेच माझे प्रेरणास्थान व मार्गदर्शक असल्याचे जोत्स्ना आवर्जून सांगते. जोत्स्ना आमची मुलगी असली तरी मुलाप्रमाणेच असल्याचा आम्हाला अभिमान असल्याची भावना आईवडील व्यक्त करतात.

संकटांनीच शिकवले
वडिलांच्या अपंगत्वानंतर आईने अनेक संकटाचा सामना केला. आमच्या शिक्षणासाठी पैसा उपलब्ध करताना तिची दमछाक व्हायची. भारनियमनाच्या काळात रात्री बेरात्री आईला शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागायचे. अशावेळी आई आम्हां भावंडांना जोडीला घेऊन जायची. काहीवेळा संपूर्ण रात्र आम्ही भावंडं शेतातच झोपून जायचो. असा संघर्ष सुरू असताना आमच्या शिक्षणावर कुठला परिणाम होणार नाही याची दक्षता आईने कायमच घेतली. आई-वडिलांचेच संस्कार आम्हावर झाले. शेतीसाठीचे भांडवल, उपलब्ध सामग्री, वीजपुरवठा, पाण्याची कमतरता आदी बाबी पाहता संकटांवर मात करण्याची पूर्वयोजना आखण्याची क्षमता त्यातूनच आली आहे. संकटांनीच आम्हाला वेळोवेळी शिकविले हेच आमच्या यशाचे गमक असल्याचे ज्योत्स्ना सांगते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com