esakal | द्राक्षाच्या घडाचा सुकवा टाळण्यासाठी उपाययोजना

बोलून बातमी शोधा

1) वेलीवर घडांची संख्या जास्त असल्याने आलेला सुकवा. 2) डाऊनी मिल्‍ड्यू रोगाच्या प्रादुर्भावामुळे आलेला सुकवा.

सद्यपरिस्थितीचा विचार करता वातावरणातील तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत असून, आर्द्रताही तितक्याच प्रमाणात कमी होताना दिसून येते. येत्या आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण कमी राहून आकाश निरभ्र राहील. परिणामी, तापमान जास्त वाढेल. या स्थितीमध्ये द्राक्ष बागेत उपलब्ध असलेल्या अवस्थांमध्ये येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांची माहिती घेऊ.

द्राक्षाच्या घडाचा सुकवा टाळण्यासाठी उपाययोजना
sakal_logo
By
डॉ. आर. जी. सोमकुंवर

सद्यपरिस्थितीचा विचार करता वातावरणातील तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत असून, आर्द्रताही तितक्याच प्रमाणात कमी होताना दिसून येते. येत्या आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण कमी राहून आकाश निरभ्र राहील. परिणामी, तापमान जास्त वाढेल. या स्थितीमध्ये द्राक्ष बागेत उपलब्ध असलेल्या अवस्थांमध्ये येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांची माहिती घेऊ.

बागेत येणारा घडाचा सुकवा
जमिनीचा प्रकार व तापमान या दोन्ही गोष्टींचा विचार करता वेलीची पाण्याची गरज नेमकी किती आहे, हे समजून घेणे कठीण होते. वाढत्या तापमानात पानांतून व वेलीतून बाष्पोत्सर्जनाद्वारे पाणी कमी होते. त्या प्रमाणात जमिनीतून मुळाद्वारे पाणी वर घेणे आवश्यक असते. बागेत जर पाण्याची गरज आवश्यकतेनुसार पूर्ण झालेली नसल्यास वेलीमध्ये असमतोल निर्माण होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारी जमिनीमध्ये मातीच्या कणांची संख्या जास्त असल्यामुळे मुळांच्या कक्षेत जास्त प्रमाणात पाणी धरून ठेवले जाते. अशा जमिनीमध्ये वेलीमध्ये हा असमतोल तुलनेने कमी दिसतो. हलक्या जमिनीमध्ये मातीच्या कणांची संख्या कमी असल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. दिलेल्या पाण्याच्या फक्त ४० ते ५० टक्के पाणी वेलीला मिळून बाकीचे पाणी वेलीच्या कक्षेच्या बाहेर जाते. म्हणून वेलीची पाण्याची गरज आणि उपलब्धता यात समतोल राहत नाही. यामुळेच अशा जमिनीत घड सुकताना दिसून येतील. यालाच सुकवा किंवा ममीफिकेशन असे म्हटले जाते. अशा परिस्थितीतील द्राक्ष घड हा शेंड्याकडून सुकत असताना दिसून येतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीस झालेला रोगाचा प्रादुर्भावामुळेही (उदा. डाऊनी मिल्ड्यू, अॅन्थ्रॅक्नोज) अशी स्थिती दिसून येते. काही ठिकाणी बागेत मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत आपण जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करतो. त्याच कालावधीत ढगाळ वातावरण व कमी तापमान असल्यास, अशा काळात आर्द्रता जास्त वाढते. हीच परिस्थिती डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगांचे आधीच बागेत शिल्लक असलेल्या बीजाणू कार्यरत होतात. त्यामुळे घडाच्या पाकळ्या काळ्या पडून निर्जीव होऊ लागतात.

तिसऱ्या परिस्थितीत या पूर्वी वेलीत असलेला अन्नद्रव्याचा असमतोल (उदा. कॅल्शिअम- मॅग्नेशिअम) सुद्धा सुकवा येण्यास कारणीभूत असतो. अशा परिस्थितीत पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील. 

उपाययोजना

  • घडाचा सुकलेला भाग कात्रीने कापून घ्यावा. यामुळे पुढील सुकवा वाढण्याची शक्यता कमी होते.
  • आर्द्रता वाढलेल्या परिस्थितीत निरीक्षण करून डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणाकरिता प्रभावी उपाययोजना कराव्यात. घडाच्या वाढीच्या अवस्थेचा विचार करता यावेळी बुरशीनाशकांची फवारणी टाळणे गरजेचे आहे. या वेळी ट्रायकोडर्मासारख्या जैविक नियंत्रणावर भर देऊन रोगनियंत्रण करून घ्यावे. (प्रमाण ः ५ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे तीन ते चार फवारण्या उपयुक्त ठरतील.)  
  • फळकाढणीच्या अवस्थेत अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यास तो पाहिजे तितका फायद्याचा होत नाही. कारण पेशींची वाढ पूर्ण झालेली असते. अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी असते. परंतु पाणी उतरण्याच्या पूर्वीच्या अवस्थेत असलेल्या बागेत खतांचा पुरवठा फायद्याचा राहील. उशिरा छाटलेल्या बागेत मणी सेटिंग ते पाणी उतरेपर्यंत कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचा वापर संतुलित राहील, असे नियोजन करावे. पान व देठ परीक्षण याकरिताच महत्त्वाचे असते. 
  • बागेत पाण्याची उपलब्धता वाढीच्या अवस्थेनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार करावी. बागेत या साठी पॅन इव्हॅपोरीमीटर अवश्य बसवावे. या उपकरणाद्वारे बाष्पीभवनाचा वेग किती आहे, व पाण्याची गरज किती आहे, ते ठरवता येते. 
  • ज्या बागेत मण्यात पाणी उतरण्यास वेळ आहे, व घडाची संख्या जास्त आहे अशा परिस्थितीत घडांची विरळणी करून घ्यावी. त्यामुळे पुढील समस्या नियंत्रणात राहतील.  

