साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - साखरेच्या विक्री मूल्यात २०० रुपयांनी वाढ केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतू ही साखर जादा दराने घ्यावी लागणार असल्याने सध्या व्यापाऱ्यांचा या टेंडरना खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

व्यापारी कमी किमतीने घेतलेली साखर बाजारात आणण्याची शक्‍यता असल्याने पहिले काही दिवस कारखान्याच्या टेंडरना धीमा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता साखर वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

अनेक दिवसांच्या कारखान्यांच्या मागणीनंतर केंद्राने चार दिवसांपूर्वी आदेश काढून साखर विक्री मूल्य २९०० वरून ३१०० रुपयांपर्यंत वाढविले. यामुळे थोडेफार सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. राज्य बॅंकेने अद्याप साखरेचे मूल्य वाढविले नसले तरी येत्या काही दिवसात जर साखर ३१०० रुपयांनी विकू लागली तर तातडीने मूल्यांकनात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होऊ शकते. याचा फायदा कारखानदारांना कर्ज मिळताना होऊ शकतो. 

केंद्राच्या दरवाढीच्या घोषणेनंतर कारखान्यांनी विलंब न करता टेंडर काढण्यची प्रक्रिया सुरू केली, परंतू व्यापाऱ्यांनी हजरजवाबीपणा दाखवत खरेदी करण्यास उत्सुकता दाखविली नाही. वाढीचा निर्णय जाहीर होण्याअगोदरच्या साखरेची विक्री करूनच व्यापारी साखरेची खरेदी करतील, अशी शक्‍यता कारखाना पातळीवर आहे. 

येणाऱ्या काही दिवसांत तरी साखर खरेदी-विक्रीची प्रक्रिया संथ राहील, असा अंदाज आहे. अनेक कारखान्यांनी साखर विक्रीसाठी जादाचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मंदीच्या सावटात असणारा कारखान्यांचा साखर खरेदी विक्री विभाग सध्या जागृत झाल्याचे चित्र आहे. कारखान्यांच्या अधिकाऱ्यांकडून देशभरातीाल बाजारपेठांचा अंदाज घेण्यात येत असून जिथे शक्‍य आहे तिथे विक्रीसाठी प्रयत्न करण्यत येत असल्याची माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली. 

...निर्यातीचा गाडाही ढीम्मच 
केंद्राने निर्यात साखरेसाठी सवलती दिल्या असल्या तरी दर नसल्याने निर्यात फारशी गतीने होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूर विभागातून पावणेआठ लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात विभागातून ३१ डिसेंबरअखेर केवळ ३२ हजार टन साखर निर्यात झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ पैकी १२, तर सांगली जिल्ह्यातील १४ पैकी पाच अशा विभागातील १७ कारखान्यांकडून एक पोतेही साखर निर्यात झालेली नाही. निर्यात साखरेच्या पोत्यावर बॅंकांनी दिलेली उचल व आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर यात प्रतिक्विंटल सुमारे एक हजार रुपयांची तफावत आहे. त्यामुळे बॅंकांनीच निर्यात साखरेचा कोटा अडवून ठेवल्याने कारखानदारांची पंचाईत झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No sugar tender response