संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले यश

अभिजित डाके
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम तुकाराम साळुंखे यांनी एकेकाळी सायकलवरून दूध संकलन करीत दुग्ध व्यवसाय केला. सर्व समस्यांवर मात करीत चिकाटीतून हा व्यवसाय प्रतिकूलतेतही सुरू ठेवला. आज सारे कुटुंब व्यवसायात राबत असल्यानेच दोन डेअरी सुरू करून दररोजचे ५०० ते ६०० लिटर दूध संकलन करण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. 

बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम तुकाराम साळुंखे यांनी एकेकाळी सायकलवरून दूध संकलन करीत दुग्ध व्यवसाय केला. सर्व समस्यांवर मात करीत चिकाटीतून हा व्यवसाय प्रतिकूलतेतही सुरू ठेवला. आज सारे कुटुंब व्यवसायात राबत असल्यानेच दोन डेअरी सुरू करून दररोजचे ५०० ते ६०० लिटर दूध संकलन करण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. 

सांगली जिल्ह्यातील खानापूर हा बहुतांश दुष्काळी तर काही प्रमाणाचत बागायती तालुका आहे. तालुक्‍यातील बलवडी (भा) गावात ताकारी आणि आरफळ योजनेचे पाणी आले आणि नंदनवन फुलले. यामुळे ऊस, त्याचबरोबर भाजीपाला, केळीची लागवड वाढली. शेतकरी आर्थिक सक्षम होण्याकडे वाटचाल झाली. गावातील जोतीराम साळुंखे प्रतिकूल परिस्थितीत लढणारे कटुंब. वडिलोपार्जित साडेतीन एकर शेती. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. 

शेती कधीच विकायची नाही...  
जोतीराम सांगतात, की उत्पन्न मिळवण्यासाठी मिळेल ते काम करायचो. गावात शाळा नव्हती. सन १९७२ साली जुनी अकरावी इयत्तेचं शिक्षण देवराष्ट्रे येथे घेत होतो. वसतिगृहात राहात होतो. वडिलांनी जमीन गहाण ठेवून शिक्षण दिलं. पैशांची चणचण भासत असली तरी शेती विकायची नाही असा पक्का निर्धार वडिलांनी केला होता. शिक्षणासाठी पैसे अपुरे पडत होते. सातू आणि मक्‍याची भाकरी खावून दिवस काढावे लागले. 

दूध संकलनाचा पर्याय
मग परिसरात सायकलद्वारे दूधसंकलन सुरू केले. दूध गवळ्याला दिले जायचे. त्या वेळी ९० पैसे ते १ रुपया पगार मिळायचा. पूर्वीपासूनच दावणीला दुभती जनावरं होती. आर्थिक परिस्थिती नसल्यानं १९७६ मध्ये बीएस्सीचं शिक्षण थांबवावं लागलं. सन १९७२ चा दुष्काळ अगदी जवळून पाहिला. सन १९७६ मध्ये गुजरातमधून म्हैसाणा म्हशी आणल्या. त्या वेळी १३०० रुपयांची खरेदी होती. त्या वेळी एकत्र कुटुंब होतं. हळूहळू जनावरांची संख्या वाढली. विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलं. 

स्थिर केला व्यवसाय 
सन २००३ आणि २००८ चा काळ भीषण होता. मोठा दुष्काळ होता. दावणीची जनावरं घेऊन छाणवीत संसार थाटला होता. तरी हार मानली नाही. पण सातत्यानं खंत वाटत होती, आपलं शिक्षण पूर्ण करता आले नाही याची सल मात्र मनात राहिल्याचं जोतीराम सांगतात. हळूहळू व्यवसाय व संसार स्थिर केला. जोतीराम यांच्या चंद्रकांत या मुलाने एमएबीएड शिक्षण पूर्ण केलं. नोकरीच्या मागे न लागता शेतीत झोकून काम करण्यास सुरवात केली. आज बंधू उत्तम यांच्या मदतीने वडिलांचा दुग्धव्यवसाय त्यांनी चांगलाच आकारास आणला आहे. घरातील सर्वजण पहाटेपासूनच कामांना सुरवात करतात. प्रत्येक आपली जबाबदारी चोख सांभाळतो. सौ. संध्या गोठा स्वच्छ करण्यात व्यस्त होतात. उत्तम जनावरांच्या खाद्याचे नियोजन करतात. चंद्रकांत हे जनावरांच्या धारा काढतात. तर आई सौ. बबुताई शेळ्या, कोंबड्यांना खाद्य देतात. नव्या पिढीतील यश देखील शेळ्यांचे दूध काढण्यास मदत करतो. चाऱ्याची कुट्टी केलेली टोपली उचलून आईच्या हाती देतो. घरच्या अन्य सदस्यांप्रमाणेच जनावरांवर माया करतो. 

दूध व्यवसायाचा विस्तार 
सन १९७६ सालापासूनच डेअरी व्यवसायाला सुरवात केली होती.  तो काळ खडतरच होता. आजचाही काळ तसाच आहे. सायकलवरुन दूध संकलन करता करता पुढचा टप्पा गाठला. सध्या आंधळी (ता. पलूस) येथे जोतिर्लिंग आणि बलवडी (भा). ता. खानापूर येथे श्रीनाथ अशा डेअरी सुरू केल्या आहेत. आठवड्यातून एकदा पशुवैद्यकाची भेट असते.

असे आहे पशुधन 
    म्हैसाणा म्हशी    ९ 
    दीड ते दोन वर्षापर्यंत रेकडू    ७ 
    जर्सी गायी    ३ 
    पाड्या    २ 
    मोठ्या शेळ्या    २० 
    लहान शेळ्या    १५ 
    कोंबड्या    १०० 
    पिल्ले    ५० 

दूध संकलन (दोन्ही वेळचे)
५० ते ५५ लिटर घरचे
५०० लिटर जोतिर्लिंग दूध डेअरी
६०० लिटर श्रीनाथ दूध डेअरी

नोकरीत महिन्याला पगार येतो. त्यालाही कष्ट असतात. पण शेतीत त्या तुलनेत अधिक जोखीम असते. पण, ती पत्करल्याशिवाय यश कधीच मिळत नाही. 
- जोतीराम साळुंखे   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk Business Jotiram Salunkhe Success Motivation