रुंद गादीवाफ्यावर  निशिगंध लागवड

रुंद गादीवाफ्यावर  निशिगंध लागवड

सध्याच्या काळात निशिगंध लागवडीचे नियोजन करावे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना रुंद गादीवाफ्यावर लागवड करावी. दोन ओळी आणि रोपांत ३० सें.मी. अंतर ठेवून लागवड करतात. लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी.

निशिगंधाच्या चांगल्या वाढ 
उत्पादनासाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम ते हलकी जमीन निवडावी. निवडलेल्या जमिनीचा सामू ६.५ - ७.५ च्या दरम्यान असावा. हलक्या किंवा भरड जमिनीत निशीगंध लागवड करू नये. 

सध्याच्या काळात निशिगंधाची लागवड पूर्ण करावी. लागवड पाणी देण्याच्या पद्धतीनुसार तीन प्रकारे करता येते. 

सोडपद्धतीने पाणी देण्यासाठी निशिगंध लागवड सपाट वाफ्यात करतात किंवा सरी-वरंबे करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना बगलेत कंद लागवड करावी.

ठिबक पद्धत असेल तर रुंद गादीवाफ्यावर लागवड करावी. दोन ओळी आणि रोपांत ३० सें.मी. अंतर ठेवून लागवड करतात.

लागवडीसाठी निरोगी कंद निवडावेत. तसेच निवडलेले कंद आकाराने मोठे असावेत. शक्यतो २० ते ३० ग्रॅम वजनाचे कंद असावेत. लागवडीपुर्वी बेणे प्रक्रिया करावी. यासाठी प्रति लिटर पाण्यात दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून कंद पंधरा मिनिटे बुडवून ठेवावेत. साधारणपणे १५ ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या कंदापासून लागवड केलेल्या  पिकास फुलदांडे येण्यास ६ ते ७ महिन्यांचा काळ लागतो. त्यामुळे लहान आकाराचे कंद लागवडीसाठी वापरू नयेत.

लागवड ३० x ३० सें.मी. अंतरावर करावी. कंद जमिनीत ५ ते ७ सें.मी. खोल मातीत लागतील याची काळजी घ्यावी. 

 खत मात्रा 
हेक्टरी ४० टन शेणखत जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश या प्रमाणात खतमात्रा द्यावी.

लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत चांगले मिसळल्यानंतर लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाशची खतमात्रा द्यावी. 

उरलेली नत्राची १५० किलोची मात्रा तीन समान हप्त्यांमध्ये लागवडीनंतर ३०, ६० आणि ९० दिवसांनी द्यावी. 

पिकाच्या चांगल्या वाढीसाठी हेक्टरी १० किलो ॲझोटोबॅक्टर, १० किलो स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक आणि १० किलो ट्रायकोडर्मा लागवडीनंतर १० दिवसांनी शेणखतातून मिसळून द्यावे.

लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. उन्हाळ्यात लागवड करत असल्यामुळे लागवडीनंतर पाण्याचा ताण पडू देवू नये. सुरवातीच्या वाढीच्या काळात पाण्याचे चांगले व्यवस्थापन करावे.

जातींची निवड 
डबल प्रकारामध्ये फुलांना अनेक पाकळ्या येतात. हा प्रकार फुलदांड्याच्या उत्पादनासाठी लावतात. फुलदांडे प्रामुख्याने सुशोभीकरण, फुलदाणी, गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. लागवडीसाठी सुवासिनी, वैभव आणि स्थानिक डबल या जातींची निवड करावी. 

सिंगल प्रकारातील  फुलाला ५ ते ६ पाकळ्या असतात. ही फुले सुवासिक असून, त्यांचा उपयोग सुट्या फुलांसाठी केला जातो. सुटी फुले, हार, वेण्या, गजरे, माळा तयार करण्यासाठी उपयोगी येतात. फुले रजनी, शृंगार, प्रज्वल या जातींची निवड करावी. 

 डॉ. सतीश जाधव - ९४०४६८३७०९,(राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com