esakal | श्रावणात पैसे मिळवून देणारे निकमांचे वजनदार काशीफळ
sakal

बोलून बातमी शोधा

Kashifal

श्रावणात व त्या वेळच्या उत्सवांत कोणता शेतीमाल घेतला तर कायम मागणी व दर राहतील याचा अभ्यास नायगाव दत्तापूर (जि. बुलडाणा) येथील राजाराम पुंजाजी निकम या प्रयोगशील शेतकऱ्याने केला. त्यातून काशीफळाची (भोपळा) निवड केली. अकरा वर्षांपासून या पिकात सातत्य ठेवून ते दरवर्षी सुमारे साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत समाधानकारक उत्पन्न मिळवत आहेत.

श्रावणात पैसे मिळवून देणारे निकमांचे वजनदार काशीफळ

sakal_logo
By
गोपाल हागे

श्रावणात व त्या वेळच्या उत्सवांत कोणता शेतीमाल घेतला तर कायम मागणी व दर राहतील याचा अभ्यास नायगाव दत्तापूर (जि. बुलडाणा) येथील राजाराम पुंजाजी निकम या प्रयोगशील शेतकऱ्याने केला. त्यातून काशीफळाची (भोपळा) निवड केली. अकरा वर्षांपासून या पिकात सातत्य ठेवून ते दरवर्षी सुमारे साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत समाधानकारक उत्पन्न मिळवत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर हे गाव पूर्वी कोरडवाहू होते. मागील काही वर्षांत सिंचनाच्या सोयी तयार होत असल्याने शेतकरी बागायती पिके घेऊ लागले आहेत. गावातील राजाराम निकम यांची ३५ एकर शेती आहे. त्यांनीही आपली शेती बागायती बनविली आहे. त्यासाठी तीन विहिरी खोदल्या. सर्व शेतात पाइपलाइन उभारली आहे. 

काशीफळाची मागणी ओळखली 
निकम हे अभ्यासू व प्रयोगशील शेतकरी आहेत. बाजारपेठा, हंगाम, दर यांचा अभ्यास करून ते पीक नियोजन करीत असतात. अशातूनच त्यांना काशीफळाचा (लाल भोपळा) शोध लागला. श्रावणात तसेच त्या दरम्यान येणाऱ्या उत्सवांत या फळाला चांगली मागणी असते. याची भाजी उपवासालादेखील चालते. पुरीभाजीसाठीदेखील त्याला मोठी मागणी असते. हा सर्व विचार करून निकम यांनी हे पीक नक्की केले.  अर्थात, जवळपास दरवर्षी हे पीक जमत गेले, समाधानकारक दर मिळत गेले. आता निकम यांची या पिकावर मजबूत पकड बसली आहे. 

कमी खर्चाचे पीक 
वेलवर्गीय असलेल्या या पिकाला खते, कीडनाशकांवर अन्य पिकांसारखा जास्त खर्च करावा लागत नाही. लागवडीवेळी एकरी एक बॅग डीएपी खताची मात्रा देण्यात येते. कीडनाशकांच्या साधारण तीन ते चार फवारण्या होतात. पावसाळ्यात लवकर येणारे व चांगला पैसा मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याचा अनुभव आल्याचे निकम सांगतात.

अशी आहे काशीफळाची शेती 
  दरवर्षी क्षेत्र - सुमारे तीन एकर. यंदा पाच एकर.
  लावण एप्रिलच्या दरम्यान, सुमारे साडेतीन ते चार महिन्यांचा पीक कालावधी.
  एप्रिलमध्ये एकीकडे अन्य शेतकऱ्यांची मागील हंगामातील पिकांची काढणी सुरू असते, त्या वेळी निकम यांच्या शेतात काशीफळ लागवडीसाठी रखरखत्या उन्हात काशीफळ लागवडीची कामे सुरू होतात.
  उन्हाळ्यात पिकाचे संगोपन व निगा राखणे खूप कष्टाचे राहते.
  या काळात पिकाला पाण्याची अधिक गरज राहते, ही काळजी विशेषत्वाने घेतात. 
  जमिनीत आर्द्रता राहावी यासाठी स्प्रिंकलरचा वापर होतो. 
  मात्र या पिकासाठी ठिबक सिंचनच अधिक उपयोगी असल्याचे निकम सांगतात. 
  या पिकाला निचऱ्याची जमीन मानवते. 

