दुग्ध व्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून समृद्धीकडे 

दुग्ध व्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून समृद्धीकडे 

अजनीतील धवलक्रांती
अमरावती शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आडवळणावर अजनी गाव वसले आहे. सुमारे सहाशे लोकवस्तीच्या या गावात आज घरटी गाय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेती एवढाच पूरक व्यवसायासाठी पुढाकार घेणाऱ्या या गावाने दुग्ध व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल केली आहे. अर्जुन किसन बावळे, गंगाधर किसन शिंगणे, गणेश दादाराव आडे यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी गावात धवलक्रांतीची बिजे रोवली. त्या वेळी मुऱ्हा, गावरान म्हशी यांचे संगोपन ते करायचे. उत्पादित दुधाची विक्री राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लोणी येथील हॉटेल व्यावसायिकांना केली जायची. शिल्लक दुधापासून लोणी, पनीर असे प्रक्रियाजन्य पदार्थ तयार करून त्यांची विक्री साधली जायची. 

केव्हीकेने दिले बळ 
अजनी गावात दुग्धोत्पादनाला असलेले सकारात्मक वातावरण पाहता दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) गावातील इच्छुक शेतकऱ्यांना गाय खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. साधारण पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सुमारे ५० गायींसाठी हे अनुदान होते. गायींचे संगोपन शेतकऱ्यांकडून उत्तमरीत्या झाले. त्यामुळे केव्हीकेकडून पुन्हा अनुदानाचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून गावातील दुधाचे संकलन २५० लिटरपर्यंत पोचले. गावातील लाभार्थ्यांकडून दूधसंकलन करून त्याचा शासकीय दुग्ध योजनेला पुरवठा व्हायचा. 

महिलांकडे व्यवसायाची जबाबदारी  
कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पांतर्गत गावातील चार स्वयंसाह्यता समूहांना कर्जपुरवठा करण्यात आला. यात अडीच लाखांपासून चार लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य होते. समूहांनी त्यांच्याकडील निधी जोडत गायींची खरेदी केली. यातील धनश्री महिला स्वयंसाह्यता समूहाकडे ११, अहिल्याबाई महिला स्वयंसाह्यता समूह ९, शेतकरी महिला स्वयंसाह्यता समूह १२, रिद्धीसिद्धी महिला स्वयंसाह्यता समूह ९ अशा प्रकारे जनावरांची संख्या आहे. कर्ज परतफेड पाहता धनश्री व अहिल्याबाई महिला समूहांना पुन्हा नव्याने कर्ज देण्यात आले. प्रत्येकी दोन लाख ४० हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ त्यांना मिळाला. अनुक्रमे ९ व ७ गायींची खरेदी त्यांनी केली. जनावरांचे व्यवस्थापन, दूध काढणे व अन्य व्यवस्थापन समूहातील महिला सदस्यांद्वारेच होते. दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कर्जाची परतफेड नियमितपणे करण्यावर भर राहतो.

दूध संघाची पायाभरणी 
गावातील अर्जुन बावळे यांनी वीस वर्षांपूर्वी कामधेनू सहकारी डेअरी संघाची उभारणी केली. त्या माध्यमातून सायकलवरून तालुका किंवा अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हशीचे दूध पोचविले जात होते. आज बावळे हयात नाहीत. त्यांचा मुलगा प्रभुचंद यांच्याकडे संघाचे अध्यक्षपद आहे. पंकज शिंगणे सचिव आहेत. संघात गावातील अकरा जणांचा समावेश आहे. सद्या संघातील काही सदस्यांकडील दोन ते तीन, तर काही सदस्यांकडील १० याप्रमाणे प्रकल्पातून एकूण सुमारे ९९ गायींचे संगोपन होते. 

दोन्ही वेळचे मिळून सरासरी ५०० लिटर दूध उपलब्ध होते. त्यासोबतच गावातील महिला समूहांव्दारे संगोपन होणाऱ्या जनावरांपासून मिळणाऱ्या २०० लिटर दुधाचे संकलनही हा संघ करतो. 