मण्यांचा रंग 
आपल्याकडे उपलब्ध रंगीत द्राक्ष जातींची छाटणी ही लवकर म्हणजे ऑगस्टपासून सुरुवात होते. या द्राक्षाची काढणीही लवकर होऊन फळ बाजारात डिसेंबर महिन्यांपर्यंत उपलब्ध होते. मात्र या वेळी तापमान कमी असल्यामुळे व सूर्यप्रकाशसुद्धा कमी कालावधीकरिता उपलब्ध झाल्यामुळे मण्यात एकसारखा रंग मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी उपलब्ध संजीवकांपैकी इथेफॉनचा वापर करतात. कमी तापमान असलेल्या परिस्थितीत या संजीवकाचा वापर करणे शक्य आहे. परंतु तापमान वाढल्यानंतर (सध्याच्या तापमानाचा विचार करता) घडाचा एकसारखा रंग मिळण्याकरिता अडचणी येतात. त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे वेलीवर द्राक्षघडांची असलेली अधिक संख्या. तापमान वाढल्यानंतर एकसारखा रंग येण्यासाठी इथेफॉनच्या फवारणीची गरज नसते. फवारणी केल्यास त्याचे मणी लूज पडणे, घडाची साठवण क्षमता कमी होणे यासारखे विपरीत परिणाम यावेळी दिसून येतात. रंगीत द्राक्षांमध्ये घडांचे नियोजन व कॅनोपी व्यवस्थापन यावर जास्त जोर द्यावा. 

देठावर गाठी येण्याची समस्या
बऱ्याच द्राक्ष बागांत मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत घडाच्या दांड्यावर व काही प्रमाणात देठावर सुद्धा गाठी येत असल्याचे दिसून येते. काडीच्या जवळच घडाच्या दांड्यावर फुगीर गाठी येतात. हा गाठीचा फुगीर झालेला भाग कापून पाहिल्यास आत पूर्ण पोकळी निर्माण झालेली दिसते. यामध्ये पांढरा कापसासारखा द्रव दिसून येईल. पाणी उतरल्यानंतर मण्यात जशी साखर उतरण्यास सुरुवात होते, तसे घडाचे वजन वाढायला लागते. अशा परिस्थितीत हा घड आपल्याच वजनाने वाकतो व नेमक्या त्या गाठीवर कोलमडतो. यानंतर मण्यात साखर उतरत नाही व तो घड सुकून जातो. 

बऱ्याच वेळा आपण मण्याचा विकास व्हावा, या दृष्टीने निरनिराळ्या संजीवकांचा वापर करतो. काही परिस्थितीत एकाच वर्गातील दोन ते तीन संजीवके शेतकरी वापरतात. इतकेच नाही तर शिफारशीत प्रमाणापेक्षाही अधिक वापर केला जातो. त्यानंतर बाजारात उपलब्ध असलेले टॉनिक्सही घडाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतील, या उद्देशाने वापरली जातात. अशा प्रकारे संजीवकांचा जास्त वापर झाल्यामुळे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीवर मर्यादा येतात. वेलींचे संतुलन बिघडते. या वेळी मण्याच्या देठावर किंवा पानांमध्ये उपलब्ध पेशी कार्यरत असल्या तरी त्या असमतोलामुळे पुढे अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यात गाठीमधून अडचण येते. 

उपाययोजना

  • या वेळी बागायतदार मण्यात गोडी वाढवण्यासाठी पालाशयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात करतो. पाण्याचा वापरसुद्धा नियंत्रणात असतो. यामुळे पुन्हा आपण अडचणीत येऊ शकतो. एकदा तयार झालेली गाठ विरघळवणे जरी शक्य होत नसले तरी वेलीचा वाढीचा जोम थोड्या प्रमाणात पुढे सरकवल्यास त्याचा चांगला फायदा होतो. तेव्हा नत्रयुक्त खतांचा वापर काही दिवसांकरिता (उदा. युरिया १ते १.२५ किलो प्रति एकर- चार ते पाच दिवस) करता येईल.  
  • बागेमध्ये किमान तापमानात पुन्हा घट झालेली असल्यास बागायतदार संजीवकांची फवारणी करतात. तेव्हा हा संजीवकांचा वापर टाळणे महत्त्वाचे असेल. 

- डॉ. आर. जी. सोमकुंवर,  ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र,  मांजरी, जि. पुणे.)

Edited By - Prashant Patil