दुधाचा अतिरिक्त पुरवठा चिंतेचा विषय

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

काेलकता - देशात सध्या दूध उत्पादनांचा मोठा साठा शिल्लक आहे. दुधाचा अतिरिक्त पुरवठा होत असल्याने दराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत अतिरिक्त पुरवठा ही मोठी चिंतेची बाब आहे. केंद्र यावर विविध उपाय करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी दिली.

काेलकता - देशात सध्या दूध उत्पादनांचा मोठा साठा शिल्लक आहे. दुधाचा अतिरिक्त पुरवठा होत असल्याने दराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत अतिरिक्त पुरवठा ही मोठी चिंतेची बाब आहे. केंद्र यावर विविध उपाय करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी दिली.

येथे सुरू करण्यात आलेल्या आॅटोमॅटिक दूध संकलन सिस्टीमच्या सॉप्टवेअरचे उद्घाटन श्री. रथ यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. देशात सध्या दूध दराचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांनी केलेला संप हे याचे ताजे उदाहरण देता येईल. दिलीप रथ म्हणाले, डेअरी उद्योग सध्याही संकटात आहे. देशातील काही राज्यांमध्ये अतिरिक्त दुधाचा पुरवठा होत असल्याने तेथे नवीनच समस्या उभ्या राहत आहेत. या अतिरिक्त दुधापासून या राज्यांनी दूध पावडर तयार केली आहे. आता या राज्यांमध्ये दूध पावडरचा साठा मोठ्या प्रमाणात असून, त्यांना दराचा प्रश्न भेडसावत आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर असल्याने साठा पडून आहे. यामुळे पावडर निर्मिती प्लांटचे भांडवलही गुंतून पडले आहे. त्याचाही वेगळा भार पावडर उत्पादकांवर पडला आहे.  

‘महाराष्ट्रात दूध बंद आंदोलन झाल्यानंतर सरकारने दूध आणि दूध पावडरीला अनुदान जाहीर केल्यानंतर येथील स्थिती सध्या शांत आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने शासनाला दूध दराचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक उपाय सुचविले आहेत. यामध्ये मर्चंडाइज एक्सपोर्ट योजनेतील वाटा हा १० टक्क्यांवरून २० टक्के करावा तसेच सहकारी दूध संस्थांना कमी खर्च भांडवल पुरवावे, अशा सूचना केल्या आहेत,’ असेही ते म्हणाले. 

कुपोषणमुक्तीसाठी वापर आवश्यक
देशात बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. सध्या देशातील ३६ टक्के बालके कुपोषित आहेत. त्यामुळे अतिरिक्त दूध हे या बालकांपर्यंत पोचविल्यास दुधाला दरही मिळेल आणि अतिरिक्त दुधाचा प्रश्नही सुटेल. यासाठी या सर्व कुपोषित बालकांपर्यंत दूध पोचविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर वितरण व्यवस्था उभी करावी लागेल. तसेच सार्क देशांतील कुपोषण दूर करण्यासाठी दूध देण्याचेही आम्ही सुचविले आहे. असे केल्यास दुधाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी माहिती दिलीप रथ यांनी दिली.

अतिरिक्त दुधाची समस्या सोडविण्यासाठी केंद्राने निर्यात अनुदानासह सहकारी दूध संस्थांना कमी खर्चात भांडवल पुरवठा करणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर वितरण व्यवस्था निर्माण करून देशातील कुपोषित बालकांपर्यंत दूध पोचवावे आणि सार्क राष्ट्रांनाही दुधाचा पुरवठा करावा. 
- दिलीप रथ, अध्यक्ष, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड

या राज्यांमध्ये अतिरिक्त पुरवठा
देशात काही राज्यांमध्ये दुधाचे कमी उत्पादन आहे, तर काही राज्यांमध्ये अतिरिक्त उत्पादन आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सध्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या राज्यांतील दूध उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे येथील दूध उत्पादक अस्वस्थ असून वेळोवेळी आंदोलन होत आहेत. नुकतेच महाराष्ट्र आणि पंजाब राज्यातील दूध उत्पादकांनी बंद आणि आंदोलन करत दुधाचे टॅंकर रस्त्यांवर रिकामे केले आणि खरेदी दर वाढविण्याची मागणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milk extra supply problem