महिला समूहांनी केली क्रांती
दुग्ध व्यवसायात महिला समूहांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. गावातील चार महिला समूहांच्या माध्यमातून २०० लिटर दूध संकलन होते. त्याचा पुरवठा कामधेनू डेअरीला होतो. धनश्री महिला गटाच्या सा.िरका आडे, अर्चना आडे, अहिल्या महिला गटाच्या स्मिता आडे, नीलिमा आडे, शेतकरी महिला समूहाच्या कल्पना आडे यांच्यासह रिद्धीसिद्धी महिला गटाच्या वैशाली आडे यांनी या व्यवसायाची प्रेरणा घेत त्याचा विस्तार केला.   

पायाभूत सुविधा 
कामधेनू सहकारी दूध संघाचा ६० बाय ३० फूट क्षेत्रफळ आकाराचा गोठा आहे. सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचा खर्च त्यासाठी आला. चारा साठवणुकीसाठी ६० बाय ५० फूट क्षेत्रफळाची दोन गोदामे आहेत. ढेप साठवणुकीसाठीही एक गोदाम उभारले आहे. पाचशे लिटर क्षमतेचे दोन फ्रिजर आहेत. बावळे यांच्या जागेवरच हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. चार एकरांवर हिरव्या चाऱ्याची लागवड आहे. कुटार, तसेच ढेप बाजारातून गरजेनुसार विकत घेतले  जाते.   

कृषी समृद्धी प्रकल्पाने दिले बळ
दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रात आघाडी घेतल्याने अजनी गावाची अोळख पंचक्रोशीत झाली. परिणामी, कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत गावाची निवड करण्यात आली. खासगी संस्थेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून धनश्री आणि अहिल्याबाई महिला समूहाने दुग्धोत्पादनात पुढाकार घेतला. गाईंचा विमा आणि टॅ.िगंगदेखील करण्यात आले. कर्जाची परतफेडदेखील महिलांनी नियमितपणे केली. या समूहांनी बडनेरा बाजारातून गायींची खरेदी केली होती. सुरवातीला जर्सी व आता गीर गायींच्या संगोपनाकडे हे समूह वळले आहेत. आजमितीस समूहातील अनेक सदस्यांकडे देशी गायी आहेत. एकोणीस ते वीस रुपये प्र.ितलिटर दराने दूध खरेदी होते. दर आठवड्याला दुधाचे पैसे ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून थेट समूहाच्या बॅंक खात्यात टाकले जातात.  

शेणखताचा शेतीत वापर 
समूहातील प्रत्येक सदस्य मिळणाऱ्या शेणाचा वापर आपल्या शेतात खत म्हणून करतो. त्यामुळे या भागातील जमिनींची सुपिकता वाढण्यास मदत होत आहे. काही शेतकऱ्यांनी कंपोस्ट खतही तयार केले आहे. त्या माध्यमातून सें.िद्रय भाजीपाला व अन्य शेतमालाचे उत्पादन होते.  

दुधाला शोधली बाजारपेठ 
सहकारी संघाव्दारे संकलित होणाऱ्या सुमारे ७०० लिटर दुधापैकी अमरावती येथील खासगी डेअरीला ३५० ते ४०० लिटर दुधाचा पुरवठा होतो. उर्वरित दूध ‘मदर डेअरी’ कंपनीला पुरवले जाते. पूर्वी  शासकीय दुग्ध योजनेला हे दूध दिले जात होते. खासगी डेअरी व्यावसायिकांद्वारे फॅटनुसार २१ ते २२ रुपये प्रतिलिटर दराने दुधाची खरेदी होते. गावात वीजपुरवठा पूर्णवेळ राहत नाही. त्यामुळे शीतकरण उपकरणांसाठी ‘जनरेटर’ची सोय करावी लागते. त्यासाठी प्रतितासाला चार लिटर डिझेलची आवश्‍यकता राहते. विक्री केलेल्या दुधापोटी धनादेशाद्वारे संघाला पैसे मिळतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com