३५ किलो वजनाचा भोपळा 
निकम यांनी ३० ते ३५ किलो वजनापर्यंतही काही भोपळ्यांचे वजन मिळवले आहे. अर्थात, सरासरी वजन हे १० किलोच्या पुढे किंवा २० किलोपर्यंत राहते. मागील वर्षी सर्वाधिक ४२ किलोचे फळ मिळाल्याचे ते सांगतात. 

असे राहतात दर
निकम म्हणाले, की आमच्या काशीफळांना व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असते. आठ- दहा वर्षांतील ओळखींमुळे व्यापारी थेट संपर्क साधतात. धार्मिक उत्सवांसाठीही काही समुदायांकडून थेट मागणी येते. त्यांना माल घरपोच पाठवला जातो. अकोला, अमरावती, मालेगाव, जालना अशा विविध बाजारपेठांना दर पाहून माल पाठवण्यात येतो.

सरासरी दर (किलोला) १२ ते १५ रुपये
कमाल मिळणारा दर २० ते २२ रुपये (मागील वर्षी मिळाला.)
किमान दर १० रुपये. पिकाला एकरी खर्च 
सुमारे ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत येतो. 

काशीफळाचे मार्केट 
हंगामात सुरवातीला मिळतात चांगले दर उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड कमी असते. पर्यायाने जून-जुलैमध्ये भाजीपाल्याची आवक अपेक्षित होत नाही. पावसाळ्याच्या तोंडावर आवक कमी झाल्याने दर वाढलेले असतात. अशा काळात जुलै-ऑगस्टमध्ये विक्रीस आलेले काशीफळ पर्यायी भाजी म्हणून ग्राहकांना उपलब्ध होते. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. या दिवशी २० ते ३० क्विंटल काशीफळाची सर्रास विक्री होते. अन्य दिवशीही चार- पाच क्विंटलची दररोज विक्री होत असते. छोटे खरेदीदार फळे खरेदी करून विक्री करतात. दरांच्या बाबतीत सांगायचे तर हंगामात सुरवातीला २० रुपयांपर्यंत किलोचा दर वाढतो.

जसजशी आवक वाढत जाते व अन्य भाजीपाल्याची आवक सुरू होते, तेव्हा काशीफळाचा दर किलोला १० रुपयांपासून सुरू होतो. दर्जेदार फळांना २० रुपयांपर्यंत दर मिळतो.  सध्या बाजारपेठेत आवक असल्याने ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. या बाजारात मेहकर, नांदुरा, जळगाव जामोद व लगतच्या भागातूनही काशीफळांची आवक होते. पावसाळ्यात हे फळ कमी दिवसांत चांगले पैसे मिळवून देऊ शकते असे याच्या उलाढालीवरून दिसते. अन्य बाजारपेठांमध्ये काशीफळाची चांगली आवक होत असते असे खामगाव बाजारातील व्यापारी उमेश डाहे यांनी सांगितले. 

उत्पादन 
निकम यांना एकरी १०० ते ११० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. यावर्षीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दररोज माल बाजारपेठेत पाठविण्यात येत आहे. प्रतिवेलीला दोन फळे ठेवण्यावर भर असतो. 

दुबार पीकपद्धतीला फायदा
काशीफळाची काढणी केल्यानंतर काही दिवस हे शेत तसेच ठेवून रब्बीसाठी तयारी केली जाते. यात हरभरा घेण्यात येतो. त्याचे एकरी ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कांदाही एकवेळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमी दरांमुळे त्यातून नफा काहीच हाती लागला नाही. अन्य पिकांत सोयाबीन, रब्बी कांदा, कांदा बीजोत्पादन घेण्यात येते.  

परिसरात काशीफळाची लागवड
निकम यांची प्रेरणा घेऊन भागातील काही शेतकरी काशीफळाकडे वळू लागले. मेहकर तालुक्यातील नायगाव भागात प्रामुख्याने खरीप पिके घेण्यावर भर असतो. आता सिंचनाच्या सुविधा निर्माण होऊ लागल्याने पर्यायी पिकांकडे शेतकरी वळत आहेत.  
 
- राजाराम निकम, ९९७०२२०३६४

loading image
go to top